‘अनर्थाच्या कोंडी’त सलमान रश्दी!

न्यू यॉर्क शहरात सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल लिहिणे खरोखरच कठीण आहे.

‘अनर्थाच्या कोंडी’त सलमान रश्दी!
सलमान रश्दी

आलोक राय

भाषणस्वातंत्र्य.. उच्चारस्वातंत्र्य.. अभिव्यक्तिस्वातंत्र्य.. काय असतो अर्थ याचा? तो अर्थ आपण साकल्याने समजून घेतो आहोत का? सलमान रश्दींवर झालेल्या हल्ल्यानंतर तरी आपण त्यावर नव्याने काहीएक तत्त्वचिंतन करणार असू, तर ती चर्चा या मजकुरापासून सुरू व्हावी..

न्यू यॉर्क शहरात सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल लिहिणे खरोखरच कठीण आहे. जे काही झाले ते चुकीचे होते, चूकच होते, नक्कीच चूक होते.. एवढेच लिहूनसुद्धा तो विषय संपवता येईल, किंवा चूक, चुकीचे असे शब्द तीनतीनदा वापरणे टाळायचे तर जे घडले ते निखालस रानटी, हृदयद्रावक, शोकात्म आणि धिक्कारार्ह होते अशी विविध विशेषणे वापरता येतील. पण हेही शब्द बापुडे केवळ वाराच ठरतील का? या हल्ल्यापूर्वी जग भयावहच होते, आता ते अधिक भयावह झाले इतकाच फरक. फार काही बदलले नाही. तुम्ही बदलाल का? मी बदलेन का? मी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणि भाषणस्वातंत्र्याची पाठराखण बहुतेकदा कट्टरपणेच करत असतो आणि या प्रसंगानंतर तर भाषणस्वातंत्र्याचा पुरस्कार मी कदाचित अधिक जोमाने करेन.

बहुतेकदा.. कदाचित.. असे कचखाऊ शब्द मी वापरतो आहे, कारण रश्दींवर झालेला हल्ला हा प्राणघातकच ठरू शकला असता हे मला माहीत आहे आणि रश्दींचा जीव वाचला तरीही त्यांचा एक डोळा गेला, यकृताला मोठी दुखापत झाली हेही माहीत आहे. विचित्र समाधान एवढेच की, रश्दी यांची वाणी शाबूत आहे.. ते बोलू शकताहेत. इथे जणू भाषणस्वातंत्र्यच जिंकले आहे.. मोठी किंमत मोजून!

आता माझ्या कथित कचखाऊपणाबद्दल. वास्तविक रश्दींवरच्या हल्ल्याचा निषेध अत्यंत निर्विवादपणे- म्हणजे मनापासून, सखोलपणे – करताना कोणतेही किंतु-परंतु येऊच नयेत. कारण हिंसेचे समर्थन कधीही- कोणत्याही परिस्थितीत होऊच शकत नाही. पण म्हणून भाषणस्वातंत्र्याची पाठराखण १०० टक्के निर्विवादपणे करतेवेळी काही ‘परंतु’ उरणार आहेत.. किमान एक तरी मोठा प्रश्न उरणारच आहे. प्रसंग कितीही दु:खाचा, कितीही निषेध करण्याजोगा असला तरी तो प्रश्न पुसून नाही टाकता येणार.

भाषणस्वातंत्र्य आणि द्वेषोक्तिस्वातंत्र्य (इंग्रजीत ज्याला ‘हेट स्पीच’ (मराठीत ‘द्वेषोक्ती’) म्हणतात, तसे बोलण्या/ लिहिण्याचे स्वातंत्र्य) यांमधली सीमारेषा काय, हा तो प्रश्न. एखाद्याला जे बोलणे / लिहिणे भाषणस्वातंत्र्याचा भागच वाटते, तो दुसऱ्याला ‘द्वेषोक्ती’ वाटू शकेल. मुळात त्याही आधीचा प्रश्न म्हणजे कुणाचे भाषणस्वातंत्र्य. ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता/शक्ती नसते त्यांना भाषणस्वातंत्र्य वगैरे असते का. कुणीतरी ‘सेलेब्रिटी’ मंडळी ध्वनिक्षेपक हातात घेऊन जे बोलतात ते भाषणस्वातंत्र्य असेल तर कुणा गरिबाचे तळतळाट किंवा तेवढेही करण्याच्या परिस्थितीत नसलेल्यांचे कण्हणे हेही भाषणस्वातंत्र्यच मानले जाते का?

