आता प्रत्येक टप्प्यावर काही ना काही यांत्रिकीकरण आले आहे. श्रमाला सुकर करणाऱ्या आणि मजुरांनाही ढोरकष्टातून मुक्ती देणाऱ्या यांत्रिकीकरणाचे स्वागतच करायला हवे. असे घडत मात्र नाही. तुम्ही यांत्रिकीकरणाबद्दल बोलू लागलात म्हणजे तुम्ही लगेच ‘मजूरविरोधी’ अशी भूमिका घेतली जाते. ज्यांना राबायचेच नाही त्यांना असे बोलून मोकळे होता येते. पण ज्यांना राबायचे आहे त्यांचा कष्टाचा शीण हलका करणारी यांत्रिकता जिथे कुठे असेल तिचा स्वीकारच करायला हवा.
जेव्हा शेतातल्या पिकांना दांडातून पाणी दिले जायचे तेव्हा विहिरीतले पाणी उपसण्यासाठी मोट-नाडा हेच साधन होते. दोन बलांच्या आधाराने पाणी उपसले जात असे. जेव्हा भूगर्भातल्या पाण्याचा उपसा फार होत नव्हता तेव्हाचा हा काळ आहे. जुन्या कृष्णधवल मराठी चित्रपटात अजूनही हे दृश्य दिसते. मोट हाकणारा काहीतरी शीळ घालतोय आणि थारोळ्यात बदा-बदा पाणी मोटेद्वारे पडत आहे. थारोळ्यातून दांडात आणि नंतर पिकांना ते पाणी जाई. तरीही हे पाणी कमीच होते. मोट हाकून-हाकून अशी किती जमीन ओलिताखाली येणार? त्यानंतर इंजिन आले, विहिरीवर कृषिपंप बसला आणि जणू हे शेतीधंद्यावरचे आक्रमणच आहे अशी चर्चा सुरूझाली. या कृषिपंपाचा आवाज मग अनेकांना बेसूर वाटायला लागला. शिवार या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने भयभीत झाल्याचा भास अनेकांना व्हायला लागला. शेतात असे काही येणे म्हणजे हिरव्या संस्कृतीवरचे आक्रमणच जणू!
आनंद यादव यांची ‘गोतावळा’ ही कादंबरी चाळीस वर्षांपूर्वी आली. या कादंबरीत नारबा या शेतमजुराचे, सालदाराचे चित्रण येते. हा नारबा शेतमालकाच्या आखाडय़ावरच्या बलांसारखाच राबतो. गुराढोरांसारखाच जगतो. त्याला कसल्याही आकांक्षा नाहीत. एकूण सगळे जगणे पशुवतच. पण ट्रॅक्टर येतो आणि जणू या हिरव्या संस्कृतीवरच टोळधाड येते. नारबा मुळासह उखडला जातो. ट्रॅक्टरच्या आवाजाने शेतातली जनावरे बुजतात. ट्रॅक्टरच्या आगमनाचे यादवांनी असे वर्णन केले, ‘पिसाळलेल्या हत्तीगत धावला..समदा आवाजच कान एकत्र करणारा..रेडा मुरगाळून घालावा तसा पाठीमागचा योक योक टायर दिसत हुता’.. ट्रॅक्टरचे येणे हे पिसाळल्यासारखे. या ट्रॅक्टरने केले काय तर नारबाला मुळासकट उखडून टाकले. असे वर्णन ‘गोतावळा’मध्ये येते. बरे ट्रॅक्टर येण्याआधी नारबा श्रमाचे पण तरीही सुखाचे जगत होता काय, तर तसेही नाही. ट्रॅक्टर येणे हेच वाईट असे चित्र या कादंबरीतून उभे राहिले. त्याआधीच्या नारबाच्या जगण्याविषयी, जितराबाप्रमाणेच शेतमालकाच्या मळ्यात त्याच्या राहण्याविषयी आपल्याला काय वाटते? हा मुद्दा महत्त्वाचा.. आणि समजा ट्रॅक्टर आलाच नसता तर नारबाच्या पशुवत जगण्याला शब्दरूप मिळाले असते काय? नारबा आहे त्याच व्यवस्थेत खत म्हणून कुजत होता त्याचे काही नाही. पण ट्रॅक्टर आला आणि सगळाच घोटाळा झाला. कारण हिरव्या संस्कृतीवरचे आक्रमण! ट्रॅक्टर नसता आला तरीही नारबाच्या जगण्याचे शेतात खतच होणार होते. पण त्याच्या आकांक्षाविहीन जगण्यापेक्षा ‘गोतावळा’ कादंबरीत ट्रॅक्टरचे येणे जास्त क्लेशकारक असल्याचे चित्रित झाले. बदलांकडे पाहण्याची आपली दृष्टी त्यातून ध्यानी येते.
चाळीस वर्षांपूर्वी शेतीधंद्यात फक्त ट्रॅक्टर आला होता. आता प्रत्येक टप्प्यावर काही ना काही यांत्रिकीकरण आले आहे. श्रमाला सुकर, सुलभ करणाऱ्या आणि मजुरांनाही ढोरकष्टातून मुक्ती देणाऱ्या यांत्रिकीकरणाचे स्वागतच करायला हवे. असे घडत मात्र नाही. तुम्ही यांत्रिकीकरणाबद्दल बोलू लागलात म्हणजे तुम्ही लगेच ‘मजूरविरोधी’ अशी भूमिका घेतली जाते. ज्यांना राबायचेच नाही त्यांना असे बोलून मोकळे होता येते. पण ज्यांना राबायचे आहे त्यांचा ताण कमी करणारी, कष्टाचा शीण हलका करणारी यांत्रिकता जिथे कुठे असेल तिचा स्वीकारच करायला हवा. जेव्हा संकरित कपाशीचे बियाणे आले तेव्हा कापसाचे झाड अगदी पाच-सहा फुटांपर्यंत वाढायला लागले. कापसाचा हंगाम संपतो तेव्हा जमिनीतून ही वाळलेली झाडे काढावी लागतात. त्याला पराटी असे म्हणतात. सगळा जीव जरी गोळा केला तरी हे झाड उपटत नसे. पराटी उपटताना दिवसभर हाताला फोड येत असत आणि ते लगेचच फुटतही असत. फोड आलेल्या ठिकाणी हाताला चिंध्या बांधाव्या लागायच्या. त्या वेळी एक लोखंडी चिमटा आला. त्याने ही पराटी उपटणे सोपे झाले. अशा कितीतरी गोष्टी बदलत गेल्या. विहिरीच्या कामी दगड फोडण्यासाठी दारूकाम केले जायचे. आधी ठासून बार भरायचा आणि त्यानंतर एकाने खाली विहिरीत जाऊन वात पेटवायची. त्यानंतर सरसर वर यायचे. जर हा माणूस वर येण्याआधीच स्फोट झाला तर मग संपलेच सगळे. काळ्या पाषाणाचा तडाखा त्याच्यावरच. सगळी जिवावर बेतणारी जोखीम. आता या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडतो आहे. लागवडीच्या, पेरणीच्या, फवारणीच्या, खते देण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आता आतापर्यंत हळदीचे पीक खूप वेळखाऊ आणि किचकट पद्धतीने काढले जायचे. नांगरून जमिनीबाहेर काढलेले कंद कढयांमध्ये शिजवायला टाकले जात असत. पीक जर जास्त असेल तर खूप काळ लागायचा. हे कंद शिजवल्यानंतर वाळवावे लागतात आणि वाळविल्यानंतर घोळून त्याची हळद होते. आता जमिनीतून बाहेर काढलेले कंद प्रचंड मोठय़ा आकाराच्या कुकरमध्ये शिजायला टाकले जातात. कढईपेक्षा यात कंद लवकर शिजतात आणि चांगले शिजतात. उत्तम प्रतीची हळद त्यातून तयार होते. आता छोटय़ातल्या छोटय़ा गावापर्यंत अशा पद्धतीने हळदीचे पीक घेतले जाते. अशा अनेक अंगांनी बदल घडतो आहे. प्रत्येक पिकाच्या काढणीत कुठल्या ना कुठल्या यांत्रिकतेची मदत घेतली जाते. जी माणसे आधी जीव धोक्यात घालून कामे करायची त्यांची जोखीम त्यामुळे कमी झाली.
पूर्वी खेडय़ापाडय़ात पिठाची गिरणी येण्याआधी घरोघर जाते होते. खेडय़ापाडय़ातल्या बायांची दिवसाची सुरुवातच जाते ओढण्याने होत असे. दिवस उजाडण्याआधी जात्याची घरघर कानी ऐकू यायची. जात्यातून पीठ बाहेर पडायचे आणि मग आपला दिवसभराचा कामाचा शीण हलका करण्यासाठी हा दगड ओढणारी बाई गाणी म्हणत असे. असंख्य लोकगीते मौखिक परंपरेद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली ती जाते ओढता ओढताच. गावोगावी पिठाच्या गिरण्या आल्यानंतर जाते अडगळीला पडले. जाते गेले आणि त्याबरोबरच आपले लोकगीतांचे लोकधनही नष्ट झाले. अशी तक्रार आता वेगवेगळ्या परिसंवादांतून केली जाते. हिरव्या संस्कृतीच्या रक्षकांना या गोष्टीचे वैषम्यही वाटते.
..खेडय़ातली बाई पहाटेपासून कामाधंद्याला जुंपलेली. सकाळची घरची कामे करून दिवसभर शेतात राबराब राबायचे. दिवस मावळताना घरी परतायचे, पुन्हा चुलीला लागून सगळ्या घरादाराचा स्वयंपाक करायचा. सगळ्यात शेवटी जेवायचे. तोवर निम्मी रात्र सरलेली. अशा वेळी ठणकत्या अंगाने पुन्हा सकाळी दिवस निघण्याआधी जाते ओढायचे. यातल्या सगळ्याच जणी आनंदाने जाते ओढत असतील असेही नाही. पिठाची गिरणी आली तेव्हा दिवसभराच्या श्रमातून जर या बाईचा ताण कमी झाला असेल आणि चार-दोन रुपये देऊन त्या काळी पीठ मिळण्याची सोय झाली असेल तर त्याबद्दल वाईट कशाला वाटून घ्यायचे. हातावर पोट असणारी अशी कितीतरी माणसे होती. ज्यांचा संबंध जात्याशीही नव्हता. दिवसभराच्या कामाचा जो मोबदला संध्याकाळी मिळेल त्यावरच या माणसांची रात्री चूल पेटायची. जात्याऐवजी पिठाची गिरणी आली म्हणून लोकगीतांचे काय? अशी हिरव्या संस्कृतीच्या रक्षकांनी हळहळ व्यक्त करण्यापेक्षा बाईच्या दिवसभराच्या काबाडकष्टातून एक काम कमी झाले याबद्दलच खरे तर सुस्कारा सोडायला हवा.