सध्या उत्तराखंडात जलप्रलयाने आपल्या आपत्ती व्यवस्थापनात अनेक त्रुटी असल्याचे दाखवून दिले आहे. या जलप्रलयात कोण कुठल्या ठिकाणी अडकले आहे याची अचूक माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकली नाही. पण आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) पहिल्या दिशादर्शक उपग्रहाच्या माध्यमातून आपण पहिला डोळा उघडला आहे, त्यामुळे कालांतराने आपल्याकडे जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) या दिशादर्शक तंत्रज्ञानाचा वापर सामान्य लोकही अधिक प्रभावीपणे करू शकतील. आपत्ती जरी निसर्गनिर्मित असल्या तरी त्यात होणारी प्राणहानी कमी करण्याकरिता अंतराळ विज्ञानातील प्रगतीचा वापर करणे शक्य आहे, सोमवारी मध्यरात्री यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आलेला आयआरएनएसएस १ए हा उपग्रह या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे म्हणता येईल. दिशादर्शनास वाहिलेला एकही उपग्रह आतापर्यंत भारताने सोडलेला नव्हता. आता हा एकच उपग्रह नव्हेतर सात उपग्रहांची मालिका येत्या २०१५पर्यंत दिशादर्शनासाठी अवकाशात सोडली जाणार आहे. त्या उपग्रहांच्या मदतीने आपल्याला आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध घेणे, जहाजांना अचूक दिशा दाखवणे असे अनेक फायदे मिळणार आहेत. भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली असे या सात उपग्रहांचा समावेश असलेल्या नवीन प्रणालीचे नाव आहे. ताऱ्यांवरून, चुंबकसूचीचा वापर करून दिशा ओळखण्यापासून आज जगाने उपग्रहाच्या माध्यमातून अचूक दिशा ओळखण्यापर्यंत प्रगती केली आहे. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशिया व अमेरिका यांच्यात जे हाडवैर होते त्यातून हे जीपीएस म्हणजे जागतिक स्थाननिश्चिती तंत्रज्ञान उदयास आले. त्याचा प्रमुख उद्देश हा शत्रूच्या पाणबुडय़ा व विमानांचा अचूक वेध घेणे हा होता. अमेरिकेने १९७३मध्ये जीपीएस यंत्रणा २४ उपग्रहांच्या मदतीने सुरू केली. आज त्यांचे ३२ उपग्रह या सेवेसाठी कार्यरत आहेत. रशियाने १९९५मध्ये ग्लोनास ही २४ उपग्रहांची तशीच यंत्रणा स्वतंत्रपणे उभी केली. या सगळ्यात युरोपीय देशांनीही मागे राहायचे नाही असे ठरवून २७ उपग्रहांसह गॅलिलिओ ही प्रणाली उभारली. जपानने तीन उपग्रहांसह क्वासी झेनिथ, तर चीनने ३५ उपग्रहांची बैदू ही जीपीएस उपग्रह प्रणाली उभी करण्यास सुरुवात केली आहे. चीनचे तीन उपग्रह सोडूनही झाले आहेत. शीतयुद्धानंतर जीपीएस सेवा नि:शुल्क उपलब्ध केलेली असली तरी प्रत्येक देशाने स्वत:ची जीपीएस यंत्रणा उभारली असताना भारताने मागे राहणे शहाणपणाचे ठरले नसते, एकप्रकारे भारताचे सात डोळे अवकाशातून आपले संरक्षण करणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. या संपूर्ण योजनेसाठी कोटय़वधी रुपये खर्च येणार असला तरी त्याचा फायदा त्याच्या तुलनेत अधिक असणार आहे. आता सोडण्यात आलेल्या उपग्रहात अतिशय अचूक असे रुबिडियम अणुघडय़ाळ आहे. ही अणुघडय़ाळे ४० वर्षांत केवळ एक सेकंद इतकी मागेपुढे होऊ शकतात इतकी अचूक असतात. तुमच्याकडे जीपीएस रिसिव्हर असेल तर अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची या तीन मितीत तुमचे स्थान अचूक कळू शकते, यामुळे आपत्तीच्या काळात या प्रणालीचा चांगला उपयोग होतो. या उपग्रहावर सी बँड ट्रान्सपाँडर असल्यामुळे त्याचा उपयोग इन्सॅट मालिकेमधील काही उपग्रहांचा कार्यकाल संपल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या दूर करण्यात होणार आहे. दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी उड्डाण हे तंत्रज्ञान स्वयंपूर्णतेच्या दिशेने योग्य वेळी टाकलेले पाऊल आहे असे म्हणता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
पहिला ‘डोळा’ उघडला
सध्या उत्तराखंडात जलप्रलयाने आपल्या आपत्ती व्यवस्थापनात अनेक त्रुटी असल्याचे दाखवून दिले आहे. या जलप्रलयात कोण कुठल्या ठिकाणी अडकले आहे याची अचूक माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकली नाही. पण आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) पहिल्या दिशादर्शक उपग्रहाच्या माध्यमातून आपण पहिला डोळा उघडला आहे,

First published on: 03-07-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irnss 1a satellite launch an important milestone in development of indias space programme