स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य यांची नेमणूक झाल्याचा आनंद असतानाच अमेरिकी फेडच्या प्रमुखपदी जॅनेट येलन यांच्या नावाची घोषणा झाली. प्रसंगी चलनवाढीकडे दुर्लक्ष करेन, पण रोजगार कसे वाढतील हेच मी पाहीन, अशी भूमिका असलेल्या जॅनेट यांची नेमणूक हा जगाला उद्धरण्याच्या स्त्रीक्षमतेचा गौरव आहे..
जगभरातील १७७ विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखपदी महिला असणाऱ्या बँकांची संख्या १७ देखील नाही. हे प्रमाण दहा टक्के वा त्याच्यापेक्षाही कमीच. याचा अर्थ जगभरात मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नरपद ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पुरुषांकडेच आहे. अमेरिकेत या अनुषंगाने एक नवीन पायंडा पाडला जात असून त्याबद्दल विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे अभिनंदनास पात्र ठरतात. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या-  फेडच्या, म्हणजे त्या देशाच्या रिझव्र्ह बँकेच्या प्रमुखपदी जॅनेट येलन यांची नेमणूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून अमेरिकेतील फेडच्या सर्वोच्च पदी महिला असण्याची गेल्या शंभर वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. अध्यक्ष ओबामा यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्या देशाच्या रीतीनुसार अमेरिकी प्रतिनिधी सदनात, सेनेटमध्ये, त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणे आवश्यक असते. येलन यांच्या बाबत हा केवळ उपचार असेल अशी शक्यता आहे. तो पार पडल्यावर विद्यमान प्रमुख बेन बर्नाके यांची धुरा १ जानेवारी २०१४ पासून जॅनेट यांच्याकडे येईल. ही ऐतिहासिक घटना म्हणावयास हवी. बराक हुसेन ओबामा यांच्याकडे अमेरिकेचे अध्यक्षपद जाणे हे जितके ऐतिहासिक तितकेच फेडच्या प्रमुखपदी जॅनेट यांची नियुक्ती होणे हेही ऐतिहासिक.
जॅनेट या सध्या फेडच्या उपाध्यक्ष आहेत आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेची दिशा ठरवण्यात त्यांचा बराच मोठा वाटा आहे. डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स या पक्षांच्या राजकीय साठमारीत अमेरिकी अर्थव्यवस्थेला तात्पुरते टाळे ठोकण्याची वेळ आली असून त्यातून पुढील काळात जगातील या एकमेव महासत्तेच्या अर्थव्यवस्थेस गती देणे हे त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. जॅनेट यांच्या आधी लॅरी समर्स यांनी या पदात रस दाखवला होता. समर्स आक्रमक आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वभावानुसार अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या विद्यमान रचनेत आमूलाग्र बदल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. २००८ साली लेहमन ब्रदर्स बुडाल्यानंतरच्या आर्थिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेत फेडकडून दर महिन्याला ८५०० कोटी डॉलर्सचे रोखे खरेदी केले जातात. हेतू हा की त्यामुळे तितकी रक्कम चलनात यावी. तसे करण्याची वेळ अमेरिकेवर आली कारण लेहमन ब्रदर्सच्या अकाली निधनानंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था मटकन बसली आणि त्यामुळे देशासमोर चलनचिंता उभी ठाकली. त्यासाठी सरकारने आणि फेडने विविध योजना जाहीर केल्या. त्यातील एक म्हणजे दर महिन्यास ठरावीक रक्कम व्यवस्थेत आणणे. ज्या वेळी ही योजना जाहीर केली त्याच वेळी ती मर्यादित कालासाठी असणार हे स्पष्ट झाले होते. अमेरिकी अर्थव्यवस्था स्थिरावल्यानंतर ती बंद होणे अपेक्षित होते. ती टप्प्याटप्प्याने बंद करावी अशी बर्नाके, जॅनेट यांची इच्छा तर ती एकाच झटक्यात संपवून टाकावी, असा समर्स यांचा आग्रह होता. तसे झाले असते तर हाहाकार उडाला असता आणि भारतासारख्या देशांनाही त्याचा मोठा फटका बसला असता. पण समर्स यांनीच अखेर फेड प्रमुखपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याने हा धोका टळला. त्या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी फेडच्या प्रमुखपदी जॅनेट यांची उमेदवारी जाहीर केली.
जॅनेट या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका. हॉवर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आदी विद्यापीठांतून त्यांनी अध्यापन केले आहे. सर्वसामान्य अनुभव असा की या क्षेत्रातील अनेकांना प्रशासनात उडी घेणे नको असते. जॅनेट यांनी तसे केले नाही. बिल क्लिंटन यांच्या राजवटीत त्यांच्या सरकारची आर्थिक धोरणे आखण्यापासून अनेक संबंधित क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता आला. मुळातच बुद्धिमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅनेट यांचे वडील वैद्यक. महाविद्यालयीन काळात नोबेल विजेत्या अर्थवेत्त्याचे भाषण ऐकून त्या इतक्या प्रभावित झाल्या की आपणही याच क्षेत्रात यावे असे त्यांनी ठरवले. जॅनेट यांनी या अर्थवेत्त्याच्या भाषणाच्या काढून ठेवलेल्या नोंदी पुढे अनेक वर्षे विद्यार्थ्यांना पूरक वाचन म्हणून वापरल्या जात होत्या, इतक्या त्या अचूक होत्या. ही त्यांची खास सवय. अजूनही फेडच्या बैठकीसाठी येताना त्या सविस्तर नोंदी आणि टिपणे काढूनच येतात आणि त्यामुळे विषयाची मांडणी करताना त्यांच्या मनात सुस्पष्टता असते. बर्कले विद्यापीठात अध्यापन करीत असताना त्यांचा जॉर्ज अकेरलॉफ या अर्थवेत्त्याशी परिचय झाला आणि त्याचेच रूपांतर पुढे विवाहात झाले. जॉर्ज यांनाही पुढे अर्थशास्त्रातील नोबेल मिळाले. या दोघांनी मिळून अर्थशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर विपुल लेखन केले असून आता त्यांचा एकुलता एक मुलगा रॉबर्ट हादेखील याच क्षेत्रात उतरला आहे. जॅनेट  यांचे संपर्कक्षेत्र दांडगे आहे. दळणवळण कला हा त्यांच्या आवडीचा विषय राहिलेला आहे. सध्याही विद्यमान फेड प्रमुख बेन बर्नाके हे महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेस वा संबंधितांस यथायोग्य स्वरूपात दिली जावी यासाठी जॅनेट यांच्या संभाषणकलेचा वापर करून घेतात. तेव्हा जॅनेट यांच्या फेड प्रमुखपदी येण्याने हा गुंतागुंतीचा अर्थव्यवहार चालतो कसा हे जनसामान्यांसमोर अधिक सुलभपणे मांडले जाईल, असे मानले जाते. फेडच्या कारभारातील गुप्तता लवकरात लवकर कमी करायला हवी वा काढूनच टाकायला हवी, असे त्या मानतात. जनतेला ही अशी माहिती देत राहावी त्यामुळे धोरणकर्त्यांना फायदाच होतो, या मताच्या जॅनेट आहेत. खेरीज, अमेरिकी अर्थव्यवस्था निरीक्षकांच्या मते फेडच्या प्रमुखपदी महिला येण्यानेही वातावरणात सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. चलनवाढ रोखणे वगैरे तांत्रिक मुद्दय़ांपेक्षा आर्थिक धोरणे रोजगाराभिमुख असावीत असे त्या मानतात. काहीही झाले तरी महत्त्व असते ते रोजगारनिर्मितीला त्यामुळे तशीच वेळ आली तर मी चलनवाढीकडे दुर्लक्ष करेन, पण रोजगार कसे वाढतील ते पाहीन, असे जॅनेट अलीकडेच म्हणाल्या. हे त्यांच्या सहृदयतेचे द्योतक आहे, असे मानले जाते. ६७ वर्षांच्या जॅनेट यांचे व्यक्तिमत्त्व लोभस आहे. चमचमते चंदेरी केस आणि काहीसा बडबडा म्हणता येईल असा स्वभाव यामुळे जॅनेट या अर्थशास्त्राविषयी सकारात्मक वातावरणनिर्मिती करणाऱ्या आहेत. फावल्या वेळेत डोंगरदऱ्या पायदळी तुडवणे आणि एरवी घरी वा बाहेर वेगवेगळ्या स्वादांचे भोजन या त्यांच्या खास आवडी आहेत.
या सर्वाखेरीज एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जॅनेट धर्माने यहुदी (ज्यू) आहेत. विद्यमान फेड प्रमुख बेन बर्नाके हेदेखील यहुदीच आहेत. अमेरिकेच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर यहुदींचा प्रचंड पगडा आहे. गोल्डमॅन सॅक या जगातल्या सर्वात बलाढय़ बँकेशिवाय अनेक अन्य बँकांवरही यहुदींचे नियंत्रण आहे. तेव्हा जॅनेट यांच्याकडील गुणवत्तेच्या जोडीला ही बाबही महत्त्वाची ठरली असणार, यात शंका नाही.
काहीही असो. जगातील सगळ्यात सामथ्र्यवान बँकेचे प्रमुखपद पहिल्यांदाच एका महिलेच्या वाटय़ास येत आहे, ही बाब महत्त्वाची. त्याच वेळी युरोपीय बँकेचे प्रमुखपद ख्रिश्चियन लगार्द या महिलेकडेच आहे आणि भारतातील सर्वात मोठय़ा अशा स्टेट बँकेच्या प्रमुखपदीही महिलेचीच नेमणूक झाली आहे. त्याखेरीज आपल्याकडे खासगी, सार्वजनिक अशा अनेक महत्त्वाच्या वित्तसंस्थांच्या प्रमुखपदी महिला आहेत. मग त्या आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर असोत की अलाहाबाद बँकेच्या शुभलक्ष्मी पानसे. ही महत्त्वाची पदे महिलांकडे जाऊ लागली ही स्वागतार्ह घटना आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगातें उद्धारी या पारंपरिक म्हणीतील पाळण्याची दोरी स्त्री हातून सुटणे हे जितके कौतुकास्पद त्यापेक्षाही अधिक कौतुकास्पद जगाला उद्धरण्याच्या स्त्री क्षमतेचा गौरव होणे. जॅनेट येलन यांच्या नियुक्तीने हे घडले आहे.