writer reader world salman Rushdie expression Violent ysh 95 | Loksatta

रश्दी, लवकर बरे व्हा..

भोवरा छान फिरत असतो, त्याच्या गिरक्या सुरूच असतात, पण मध्येच एका क्षणी तो डुगडुगत गिरक्या घेऊ लागतो.. तेव्हा वाटतं, संपणार आता त्या गिरक्या- गेला भोवऱ्याचा डौल.

रश्दी, लवकर बरे व्हा..
सलमान रश्दी

वास्वो एक्स. वास्वो

एवढंच, इतकंच म्हणू शकतो आपण.. कारण आता आपलंही जग बदललंय खूप!

भोवरा छान फिरत असतो, त्याच्या गिरक्या सुरूच असतात, पण मध्येच एका क्षणी तो डुगडुगत गिरक्या घेऊ लागतो.. तेव्हा वाटतं, संपणार आता त्या गिरक्या- गेला भोवऱ्याचा डौल. आपल्या लेखक-वाचकांच्या जगाचा भोवरा असा डुगडुगू लागण्याचा क्षण १९८९ मध्ये आला.. रश्दींविरुद्ध काढल्या गेलेल्या फतव्यापासून ते सारं सुरू झालं. तेव्हापासून आजपर्यंत अभिव्यक्तीला मिळणारी आव्हानं अधिकाधिक हिंसक होताहेत. फतवा निघाला, त्या वेळी पुरोगामी, उदारमतवादी म्हणवणारे काही बाजारशरण झालेले नव्हते- त्यांना नीतिमत्तेची चाड होती, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची आच होती. त्या वेळच्या परंपरावाद्यांनाही, कुणी तरी ज्या अन्यायाविरुद्ध उभं राहातं आहे तो खरोखरच अन्याय आहे याची जाणीव नक्कीच होती. पाश्चात्त्य देशांमधले, जपान, ऑस्ट्रेलियातले आणि भारतातलेही उदारमतवादी लोक सलमान रश्दी यांच्या ‘सॅटानिक व्हर्सेस’च्या बाजूनं उभे राहिले, तरीही भारतात त्यावर बंदी आलीच. धोरण ठरवताना विवेकापेक्षा भीती महत्त्वाची ठरते अनेकदा. पण रश्दींना सशस्त्र संरक्षण देऊन अज्ञातवासात किंवा त्या वेळी नवीनच वाटलेला शब्द वापरायचा तर ‘सुरक्षित स्थळी’ ठेवण्यात आलं, आणि अमेरिकेत वगैरे तर पुस्तकाचा खप वाढलाच.

आधीच कबुली देतो.. मी ‘ते’ पुस्तक वाचलेलं नाही. रश्दींची निराळी पुस्तकं वाचलीत. ‘द मूर्स लास्ट साय’, ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’, ‘शेम’ आणि ‘शालिमार द क्लाउन’ ही चार पुस्तकं वाचली, त्यापैकी ‘मूर्स लास्ट साय’ हे मी वाचलेलं रश्दींचं पहिलं पुस्तक. केरळ बॅकवॉटर्सच्या सहलीवर असताना, एका शांत व्हरांडय़ात हे पुस्तक वाचून काढलं. या कादंबरीतली ऑरोरा झोगोइबी कोचीमधल्या सिनेगॉगमध्ये जाते, मट्टनचेरीच्या मसाले-बाजारात हिंडते.. या जागांवर कालपरवाच मीही जाऊन आल्यानं रश्दींच्या वास्तवदर्शनाचा प्रत्यय येत होता. या कादंबरीचा भाग एक वाचून संपवला तेव्हा या ऑरोरा झोगोइबीनं रंगवलेली चित्रं ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त पाहण्यासाठी दिल्लीला जावंसं वाटू लागलं होतं मला! आश्चर्य म्हणजे, दिल्लीच्या ‘जयपूर हाउस’मध्ये ऑरोराची चित्रं जिथं असल्याचं वर्णन रश्दींनी केलंय तिथंच, तंतोतंत त्याच जागी चित्रं आहेत.. ऑरोराचं पात्र जिच्यावरून बेतलंय त्या अमृता शेरगिलची.

गोव्यात राहू लागलो तेव्हा घरच्याच व्हरांडय़ात रश्दींची दोन पुस्तकं वाचली. ती दोन्ही वाचून संपवतेवेळी माझं काय झालं होतं हे आजही आठवतं. ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ मिटताना डोळे पाणावले होते आणि ‘शालिमार द क्लाउन’ संपवून उठायचं सुचत नव्हतं. कारण आसपास अंधार पडलाय, आपण कुठल्या तरी कडय़ावर आहोत, अशी भावना होती. एका ‘प्रोफेश्वर’ मित्रानं – ‘काय ते रश्दी? त्यांना अर्धविराम कुठे वापरायचा माहीत नाही; अन् म्हणे मोठे लेखक!’ अशी शेरेबाजी केल्यानंतरही, गोष्ट सांगण्याच्या रश्दींच्या कौशल्याला तोड नाही, हे माझं मत कायम राहिलं होतं. त्यांचं ‘शेम’ वाचलं ते श्रीलंकेला गेलो होतो तेव्हा. कॅन्डीमधल्या एका निवांत चहा दुकानात वाचत होतो दुपारी. त्या छोटय़ाशा रेस्तराँच्या मालकाला मी कुणाचं पुस्तक वाचतोय हे दिसलं आणि लगबगीनं माझ्या टेबलाशी येऊन म्हणाला, ‘धिस मॅन इज ए व्हेरी बॅड मॅन’. मी पुस्तक मिटलं, निमूट चहा पिऊ लागलो, विषय संपला.

पण रश्दींचा विषय असा संपतो का? नाही, हेच तर दिसतंय.. रश्दींच्या कथा जशा वाढतच जातात आणि त्यांमधली वाक्यंसुद्धा संपणार नाहीत की काय असंच वाटत राहातं, तसंच झालंय हे..

त्यानंतर काही काळातच (नोव्हेंबर २००४) थिओ व्हॅन गॉख या तरुण डच चित्रपटकाराच्या हत्येची आणि ती करणाऱ्यानं पाश्चात्त्यांना दूषणं देणारं टिपण थिओच्या मृतदेहावरच टाचल्याची बातमी आली. आणखी काही महिन्यांनी मूळची सोमालियाची पण डच नागरिकत्व स्वीकारून नेदरलँड्सच्या कायदेमंडळाची सदस्य झालेली अयान हिरसी अली हिलादेखील जिवाच्या धमक्या येऊ लागल्यानं अज्ञातवासात जावं लागलं. जगातली सहिष्णुता आटतच चालली आहे, मोकळी हवा कमी-कमी होते आहे.. हे जाणवत असताना, त्यामागचं कारण आता फक्त इस्लामी कट्टरवाद एवढंच उरलेलं नाही, हेसुद्धा माझ्यासह अनेकांना जाणवू लागलं होतं.

शब्दसुद्धा आता ‘हिंसक’ मानले जाऊ लागले. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा वादाचा विषय ठरला आणि ‘भावना दुखावण्या’चे प्रकार पाश्चात्त्य देशांमध्ये (नव्यानेच) घडू लागले. ही ‘दुखावणे संस्कृती’ युरोपात, अमेरिकेत आधी कधी नव्हती. या शब्दांमुळे प्रत्यक्ष हिंसाचार होणं, हे तर गेल्या शंभर वर्षांत पाश्चात्त्यांनी ऐकलं नसेल, पण अखेर हे भावना दुखावण्याचे प्रकार अंगवळणी पडू लागले आणि ‘ट्रिगर वॉर्निग’ यांसारख्या इशाऱ्यांमधून, आधीच त्याबद्दल दिलगिरीसारखा सूरही लावला जाऊ लागला. जे म्हणायचं ते सरळ म्हणायचंच, हा जुना शिरस्ता मोडून जाताना माझ्या पिढीनं पन्नाशीनंतर पाहिला. मग आपलं म्हणणं मांडताना ‘काळजी घेण्या’चं बंधन आलं- नाही तर हिंसक प्रतिक्रियेची भीती! ही हिंसक प्रतिक्रिया म्हणजे नेहमीच जीवघेणा हल्ला असेल असं नाही, पण वाळीत टाकणं, सामाजमाध्यमांवरून हद्दपार करणं, विद्यापीठांच्या व्यासपीठांवर जागा न देणं, नोकरी गमवावी लागणं.. हेही प्रकार हिंसकच आहेत. शारीरिक हिंसेऐवजी सामाजिक, आर्थिक हिंसा. ‘शेम’ हे केवळ रश्दींच्या पुस्तकाचं नाव राहिलं नसून आता ‘तुला शरम वाटली पाहिजे’ हे अनेकदा, अनेकांना, अनेक कारणांवरून कर्कश आवाजात सुनावलं जातं आहे.

