या पुस्तकाची चर्चा इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांतून गेला आठवडाभर होतच होती. यातील किस्से हे गतकाळाबद्दलची ‘नवीच बातमी’ होते. पण यापलीकडे पुस्तकात काय आहे? हे पुस्तक कसे आहे? या प्रश्नांची काही उत्तरे, पुस्तकाच्याच आधारे..
पाकिस्तानची ‘इंटर सव्र्हिसेस इंटलिजन्स’ (आयएसआय) ही संस्था काश्मिरात कसा धुडगूस घालते याबद्दल आजवर अनेक भारतीय धुरीणांनी म्हटले-लिहिले आहे. पण मग रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ ही भारताची गुप्तचर संस्था काय करते? याचे उत्तर ‘रॉ’चे माजी प्रमुख अमरजीतसिंग दुलात यांनी लिहिलेल्या ‘कश्मीर : द वाजपेयी ईयर्स’ या पुस्तकातून समजते. दुलात यांनी ‘रॉ’चे प्रमुख (१९९९-२०००) तसेच त्याआधी – १९८९ पासून ‘आयबी’ (इंटलिजन्स ब्यूरो – गुप्तवार्ता विभाग) व केंद्र सरकारचे काश्मीरविषयक सल्लागार (२०००-२००४) असताना काश्मीर-प्रश्नाची शांततामय सोडवणूक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले, हे सांगण्याच्या मिषाने उलगडलेले आठवणींचे गाठोडे म्हणजे हे पुस्तक. ‘पुस्तक सनसनाटी आहे’ यामागचे अगदी अखेरचे कारण असे की, पुस्तकाच्या लिखाणासाठी पत्रकार आदित्य सिन्हा यांचे साह्य घेण्यात आले. त्याहून वर असलेली कारणे मात्र दुलात यांच्या हेतूशी, त्यांना काय काय आठवते आणि ते कसकसे सांगावेसे वाटते याच्याशी तसेच यातून त्यांना एकंदर काय भूमिका मांडायची आहे, याच्याशी संबंधित आहेत. ‘मला बऱ्याच जणांनी रालोआच्या (वाजपेयी काळातील) काश्मीर धोरणामागला खलनायक ठरवले’ ही दुलात यांची ठसठस त्यांनीच स्पष्टपणे (पान १५७) लिहिली असल्याने पुस्तकाचा हेतू स्वसंरक्षण आणि आत्मप्रौढी असा दुहेरी असल्याचे लक्षात येते.
स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणे आणि हे करताना काही जुने हिशेब शाब्दिक फटकाऱ्यांतून चुकते करणे, हा अनेक माजी उच्चपदस्थांच्या आत्मकथनांचा हेतू असतो. तसा तो दुलात यांचाही असल्याचे पुस्तकातून वारंवार दिसते आणि ते क्षम्यच. पण या हेतूमागे वर्षांनुवर्षांत पक्क्या होत गेलेल्या समज-गैरसमजांचे, धारणांचे अनेक पदर असतात. तसे येथेही दिसतात. राजकारण्यांविषयीची अढी, अधिकारीच जणू देश चालवतात अशी प्रौढी, काश्मिरींशी (अतिरेक्यांशी) बोललेच पाहिजे- चर्चेचे मार्ग खुले ठेवलेच पाहिजेत यावरला विश्वास, असे दुलात यांच्या धारणांचे वर्णन करता येईल. चर्चेवरल्या विश्वासापायी- अर्थातच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व त्यांचे सल्लागार ब्रजेश मिश्र यांच्या साथीने- दुलात यांनी काश्मीरच्या काही फुटीर नेत्यांना बोलते केले होते. हे फुटीर नेते पुरेसे फुटीर नव्हतेच – ते ‘आपले’सुद्धा होते, हे दुलात यांच्या पुस्तकातून समजते.. हे गुपित उघड केल्यामुळेच, ‘रॉची ही कार्यशैली जाहीरपणे सांगून दुलात यांनी पुढील वाटचालीत बाधाच आणली’ अशीही टीका (उदा.- ओमर अब्दुल्लांकडून) होते आहे आणि होत राहील. ती कशी, हे पाहिले पाहिजे.
‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ असे ज्याला म्हटले जाते, तो आजी-माजी अधिकारीस्तरीय संवादाचा मार्ग खुला राहिलाच पाहिजे, असा दुलात यांचा विश्वास आहे. त्यातूनच, पाकिस्तानी ‘आयएसआय’चे माजी महासंचालक (१९९०-९२) मोहम्मद असद दुर्रानी यांनी ‘२६/ ११/ २००८’च्या हल्ल्यावेळी केलेली आयएसआय- रॉ चर्चेची सूचना कशी योग्यच होती हे सांगून न थांबता सोबत २०११ साली आपण याच दुर्रानींसोबत एक संयुक्त अभ्यासनिबंध (पेपर) लिहिला होता असा उल्लेख करतात आणि पुढे तर, मुंबई हल्ल्यापूर्वी बँकॉक येथे एका परिषदेत याच दुर्रानी यांनी थेट व्यासपीठावरूनच ‘होय, आम्ही छुपे युद्ध करतो- आमचे गुपित उघडे आहे. तसे भारतही बलुचिस्तानात करीत असेलच की’ अशी विधाने केल्यानंतर कॉफी पिताना आपण त्यांना याबद्दल छेडले तेव्हाही ‘मुक्तिबाहिनी हेसुद्धा भारताचे छुपे युद्धच होते’ असे दुर्रानींनी म्हटल्यावरही आम्हां दोघांचे बोलणे सभ्य पातळीवरच कसे झाले, हेही दुलात सांगतात. यातून ‘संयम हवाच’ हे दुलात यांना सुचवायचे आहे का? अन्यत्र, म्हणजे ‘प्रॉक्सी वॉरियर’ याच नावाच्या आणि बब्बर बद्र ऊर्फ फिरदोस सईद (मुस्लीम जाँबाज फोर्सचा कमांडर इन चीफ) याच्याबद्दलच्या प्रकरणात, ‘छुपे युद्ध हे छुपेच राहायला हवे, त्याचे उघड लढाईत रूपांतर होऊ नये, असे ‘आयएसआय’ला सुद्धा वाटत होते’ हेही लेखक दुलात सांगतात. हा संयम चर्चेसाठी योग्यच. पण छुपे युद्धही जीव घेते. दुलात हे काश्मिरी फुटिरांपैकी ज्यांना ‘उपयुक्त’ मानत, ज्यांच्यामुळे चर्चा पुढे जाई, अशा अब्दुल गनी लोन यांच्यासारख्या नेत्यांच्या खुनांबद्दल दुलात मौन बाळगतात.
अब्दुल गनी लोन यांची हत्या कुणी केली असावी, याबाबतचा तर्कही लेखकाने आडून-आडून मांडला आहे. हे अब्दुल गनी लोन हुरियत कॉन्फरन्सचे नेते असूनही, आपण भारतीय निवडणूक प्रक्रियेत सामील व्हावे अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ‘हुरियतचे अन्य नेते पाकिस्तानच्या फारच आज्ञेत असल्यामुळे’ बाकीच्यांनी या भूमिकेला विरोध तरी केला किंवा मौन तरी पाळले. याच संदर्भात लेखक माहिती देतो की, वरवर पाहता पाकिस्तानविरोधी भासणारी भूमिका घेणारे अब्दुल गनी लोन थेट आयएसआयचे तेव्हाचे प्रमुख, पाकिस्तानी जनरल ईशान उल्-हक यांनादेखील भेटले होते आणि त्या भेटीत लोन यांनी, ‘आयएसआय’तर्फे भारतीय ‘हुरियत कॉन्फरन्स’ला राजकीय सल्ला देणारे (पोलिटिकल हॅण्डलर) पाकिस्तानी ब्रिगेडियर अब्दुल्ला यांच्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. यानंतर लेखक पुन्हा वाचकांशी, ‘ठिपके जोडा’ चा खेळ सुरू करतो. (१) लोन- हक भेटीनंतर अब्दुल्ला यांना हटवले गेले (२) अब्दुल्ला यावर नाराज होते (३) लोन यांची हत्या, हा काही आयएसआयने हेतुत: घेतलेला निर्णय नसणार.. असे तीन ठिपके वाचकांहाती देऊन लेखक नामानिराळा राहतो. यात मौन आहे ते, ही हत्या टाळता कशी आली नाही याबद्दल. ओळींच्या मधले वाचल्यास, आयएसआयने लोन यांच्या जीवरक्षणाची जबाबदारी निभावली नाही, असा निष्कर्ष निघेल, तो दुलात काढत नाहीत.
कारगिल संघर्षांच्या बाबतीत हे पुस्तक निराशा करते. कारगिल हे ‘गुप्तचरांचे अपयश’ असल्याचा आरोप लेखक पार धुडकावतोच- ‘म्हणे आमचे अपयश. पण मग लष्कराची गस्त चालू असते, विमानांच्याही फेऱ्या असतात, त्याचे काय?’ – असा इंग्रजीत ज्याला ‘व्हॉटअबाउटिझम’ म्हणतात तसला निव्वळ फणकारा येथे दिसतो. आत्मपरीक्षणाचा सूर पुस्तकात अन्यत्रही कुठे दिसत नाही.
आत्मप्रौढीचा प्रत्यय आणखीही ठिकाणी वारंवार येतोच. पण त्या आत्मप्रौढ आवाजास झोडपणे हा या पुस्तकाबाबतच्या लिखाणाचा हेतू असू नये. त्याऐवजी, काश्मीरमध्ये दिल्लीकर राज्यकर्त्यांना काही करायचे असेल तर अब्दुल्ला घराण्यास कसे टाळता येत नाही, याचे या पुस्तकातून होणारे दर्शन कसे मनोज्ञच आहे याकडे लक्ष वेधायला हवे. फारुख अब्दुल्ला यांच्याबद्दल लेखकाने लावलेला स्तुतिपर सूर, हादेखील दिल्लीच्या ‘अब्दुल्लावलंबी’ काश्मीरकारणाचा परिणाम (की, कारकही?) म्हणावा लागेल. फारुख अब्दुल्लांना ‘राष्ट्रीय भावनेचे’ प्रशस्तिपत्र लेखकाने दिले आहेच, पण रुबिया (मुफ्ती मोहम्मद सईद यांची ज्येष्ठ कन्या) हिच्या अपहरणानंतर दिल्लीत जणू काहीच चक्रे फिरली नाहीत आणि ‘फारुख लंडनहून परतल्यावर सारे सुरू झाले’ असे लेखकाचे मानणे. फारुख यांच्या घरी आरिफ मोहम्मद खान आणि इंदरकुमार गुजराल या केंद्रीय मंत्र्यांशी रुबियासाठी अतिरेक्यांना सोडण्याबाबत झालेल्या खलबतांचे वर्णन पुस्तकात आहे, पण त्यातून ‘गुजराल ऐकूच न आल्याचे नाटक करीत होते’ या आरोपाखेरीज नवे काहीही वाचकास मिळत नाही. आयएसआय, मुशर्रफ यांना काय ‘वाटले’ असावे याचे उल्लेख पुस्तकात अनेकदा आहेत. मनोवाचनाचे हे प्रयोग अर्थातच, पुस्तकाच्या एकेका प्रकरणाचा विषय ठरलेल्या अतिरेकी म्होरक्यांबद्दलही लेखकाने केले आहेत. अतिशय गुंतागुंतीचे तर्क दुलात मांडतात. त्यातून वाचक विचारप्रवृत्त होतो, परंतु लेखक किस्सेबाजीतच रमतो. ही किस्सेबाजी सनसनाटी आहे. परंतु त्यातून, लेखकाने स्वसंरक्षणार्थ मांडलेल्या तर्कटाखेरीज काही हाती लागत नाही.
काश्मीर : द वाजपेयी ईयर्स
लेखक : ए. एस. दुलात
प्रकाशक- हार्पर कॉलिन्स इंडिया
पृष्ठे : ३४२, किंमत : ५९९ रु.
अभिजीत ताम्हणे – abhijit.tamhane@expressindia.com