ब्रिटनच्या राणीच्या अमात्य आणि कारभाऱ्यांनी गतवर्षी जरा जास्तच उधळपट्टी केल्याने राणीला आता अंथरूण पाहून पाय पसरण्याची वेळ आली आहे. तेथे राजेशाहीविरोधी चळवळ आक्रमक होत असली तरी राजेशाही ही तेथील बहुसंख्यांची मानसिक गरज आहे, हेही तितकेच खरे.
अंथरूण पाहून पाय पसरावेत, ही म्हण ब्रिटनच्या राणीला ठाऊक असण्याचे कारण नाही. ते खासच भारतीय मध्यमवर्गीय शहाणपण आहे. यात अंथरूण वाढविण्याचे धाडस बसत नाही. त्याऐवजी पाय आखडून घेण्याला महत्त्व असते. त्यालाच परंपरागत व्यवहारज्ञान समजण्याची पद्धत असते. हे असे व्यवहारज्ञान ब्रिटनच्या राणीकडे असणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. एके काळी ज्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता त्या ब्रिटनच्या सम्राज्ञीला अशा मानसिकतेचा वारा शिवणे कदापि अशक्यच. पण सध्याची ब्रिटनच्या राणी धाकटय़ा एलिझाबेथ यांची परिस्थिती पाहता जुन्या काळातील कादंबऱ्यांप्रमाणे, हाय रे दैवा! कालगतीची तऱ्हाच न्यारी! असेच काहीसे उद्गार काढावे लागतील. उंच नाकेल्या ब्रिटिश मानसिकतेचा मानिबदू असलेल्या या राणीची आíथक स्थिती सध्या एखाद्या पेन्शनीत निघालेल्या वृद्धेप्रमाणे झाली आहे. महागाई एवढी वाढली आहे की निवृत्तिवेतनातून आणि उत्पन्नातून रोजचे खर्च भागत नाहीत. गंगाजळी आटली आहे. राहत्या वाडय़ाची अवस्था बिकट झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पण पशाचे सोंग आणता येत नाही. ब्रिटनच्या राणीला आता अंथरूण पाहून पाय पसरण्याची वेळ आली आहे. एखाद्या खालसा संस्थानाच्या नामधारी राजाप्रमाणे कापे जाऊन भोकेच तेवढी उरावीत अशी राजघराण्याची अवस्था झाली आहे. एकंदर वुडहाऊसी उपहासास भरपूर मालमसाला मिळावा अशीच ही परिस्थिती. अर्थात काहीही झाले तरी ब्रिटनची राणी म्हणजे काही पोस्टाच्या ठेवीवरील व्याजातून कसेबसे दिवस कंठणारी कोणी गंगाभागीरथी नव्हे.
अखेर हे अंथरूण आणि पाय दोन्हीही राजघराण्याचेच. त्यामुळे ते सारे मोठेच असणार. राणीचे उत्पन्न मोठे असणार आणि खर्चही. समस्या निर्माण झाली, ती या खर्चावर योग्य नियंत्रण नसल्याने. ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहाच्या एका समितीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०१२-१३ या आíथक वर्षांत राणीच्या अमात्य आणि कारभाऱ्यांनी जरा जास्तच उधळपट्टी केली. त्यामुळे खजिन्याने अगदीच तळ गाठला. २००१ मध्ये ज्या खजिन्यात ५८ दशलक्ष डॉलरहून अधिक रक्कम होती, त्या खजिन्यात आता केवळ १.६ दशलक्ष डॉलर एवढाच निधी राहिला आहे. एरवी शेअर बाजारातील निर्देशांकासंदर्भात ऐतिहासिक नीचांक हा शब्द ऐकावयास मिळतो. तो आता राणीच्या खजिन्याबाबत वापरला जाऊ लागला आहे. या समितीने राणीच्या एकूण नियोजनावरही ताशेरे ओढले आहेत. अठराव्या शतकात बांधण्यात आलेला बकिंगहॅम पॅलेस आणि अकराव्या शतकातला बर्कशायरमधील िवडसर कॅसल म्हणजे राजघराण्याचीच नव्हे, तर ब्रिटनची शान. पण आज त्या बडय़ा घराचा वासाही पोकळ झाला आहे. काही ठिकाणी राजवाडय़ाचे छत गळत आहे. तेथील पावणेआठशे खोल्यांपकी अनेक खोल्यांची गेल्या साठ वर्षांत नीट साफसफाईही करण्यात आलेली नाही. तेथील बॉयलरसुद्धा ६० वर्षांपासून बदललेला नाही. काही वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसमधील विटा निखळून पडल्या होत्या. त्यात राजकन्या अॅनचा कपाळमोक्षच व्हायचा, पण त्या थोडक्यात बचावल्या. आजही त्या अवस्थेत काही सुधारणा नाही. म्हणजे त्यांच्यावर अगदीच पालिकेची नोटीस चिकटविण्याची वेळ आलेली नाही. पण समितीच्या म्हणण्यानुसार त्यांची स्थिती ‘स्वीकारण्यापलीकडील’ आहे. हे बदलण्यासाठी समितीने काही उपायही सुचविले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, राणी स्कॉटलंडमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेली, की बकिंगहॅम राजवाडा पर्यटकांना पसे घेऊन दाखविला जातो. तो वर्षांतील अधिक काळ पर्यटकांसाठी खुला ठेवावा. म्हणजे त्याच्या तिकिटविक्रीतून अधिक पसे मिळतील. ब्रिटनच्या राणीने काटकसर करावी असाही या समितीचा सल्ला आहे. यावरून आता अपेक्षेनुसार जोरदार वादचर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासून राजेशाही हवी की नको, यावर हिरिरीने वाद होत आहेत. ते पुन्हा एकदा लंडनच्या पब्जपासून प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत सर्वत्र सुरू झाले आहेत.
वरवर पाहता हा प्रश्न राजेशाही हवी की नको असा वाटत असला, तरी मूलत: तो परंपरा आणि आधुनिकता यामधील वाद आहे. राजेशाही हे केवळ ब्रिटिश परंपराप्रियतेचे प्रतीक आहे. ब्रिटन ही कोणे एके काळी जागतिक महासत्ता होती. सगळ्या अडाणी आणि असुसंस्कृत जगाला सुधारण्याचे ‘गोऱ्या माणसाचे ओझे’ आपल्याच पाठीवर आहे अशी ब्रिटिश जनतेची मन:पूर्वक खात्री होती. ब्रिटनच्या वसाहतींना आपला प्राचीन वारसा, परंपरा, ज्ञान यांची जाण आल्यानंतर या ओझ्याची मिजास कमी झाली. पुढे दुसऱ्या महायुद्धात जिंकूनही ब्रिटन हरले आणि ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य मावळला. ती वेदना पचविणे ब्रिटिश जनमनास किती कठीण असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण साम्राज्य गेले असले, तरी ब्रिटनची राणी ही आजही ब्रिटनसह राष्ट्रकुलातील १६ देशांची राष्ट्रप्रमुख आहे. ही परंपराप्रिय ब्रिटिशांसाठी तशी दिलासादायकच बाब. पण या ब्रिटिश जनमनाची आणि तसे पाहिल्यास एकूणच युरोपीय मानसिकतेची एक समस्या आहे. राजेशाही वारशाची ओढ आणि त्याच वेळी लोकशाहीबाबत हार्दकि आस्था असा एक वेगळाच आंतर्विरोध घेऊन ही राष्ट्रे वावरत असतात. ब्रिटन, नॉर्वे, स्वीडन यांसारख्या देशांनी राजेशाही हे लोकशाहीचेच एक अंग बनवून या विसंगतीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यपूर्वेतील राजेशाही असलेल्या देशांत हे आढळणार नाही. तेथे राजा हाच सार्वभौम आहे. ब्रिटनमधील राणी ही मात्र आपल्याकडील राष्ट्रपतींप्रमाणे केवळ सहीशिक्क्याची धनीण आहे. तेव्हा तेथील अनेकांचे, प्रामुख्याने साम्राज्यशाही हा ज्यांच्यासाठी इतिहासातील एक कंटाळवाणा धडा आहे अशा तरुण पिढीचे म्हणणे असे, की देशाच्या तिजोरीवर या नामधारी पदाचा भार तरी कशाला? ते रद्द करा. अलीकडे ब्रिटनमधील ही राजेशाहीविरोधी चळवळ अधिक आक्रमक होऊ लागली आहे. मध्यंतरी राजघराण्यात बाळराज्यांच्या जन्माचा उत्सव जगाने मोठय़ा थाटात साजरा केला. त्या वेळी ब्रिटनमधील प्रजासत्ताकवाद्यांनी चालविलेल्या जोरदार मोहिमेतूनही या आक्रमकतेची प्रचीती आली होती. या ब्रिटिश रिपब्लिकन चळवळीच्या संकेतस्थळानुसार आज ब्रिटनमध्ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्के लोक प्रजासत्ताकवादी आहेत. त्यांना राजेशाही नको आहे. पण याचा दुसरा अर्थ असा होतो, की उरलेल्यांतील बहुसंख्यांचा राजेशाहीला पािठबा आहे. आणि त्याहून त्याचा व्यापक अर्थ असा आहे, की राजेशाही ही बहुसंख्यांची मानसिक गरज आहे.
माणसाच्या मनातील स्वातंत्र्याच्या भयातून निर्माण झालेली गुलामीची सवय असे याला कोणी म्हणू शकते. ही भावना देवाच्या, धर्माच्या संदर्भात असते. युरोपबाबत बोलायचे तर ती पूर्वी चर्चच्या संदर्भात होती. तशीच ती राजाच्या बाबतीतही असते. राजा हा परमेश्वराचा अवतार हा तर राज्यशास्त्रातील प्रतिष्ठित सिद्धांत होता. त्यातूनच निरंकुश राजसत्तेची निर्मिती झाली. आज लोकसत्ताक राज्यव्यवस्थेत त्या निरंकुशतेला स्थान नाही. तेथे लोकच सार्वभौम. मात्र राजाप्रति असलेली भावना काही जनमनातून लोपलेली नाही. लोकांना या ना त्या रूपात राजा हवाच असतो. तो कधी एखादा धर्मगुरू असतो, कधी एखादा नेता. भारतासारख्या देशात लोकप्रतिनिधींनाच प्राप्त झालेला राजाचा दर्जा वा राजकीय घराणेशाहीवरील निष्ठा हे याचेच रूप आहे. लोकनेत्यांच्या कच्च्याबच्च्या मुलांच्या हाती चांदीच्या तलवारी देऊन आपण जेव्हा त्यांचा उदोउदो करतो तेव्हा त्यातून हीच, आपल्या गुणसूत्रांतून लपलेली राजेशाहीची ओढ स्पष्ट होत असते. एकूण ब्रिटिशांचे ‘गॉड सेव्ह द किंग/क्वीन’ आणि आपले ‘जनगणमन अधिनायक जय हे’ यात फारसा फरक नाहीच. ब्रिटनमध्ये ते मान्य केले जाते आणि आपण त्यावर मौन साधतो एवढेच.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
गॉड सेव्ह द क्वीन!
ब्रिटनच्या राणीच्या अमात्य आणि कारभाऱ्यांनी गतवर्षी जरा जास्तच उधळपट्टी केल्याने राणीला आता अंथरूण पाहून पाय पसरण्याची वेळ आली आहे.
First published on: 01-02-2014 at 01:56 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: God save the queen