भाषणस्वातंत्र्याचा हक्क हा ‘ऐकून घेतले जाण्याच्या हक्का’शिवाय असूच शकत नाही. जे काही मी बोललो/ लिहिले ते कुणी ऐकूनही घेणार नसेल, त्याची दखलच घेणार नसेल, तर माझे ते म्हणणे आणि म्हणणारा मी, दोघेही बेदखल असतो. हा झाला ‘भाषणस्वातंत्र्य कशाला म्हणावे’ या प्रश्नाच्या चर्चेतला एक भाग. दुसरा भाग भारतासारख्या देशात कशाहीवरून ‘भावना दुखावल्या’, ‘धार्मिक भावना दुखावल्या’, हे आक्षेप असतात त्याविषयी. तो असा की, भाषणस्वातंत्र्याचा हक्क हा भावना दुखावण्याइतपत धर्मद्रोही वक्तव्य करण्याचा, खिल्ली उडवण्याचा, उपहास करण्याचा हक्कही असतो का? जर तो तसा नसेल तर आज यांच्या भावना दुखावल्या, उद्या त्यांचा अवमान झाला, परवा आणखी कुणाच्या धर्माची नालस्ती झाली.. अशा आक्षेपांच्या भोवऱ्यांत गरगरत राहण्यापेक्षा आणि ‘माझा तसा हेतू नव्हता’ वगैरे दिलगिऱ्यांचा जुलमाचा रामराम घालण्यापेक्षा भाषणस्वातंत्र्यालाच कायमचा रामराम- किंवा कायमचा खुदा हाफिज- करणेच बरे, असे नाही का वाटणार कुणाला? अशा जुलमाच्या रामरामांचा धसका घेण्यातून आपण केवळ भाषणस्वातंत्र्यालाच पारखे होत नसून, आपापल्या भाषांमधल्या वैविध्याला, ऊर्जेला आणि कल्पनाशक्तीला मुकत असतो. वाक्प्रचार आणि म्हणींतूनसुद्धा भावना दुखावू लागल्या तर भाषेचा ठसका निघून जातो आणि उरते मिळमिळीत पुळकवणी- निवेदकांसारखी गोडगोड भाषा.

मी कुठल्या बाजूचा आहे, हे इथवरच्या विवेचनातून स्पष्टच झाले असेल, पण तरीही किंतु-परंतु का आहेत, तरीही मी स्वत:वरच कचखाऊपणाचा आरोप का करतो आहे, हे मला तात्त्विकदृष्टय़ा समजून घ्यावे लागेल. त्यासाठी भाषेच्या पलीकडे, जगाकडे पाहावे लागेल. या जगाकडे आज साकल्याने पाहाणे कठीण व्हावे इतकी विषमता जगात आहे. ती केवळ आर्थिक नसून सामाजिक विषमताही आहे आणि यातून जगाचा सत्ता-असमतोल पुरेसा स्पष्ट झालेला आहे. अप्रिय, पण अगदी ताजे उदाहरण म्हणजे २०२२ च्या फेब्रुवारीत जेव्हा युक्रेनहून अन्य युरोपीय देशांकडे निर्वासित येऊ लागले, तेव्हा त्यांचे झालेले कौतुक! या गौरवर्णीय, सोनेरी केसांच्या आणि निळय़ा डोळय़ांच्या निर्वासितांना युरोपीय देशांनी सहज येऊ दिले, माणसासारखेच वागवले.. तसे अन्य देशांतून आलेल्या, अन्य वर्णाच्या, अन्यरंगी केस वा डोळे असलेल्या निर्वासितांबद्दल झाले होते का? त्या ‘अन्य’ देशांतल्यांबद्दलचे जे पूर्वग्रह पक्के असतात, ते न बोलता दिसतात. शतकानुशतके हेच पूर्वग्रह ‘अन्य’ देशीयांना, इतर समाजातल्यांना सहन करावे लागतात. अशा अनेक समाजांना आणि त्यातील माणसांना इतके वंचित ठेवले जाते की, आपल्याबद्दल काय ‘म्हटले जाते’ आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यातही वेळ जातो. अशा वेळी उद्रेक, हिंसा हाच जणू अशा समाजातल्या लोकांचा ‘उद्गार’ ठरतो.