‘शार्ली एब्दो’ या नियतकालिकाच्या कार्यालयात घुसून झालेल्या भीषण हत्याकांडानंतर अभिव्यक्तिस्वातंत्र्याला बळ देण्यासाठी जगभरचे नेते एकत्र आल्याचं चित्र दिसलं होतं. पण हा एका दिवसाचा प्रतीकात्मक कार्यक्रमच म्हणायचा.. कारण त्यानंतर कित्येक आठवडे शार्ली एब्दोच्या व्यंगचित्रकारावर ‘इस्लामद्वेष्टे’पणाची टीका होत राहिली. ती विशिष्ट चित्रं काही दर्जेदार व्यंगचित्रं नव्हती हे खरंच. पण जे झालं, त्या साऱ्याच घटनाक्रमातून परिस्थिती झपाटय़ानं चिघळत गेली.

किती चिघळावी, किती बदलावी परिस्थिती? तर आता ‘भावना दुखावण्यापासून स्वातंत्र्य’ हेच अभिव्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा मोठं मूल्य ठरतं की काय अशी स्थिती आहे आणि पाश्चात्त्य विद्यापीठं तर या बाबतीत फारच हुळहुळी होऊन नाना तऱ्हेच्या काळज्या घेऊ लागली आहेत. ही काळजी घेण्याची काजळी आता सर्वदूर पसरते आहे. फेसबुकवर काही लिहिताना काळजी घ्या, ट्विटरवर कमीत कमी शब्दांची टिप्पणी करतानाही काळजी घ्या आणि इन्स्टाग्रामवर एखादी प्रतिमा धाडतानाही काळजी घ्याच. कुणाच्या भावना कधी दुखावतील याचा तर नेम नाहीच, पण समाजमाध्यमांतली तुमची कुठली नोंद आक्षेपार्ह ठरवायची याचे सर्वाधिकार आता समाजमाध्यमांच्या मालक-कंपन्यांकडे आहेत, या कंपन्या सरकारच्या जोडीनं (की कलाकलानं) काम करतात आणि सरकारमध्ये तुमची ‘पोहोच’ असली तरच तुम्ही कारवाईतून सुटता, हे सारं आता उघड गुपित आहे. अशा वातावरणात आपण सलमान रश्दींना ‘लवकर बरे व्हा’- इतकंच म्हणू शकतो.. त्या हल्ल्यानंतर रश्दींचं जग कायमचं बदलून जाईल, याची जाणीव आपल्याला आहेच.. पण आपलंही जग केवढं पालटलेलं आहे, याची आचसुद्धा आपल्याला असायला हरकत नाही!

वास्वो एक्स. वास्वो हे मूळचे अमेरिकन लेखक व दृश्यकलावंत. गेली अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य भारतात असून गेले दीड दशकभर ते उदयपूर येथील राजस्थानी दृश्यकलावंतांसह काम करतात.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘हिंदू भारताच्या’ वास्तवाचा शोध

संबंधित बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाला ‘ओझे’ म्हणणे ही नाण्याची एक बाजू…
राष्ट्रकुल संघटनेचे काय होणार?
सरकारच्या पुढल्या १०० दिवसांत तरी रात्रशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या व्हाव्यात…
स्पर्धा परीक्षांमधील यशाचा इतका जल्लोष करणे योग्य नाही…
मानवकल्याणासाठी एकत्र येऊ या..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत
मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम   
अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे
प्रवीण दरेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा ; मुंबै बँक कथित घोटाळय़ातून नाव वगळले  
ठराविक उद्योजकांना खूश करण्यासाठी प्लास्टिकवरील निर्बंध शिथिलच पर्यावरणप्रेमींचा आरोप