जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे देश आणि देशप्रेम या भावनांची तीव्रता ओसरली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय टेनिसपटूंच्या सहभागावरून रंगलेला वाद या जागतिकीकरणाचा एक फटकारा आहे. सानिया मिर्झा, लिएण्डर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा हे आपले पदकाचे मुख्य शिलेदार. दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे होणाऱ्या स्पर्धेत त्यांनी सहभागी व्हावे आणि पदक जिंकावे ही अखिल भारतीय टेनिस संघटनेची अपेक्षा. या अपेक्षांना बहुविध कंगोरे आहेत. टेनिस हा वैयक्तिक स्वरूपाचा खेळ आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत असले तरी पुरुष टेनिसपटू एटीपी (असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स), तर महिला टेनिसपटू डब्ल्यूटीए (विमेन्स टेनिस असोसिएशन) या संघटनांचे सदस्य असतात आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार विविध स्पर्धामध्ये सहभागी होतात. प्रत्येक स्पर्धेच्या जेतेपदासह बक्षीस रक्कम आणि क्रमवारीचे गुण मिळतात. वर्षअखेरीस होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्स या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी गुण महत्त्वाचे असतात. प्रशिक्षण, किट, प्रवास-निवास खर्च यासाठी टेनिसपटूंना लाखो रुपये खर्च करावे लागतात. हा खर्च वसूल करण्याचा मार्ग म्हणजे बक्षीस रक्कम. आशियाई क्रीडा स्पर्धा या संघटनांच्या वेळापत्रकाचा भाग नाही. या स्पर्धेत पदक मिळू शकते; परंतु बक्षीस रक्कम तसेच क्रमवारी गुण नाही. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे हा भावनिक मुद्दा झाला. सानिया किंवा लिएण्डर यांनी देशासाठी पदक जिंकावे ही चाहत्यांची भावना बरोबरच आहे, पण व्यवहार्य नाही. देशप्रेमाचे भरते येऊन पदकासाठी प्रयत्न करायचे, की क्रमवारी गुण, बक्षीस रक्कम यांना तिलांजली द्यायची, असा पेच टेनिसपटूंसमोर उभा राहिला. पेस, बोपण्णा व्यवहार्य राहिले, तर मिर्झाने आणखी वाद नको, या भावनेतून देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या डेव्हिस चषकाच्या निमित्ताने भारतीय टेनिसपटू तिरंग्यासाठी खेळले. सर्बियासारख्या मातब्बर देशाला आपल्यामुळे संघर्षपूर्ण विजय मिळवावा लागला, यातच आपली एकीची ताकद काय किमया घडवू शकते, हे सिद्ध झाले. या पाश्र्वभूमीवर इन्चॉनमधील स्पर्धा ही विभागीय स्तरावर वर्चस्व गाजवण्याची सर्वोत्तम संधी आहे, मात्र त्यासाठी खेळाडूंचे मन वळवण्यात अ.भा. टेनिस संघटनेला अपयश आले आहे. अन्य खेळांच्या बाबतीत संघटना खेळाडूंवर हुकूमत गाजवत असल्याचे चित्र आहे; पण टेनिसमध्ये संघटना खेळाडूंसमोर केविलवाणी झाल्याचे चित्र आहे. टेनिसपटू वर्षभर वैयक्तिक स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करत असतात. त्यात अ. भा. टेनिस संघटनेची भूमिका नाममात्र असते. त्यामुळे एरव्ही ‘एकला चलो रे’ मार्ग पत्करावा लागणारे खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई स्पर्धेच्या वेळी संघटनेने दाखवलेल्या देशप्रेमाच्या गाजरासमोर झुकणे कठीण आहे. लंडन ऑलिम्पिकच्या वेळी पेस विरुद्ध बोपण्णा-भूपती यांच्यात रंगलेला कलगीतुरा रोखणे संघटनेच्या आवाक्याबाहेर गेले होते. एकीकडे शालेय वा महाविद्यालयीन स्तरावर खेळ नेण्यात, सार्वजनिक टेनिस कोर्ट्स उपलब्ध करून देण्यात, खेळाडू घडविण्यासाठी प्रशिक्षकांची फळी निर्माण करण्यात संघटनेला अपयश आले आहे. म्हणूनच पेस-सानिया यांच्यानंतरचे युवा खेळाडू प्रशिक्षणासाठी विदेशी रवाना होतात. अंतर्गत सुंदोपसुंदी मिटवून संघटनेने कार्यक्षेत्र रुंदावण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दुसरीकडे टेनिसपटूंची महत्त्वाकांक्षा खेळाला मारक ठरते, हे समजावण्याची वेळ आली आहे. महेश भूपती निर्मित टेनिस लीग सुरू होत असतानाच विजय अमृतराज यांनी स्वत:च्या लीगची घोषणा केली आहे. आता या लीगमध्ये खेळाडूंची विभागणी होऊन तेढ वाढणार हे स्पष्टच आहे. पदकांपेक्षा खेळाडू आणि संघटना अशी जोडी जमल्यास टेनिसची बिनतोड सव्‍‌र्हिस बहरू शकते.