या हिंसक हुंकाराचा उच्चार करण्याचे ‘स्वातंत्र्य’ त्यांना हवे असते.. जसे सत्ताधारी, शिरजोर, शिक्षित समाजांना भाषणस्वातंत्र्य हवे असते तसेच! ज्यू आणि पॅलेस्टिनी यांच्यापैकी कुणाची बाजू युरोपीय वा अमेरिकेसारखे देश ‘अधिक चांगल्या प्रकारे’ समजून घेतात ते पाहा.. मग मला काय म्हणायचे आहे ते उमगेल आणि पॅलेस्टिनींसारखा एखादा समाजगट दशकानुदशके संघर्षरतच का राहातो आहे, याचीही जाणीव होऊ शकेल.

हिंसेचे समर्थन केल्याचा आरोप करण्यापूर्वी काही खाचाखोचा नक्की समजून घ्या.. जेव्हा अमेरिका कुठल्याही देशानजीक युद्धनौका पाठवते, त्या देशातच सैन्य पाठवते, तेव्हा त्या सैन्याने कितीही हिंसा केली तरी त्याचे समर्थन करण्याचे मार्ग उपलब्ध असतातच, होतेच, हे लक्षात घ्या. तसेच, ‘माझ्यावर अन्याय झाला’ असा दावा करणाऱ्या प्रत्येकावर सारख्याच प्रमाणात अन्याय झालेला असतो का, हेही पाहा. कुठल्याही देशावर निर्बंध घालताना पाहिला किंवा कल्पिला गेलेला अन्याय, पॅलेस्टिनींवरचा अन्याय आणि एखाद्या झुंडबळीवर झालेला अन्याय किंवा ‘त्याने खून केला असता’ म्हणून न्यू जर्सीत ज्याचा गळा व्यवस्थेने दाबला त्याच्यावरचा अन्याय.. हे सारखेच असतात का? युरोपातील वसाहतवादी देश आणि अमेरिका हे जगाच्या नकाशाकडे पाहण्याच्या त्यांच्या दिशेनुसार ‘मध्यपूर्वे’ला असलेल्या देशांशी गेले सुमारे शतकभर जसे वागले, त्याचा ‘खदखदता राग’ असण्याची मुभा असणे, याकडे आपण निव्वळ तात्त्विकदृष्टय़ा – उच्चारस्वातंत्र्याचाच पुढला भाग म्हणून- पाहू शकतो का? तसे जर निव्वळ तात्त्विकदृष्टय़ा पाहिले तर मग हेही लक्षात येईल की धर्म, प्रेषित, त्याचा अवमान का अपमान झाल्याचा आरोप करणे आणि त्यासाठी हिंसक कारवायांना तयार होणे.. वगैरे सारे ‘उच्चार’च मानावे लागतील. यातून पुढे असेही दिसते की, शतकानुशतके जे गप्प बसले, त्यांना त्यांच्या उशिरा मिळवलेल्या उच्चारस्वातंत्र्यासाठी ‘इतिहास’ नावाचे हत्यार उपयोगी पडते आहे. असे होताना दिसते, कारण या समाजांमधले इतिहासदत्त जडत्व त्यांना पुन्हा इतिहासाकडेच नेते आहे आणि तो इतिहासच कधी धर्माच्या, कधी प्रेषिताच्या वा कुणा दैवताच्या नावाखाली उद्गार शोधतो आहे. तो उद्गार आज हिंसक आहे. असा इतिहासाभिमानी वा धर्माधांचा हिंसक उद्गार आणि तथाकथित उदारमतवादी लोकांनी, देशांनी, समाजांनी त्या हिंसेमागची कारणपरंपराच समजून न घेणे अशा अनर्थकारी ‘अर्थव्यवस्थेत’ आपले वैचारिक व्यवहार आज सुरू आहेत. एकमेकांच्या उच्चार-उद्गारांचा अर्थ लावण्याऐवजी इथे ‘अनर्थ’च शोधला जातो आहे. ऐकणारे दोन्ही बाजूंना कमी. त्यामुळे इथे नालस्ती करणारे आणि नालस्ती झालेले, भावना दुखावणारे आणि भावना दुखावलेले यांचा व्यवहार होण्यासाठी धर्म, प्रेषित वगैरे फारच उपयुक्त ठरत राहणार. अगदी उभयपक्षी उपयुक्तच. ही अनर्थाची कोंडी जोवर कोणीच फोडत नाही तोवर, (खेदाने म्हणावे लागते की,) सलमान रश्दींवर झाला तसे हल्ले हे ‘आनुषंगिक बाब’ मानावे लागणार.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman rushdie speech freedom expression attack ysh

Next Story
‘समान नागरी कायदा’ का झाला नाही?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी