सर्वात वेगाने वाढ होणारे शहर अशी ठाण्याची ख्याती असली तरी अजूनही ठाण्याने मराठी ठसा जपला आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांच्या कार्यक्रमाने काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाचे उद्घाटन झाले तेव्हा ठाणेकर मनोमन सुखावले होते. रेल्वे स्थानकाजवळील ठाण्याकरिता गडकरी रंगायतन आणि घोडबंदरनजीक विस्तारणाऱ्या नव्या ठाण्याकरिता काशिनाथ घाणेकर म्हणजे रसिकांची चन होणार असेच वाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र रसिकांची कुचंबणाच होत आहे. अनेक नवीन नाटकांचे प्रयोग मुंबईमध्ये धडाक्याने सुरू असताना ठाण्यात प्रयोगच लागत नाही. काशिनाथला तर नाटय़गृह का म्हणावे असा प्रश्न पडतो कारण तिथे शाळांची स्नेहसंमेलने, डॉक्टर मंडळींच्या परिषदा, पालिकेचे हळदीकुंकू सारखे समारंभ, राजकीय पक्षांची संमेलने, गायन वादन शिकवणाऱ्या क्लासेसचे ‘सर्वाना सस्नेह आमंत्रण’ असलेले कार्यक्रम यांचीच रेलचेल दिसते. इतका मोठा मराठी प्रेक्षकवर्ग असताना अशी परिस्थिती का आहे, याचा खुलासा जाणकार करतील का?
– विनिता दीक्षित, ठाणे
देवळांच्या पैशातून रस्त्यांची कामे करा
आपल्या महान सार्वजनिक बांधकाम विभागाने एक आराखडा बनवून तब्बल चार अब्ज सात कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. कशासाठी? तर महाराष्ट्रात असणाऱ्या अष्टविनायक या गणपतीच्या देवस्थानांच्या आठ गावांना जोडणारे रस्ते पालखीमार्गाच्या धर्तीवर पक्के व रुंद करण्यासाठी! हे आपल्या महाराष्ट्रात होणार आहे याचा आनंद मानायचा, की राज्यभर अनेक गावे, शहरे पक्क्या रस्त्यांपासून, साकव-पूल यांच्या साध्या सोयींपासून वंचित असताना केवळ या आठच गावांसाठी इतकी भरभक्कम, गलेलठ्ठ तरतूद करायची याचा विषाद मनात बाळगायचा, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातील काही महानगरे, शहरे वगळल्यास अनेक गावे, वाडय़ा, वस्त्या, पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. अनेक खेडय़ांतून साधी कूपनलिकेचीही सोय नाही. स्मार्ट सिटीच्या घोषणा जिकडे तिकडे ऐकू येताना अनेक गावे, शहरे नियमित व अखंड वीजपुरवठय़ापासून वंचित आहेत. मेक इन इंडियासाठी सज्ज बनत असताना राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशा वेळी खरेच जिथे गरज आहे तिथे शासनाचा (म्हणजे सर्व करदात्यांचा) निधी खर्च व्हायला हवा, त्याचा आराखडा बनावा. ते करण्याऐवजी केवळ अष्टविनायकाची मंदिरे असलेली गावे चकाचक करण्याचे घाटत असेल तर ते योग्य नाही. देवळे, धर्मशाळा बांधणारे अनेक दानशूर दाते ठिकठिकाणी आहेत. त्यांना आवाहन करून या देवस्थानांकडे जाणारे रस्ते त्यांच्या देणग्यांतून सुधारता येतील. गणपतीच्या अनेक देवळांतील जमणारा पसा मोजायला यंत्रे बसवावी लागतात. तो पसा ती-ती गावे सुधारण्यासाठी वापरला जावा, असे वाटते.
-राजेंद्र घरत, वाशी (नवी मुंबई)
खय्याम यांची कृती अनुकरणीय
आयुष्यभर मेहनत करून कमवलेली सर्व संपत्ती (सुमारे १० कोटी रुपये) संगीत क्षेत्रात येण्यासाठी धडपडणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी दान करून बुजुर्ग संगीतकार खय्याम यांनी आपल्या दिलदार वृत्तीचे दर्शन घडविले आहे. आजच्या घडीला सर्वत्र पशाच्या मोहापायी होत असलेल्या मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या पाश्र्वभूमीवर ही गोष्ट खूपच दुर्मीळ आहे. ज्या कलेद्वारे ही संपत्ती अर्जति केली होती तिच्याच वाढीसाठी आणि संगोपनासाठी खर्च करण्याची त्यांची भावना अनुकरणीय आहे. कदाचित कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात साहिर लुधियानवी यांचे ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटातील खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले सामाजिक आशय व्यक्त करणारे काव्य त्यांच्या हृदयात घर करून बसलेले असावे.
– महेंद्र शं. पाटील, ठाणे
लघुदृष्टी विकसित होण्यामागचे वास्तव
‘विश्वाचे आर्त’ हा अग्रलेख (१३ फेब्रु.) वाचला. लेखात उपस्थित केलेला ‘जेथे जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात तेथे विश्वजन्माच्या समस्येत कोणास रस असणार आणि त्यामुळे अशा शोधांचे, प्रयोगांचे कोणास अप्रूप असणार?’हा प्रश्न वास्तवाला चांगलाच भिडणारा आहे. आज शहरांत राहणारा, भौतिक सुविधांची रेलचेल असलेला, संशोधन झालेल्या तंत्रज्ञानाचे चोख फायदे उठवत चकचकीत जीवनशैली जगणारा,स्मार्टफोन वापरणारा वर्ग अशा शोधांबाबत सकारात्मक असू शकतो पण त्याच वेळेस प्रामुख्याने ग्रामीण भागात राहणारा शेतकरी, कष्टकऱ्यांचा एक मोठा वर्ग ज्याचा फोन अजून ‘स्मार्ट ’ झालेला नाही, पीकपाणी चांगले झाले नाही तर उद्या जगावं कसं,पोरासोरांना महागडं शिक्षण द्याव कसं,मुलगी लग्नाला आली, घरातल्या कर्त्यां पुरुषाने आत्महत्या केली तर हाल विचारायलाच नको. तासन् तास नसलेला वीजपुरवठा, पाण्याच्या एका घागरीसाठी करावी लागणारी पायपीट हेच कमीअधिक प्रमाणात ज्याच्या जीवनातील वास्तव असेल त्याच्याकडून अशा घटनांबद्दल उत्साह दाखवला जाण्याची अपेक्षा ठेवणे कितपत सयुक्तिक आहे. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे पायानजीक पाहण्याची ही दुर्दैवी लघुदृष्टी आजच्या काळातली देणगी नसली तरी या भीषण वास्तवामुळेच बहुधा ती विकसित झाली असावी.
– विराज भोसले, मानवत (जि.परभणी)
बुलेट ट्रेनचा उपयोग २० टक्के जनतेलाच
‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांचे बुलेट ट्रेन भारतात सुरू करण्याविषयीचे प्रतिकूल मत (१९ फेब्रु.) वाचले. तब्बल ९८ हजार कोटी रुपये खर्च करून सुरू होणारा प्रकल्प सर्वसामान्यांच्या कितपत उपयोगी ठरेल याचाही विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या भारतीय रेल्वेतून प्रवास करणे म्हणजे नाना प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अपुऱ्या रेल्वेगाडय़ा, प्रवाशांना ताटकळत ठेवणारे क्रॉसिंग, तुफान गर्दी, अपुरी सुरक्षा व्यवस्था अशा अनेक समस्या आहेत. रेल्वेने या समस्यांचा निपटारा केला तर सर्वसामान्यांचा प्रवास तरी सुखकारक होईल. कारण बुलेट ट्रेनचा प्रवास हे सामान्य जनतेचे स्वप्नच असणार आहे. ‘इंडिया’तल्या २० टक्के जनतेला गतिमान करताना उर्वरित ‘भारता’तल्या ८० टक्के रेल्वे प्रवाशांच्या या समस्या सोडवल्या तर संपूर्ण भारत अधिक गतिमान होईल असे वाटते.
-अजिंक्य अ. गोडगे, परंडा (उस्मानाबाद)
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2016 रोजी प्रकाशित
नाटय़गृहात स्नेहसंमेलने अन् हळदीकुंकू!
सर्वात वेगाने वाढ होणारे शहर अशी ठाण्याची ख्याती असली तरी अजूनही ठाण्याने मराठी ठसा जपला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 20-02-2016 at 03:39 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter