व्हिक्टोरियन, कॅथलिक, सनातनी नीतिमूल्यांना ‘बिकिनी’ या पोहण्याच्या पोशाखाने मोठा धक्का दिला. हा पोशाख आता सत्तरीत पदार्पण करीत आहे.. परंतु वस्त्रांचा प्रवास तर कैक शतके आधीपासून सुरू झाला होता आणि त्यात सांस्कृतिक बदलांची किती तरी स्थानके आली होती..
गे निळावंती कशाला झाकिशी काया तुझी?
पाहू दे मेघांविण सौंदर्य तुझे मोकळे..
सभ्यतेच्या आवरणाखाली आणखी एक मन दडलेले असते. थोडेसे चावट, किंचितसे उच्छृंखल आणि शृंगारप्रिय. ‘सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे’ हे बालकवींचे सांगणे. त्याला चटावलेले असे हे मन. त्या मनाची ही साद आहे. आता त्यात कुणास असभ्य, अश्लील, असुसंस्कृत वाटले तर ऐब त्याच्या नजरेचा. फार फार तर त्याला हा ‘विषय’ समजला नाही आणि ‘तंत्र’ आकलले नाही, असे म्हणता येईल. इतरांचे तसे नसते. दहाएक हजार वर्षांचे संस्कार पचवून तयार झालेले त्यांचे मन. त्यास झाकलेली काया कशी भावणार? तसेही वस्त्र नामक प्रकार अनैसर्गिकच. पहिल्यांदा कधी गुहेतील मानवाने एखाद्या मारलेल्या हिमअस्वलाचे कातडे पांघरले असेल वा कोणा आदिम तरुणीने वल्कले परिधान केली असतील ती कुणाच्या नजरेपासून देह झाकण्यासाठी म्हणून खचितच नसतील. वस्त्रे आली ती उबेच्या गरजेतून. पुढे कधी कोण जाणे ती सभ्यतेशी जोडली गेली आणि त्यांना श्लील-अश्लीलतेचे फॉल आणि पिको लावण्यात आले. काही संस्कृतींमध्ये तर काही वस्त्रेच स्त्रियांसाठी शृंखला बनली. ही कोंडी फोडण्याचा मानवी इतिहासातील पहिला दमदार प्रयत्न कोणी केला असेल तर तो बिकिनी नामक तरणपोशाखाने. जग अद्याप अणुबॉम्ब स्फोटांच्या धक्क्यांतून सावरलेले नसताना तेव्हाच्या मानवी सभ्यतेवर पडलेला हा इटुकला वस्त्रबॉम्ब. गेल्या आठवडय़ात त्याने सत्तराव्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्ताने बिकिनीचा हा जीवनप्रवास समजून घेतला पाहिजे. कारण तो केवळ बिकिनी नामक वस्त्राचा प्रवास नाही. त्यात सांस्कृतिक बदलांची स्थानकेही आहेत.
वस्त्रांच्या दुनियेत सत्तर वर्षे म्हणजे फार मोठा काळ नाही. आपण सारे नेसतो त्या पाटलुणीचे वय तर सुमारे तीन हजार वर्षे एवढे आहे. मध्ययुगात चेंगिझ खानच्या मुघल फौजांनी ती चीनमधून युरोपात नेली. म्हणजे आजच्या विलायती पाटलुणीचे नाते मुघलांशी आहे. आपल्याकडेही विजारीचे आद्य अवतार आले ते शकांच्या टोळ्यांबरोबर. संस्कृत साहित्यातले कूर्पासक नावाचे वस्त्र म्हणजे आजची मराठी कोपरी. तीही मूळची शकांची. हल्लीची सुरवारही त्यांचीच देणगी. मध्य आशियात तिला सोंस्तनी म्हणत आणि संस्कृतात स्वस्थान. पंजाबी भाषेतील सुत्थन ती हीच. भारतातील या सगळ्या वस्त्रांचा इतिहास पहिल्या शतकापर्यंत जातो. त्यामानाने बिकिनी म्हणजे अगदीच बालिका. ५ जुलै १९४६ रोजी लुई रिअर्ड नामक एका फ्रेंच अभियंत्याने तिची रचना केली. जगातील लहानातला लहान तरणपोशाख अशी तिची जाहिरात त्याने केली होती. पण फॅशनच्या राजधानीतही कोणा मॉडेलमध्ये तो पोशाख घालण्याचे धाडस नव्हते. ते वस्त्रच तेवढे स्फोटक होते. मौज अशी की त्याचे नावही अणुबॉम्बशी निगडित आहे. हा पोशाख शिवण्याच्या चार दिवस आधी अमेरिकी लष्कराने मार्शल बेटांतील बिकिनी अटॉल येथे अणुचाचणी केली होती. त्यावरून लुई रिअर्ड यांनी बिकिनी हे नाव दिले. याचा अर्थ त्यापूर्वी स्त्री देहाला असा अनावृततेच्या कडय़ावर आणून उभा करणारा तरणपोशाख अस्तित्वात नव्हता असे नव्हे. शोधू गेल्यास या बिकिनीचे धागेदोरेही इतिहासात सापडतील.

म्हणजे इसवीसन १४०० पूर्वीच्या काही ग्रीक भांडय़ांवर ‘टू पीस बिकिनी’ म्हणता येईल अशा वस्त्रांतील तरुणींची चित्रे सापडली आहेत. इटालीतील सिसिली हा माफियापटांनी प्रसिद्ध केलेला प्रांत. तेथील एका व्हिलामध्ये चौथ्या शतकातील रोमन चित्र आहे. त्यात चक्क टू पीस बिकिनी नेसलेल्या तरुणी चेंडू खेळताना दिसतात. फार काय, अजिंठय़ातील दहाव्या लेण्यामध्ये छदन्त जातक कथेतील राजवाडय़ातील दृश्य आहे. त्यात अर्धजंघिका परिधान केलेल्या वक्षभाग अनावृत असलेल्या तरुणी दिसतात. ते चित्र सातवाहनकालातील. इसवीसन २३०च्या आधीचे. तेव्हा बिकिनीला प्राचीन वारसा नव्हताच असे नाही.
पण मधल्या काळात सामाजिक-वैचारिक वीणच बदलली होती. तेव्हाच्या जगण्याच्या संघर्षांत स्त्रीला भोग्य आणि क्रय वस्तूचे रूप प्राप्त झाले आणि ती झाकून ठेवण्याची बाब बनली. सुती धाग्यांच्या साखळ्या बनविणे तसे सोपे काम. ते मध्ययुगीन समाजाने केले. युरोपात तर हे व्हिक्टोरिअन सोवळे-ओवळे फारच. इतके की औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात तेथील पुढारलेल्या महिला समुद्रात पोहण्यास जात ते सोबत कपडे बदलण्याची खोली घेऊन. ती पाण्यात न्यायची. तेथे कपडे बदलायचे. तेही कसे तर पोहताना उगाच वर येऊन पाय वगैरे दिसू नयेत म्हणून त्या कपडय़ांच्या खालच्या कडेला जड वजने शिवलेली असत. कपडय़ांतून अंगप्रत्यंगांचा अंदाज येणे हेही युरोपात विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत अश्लील मानले जात होते. तीच गोष्ट अमेरिकेची. आज ज्याला टँक सूट म्हणतात तसे तंग कपडे नेसून पोहण्यास गेल्याबद्दल एका तरुणीला अटक झाल्याची घटना अमेरिकेतील बोस्टनमध्ये १९०७ मध्ये घडली आहे. आजच्या सनातनी संस्कृतिरक्षकांना हे ऐकून आपले अमेरिकी पूर्वज भेटल्याचाच आनंद होईल. पण फक्त स्त्रियांवरच नैतिकतेच्या कल्पनांचे केवढे ओझे लादण्यात आले होते याचेच ते उदाहरण आहे. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात युरोपात जी सामाजिक आणि सांस्कृतिक उलथापालथ झाली त्यातून तो समाज बऱ्यापैकी मोकळा झाला होता. तोच नव्हे, तर आपल्या समाजातही हे वारे वाहू लागले होते. आपल्या मीनाक्षी शिरोडकर पेटिकोटसारख्या तरणपोशाखात यमुना जळी खेळ खेळतात तो १९३८ मधल्या ‘ब्रह्मचारी’मध्ये. ते पाहून येथील सनातन्यांच्या शेंडय़ांना किती झिणझिण्या आल्या असतील याची कल्पना करणेही आज अवघड आहे. पण हवा बदलल्याचीच ती चिन्हे होती. तरीही लुई रिअर्ड यांनी १९४६ मध्ये आजच्याच दिवशी पॅरिसमधील माध्यमांसमोर जेव्हा आपली नवनिर्मिती सादर केली तेव्हा त्यासाठी त्यांना नग्ननृत्य करणाऱ्या एका नर्तिकेची निवड करावी लागली होती. त्याही समाजावर अजूनही कॅथलिक नीतिमूल्यांचाच पगडा होता. त्यामुळे युरोपात बिकिनीवर बंदी घालण्याची लाटच आली. व्हॅटिकनने तर बिकिनी परिधान करणे हे पाप असल्याचेच घोषित केले. धार्मिक नीतिमूल्यांना लैंगिकतेचे वावडेच असते. स्त्री ही नरकाचे दार. तिने कमी वस्त्रे परिधान करणे म्हणजे पुरुषाला चाळविणे असे तर आजही मानले जाते. तेव्हा त्या काळात बिकिनीबंदी येणे यात काहीही विशेष नव्हते. अशा वेळी बिकिनीला हात दिला तो चित्रपटांनी. ब्रिजेट बाडरे, बॉण्डसुंदरी उर्सुला अँड्रेस यांसारख्या नायिकांनी बिकिनी लोकप्रिय केली. खेळाच्या मैदानापासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत ती सर्वत्र दिसू लागली.
या वस्त्राने नेमकी काय मानसिक क्रांती केली हे आज समजणे कठीण आहे. स्त्रीला क्रयवस्तू मानण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध स्त्रियांनीच केलेले ते एक बंड होते असे म्हटले तर येथील तमाम स्त्रीवाद्यांनासुद्धा झिणझिण्या येतील. याचे कारण स्त्री ही भोगवस्तू मानण्याच्या प्रवृत्तींनी बिकिनीचे अपहरण केले असल्याचे दिसत आहे. त्यात दोष बिकिनीचा नाही. सामाजिक मानसिकतेचा आहे. आम्ही काय नेसावे हे आम्हीच ठरवू हेच त्या बिकिनी परिधान करणाऱ्या स्त्रिया सांगत होत्या. आज कुणाला ते वावगे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुळात लैंगिकतेचे नाते वस्त्रांशी जोडणे यातच काही तरी गफलत आहे. लिंगपिसाट वस्त्रे पाहात नसतात. तेव्हा ज्यांना कुणाला ही मदनध्वजा मिरवावीशी वाटत असेल त्यांनी ती खुशाल मिरवावी आणि इतरांनी ती घालू नये. इतके ते सोपे आहे.