‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकाकडे वळण्याआधी ९५व्या श्लोकाच्या अनुषंगानं अन्य काही सत्पुरुषांनी मांडलेल्या वेगळ्या अर्थाचा थोडा विचार करू. श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी ‘‘शुकाकारणें कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं।।’’ या चरणाचं विवरण करताना ‘कुंटणी’चा फार वेगळा  अर्थ उलगडला आहे. ते म्हणतात, ‘‘ज्याचे ध्यान कुंठित झाले आहे, ज्याच्या चित्तात नामस्मरण चालत नाही, अशा माणसांना सद्गुरूंनी आपल्या वाणीने देवाचे नाव सांगितल्यामुळे तेही नामस्मरण करू लागतात. त्यांनाही नामाला नाम ऐकू येऊन तेही उद्धरून जातात.’’ भाऊसाहेब महाराजांनी ‘अजामिळा’चे नाव ‘अजामेळ’ असे नमूद केले असून त्या रूपकाच्या अनुषंगानं ते सांगतात की, ‘‘अजामिळ आपल्याला बोलावित नसल्याचे देवाला कळले नाही का? (उलट) ‘दाराय मे मे तनयाय मे मे’ (माझी बायको माझी मुले) असे ‘मे मे’ म्हणणाराच ‘अजामेळ’. तो पापलिप्तच झाला असतो. अशा माणसालाही नाम देऊन सद्गुरू योग्य मार्ग दाखवतात.’’ (मनोबोधामृत, लेखक- प्र. ह. कुलकर्णी, प्रकाशक-  श्रीगुरुदेव रानडे समाधि विश्वस्त मंडळ). बेळगावचे काणेमहाराज यांनीही ‘अजामेळ’ या रूपकाचा फार वेगळा अर्थ सांगितला आहे. ते ‘‘अजामेळ पापी वदें पुत्रकामें। तया मुक्ति नारायणाचेनि नामें।।’’ या चरणाचा अर्थ लावताना ते सांगतात की, ‘‘हे मना, अत्यंत विषयासक्त असा हा अजामेळ म्हणजे इंद्रियाधीन झालेला हा जीव, पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेद्रिये अशा दहा अजांच्या म्हणजे शेळ्यांच्या – बकऱ्यांच्या कळपात- मेळ्यात विहार करीत राहिल्याने स्वभावत:च हा बोकड अत्यंत मदांध, कामांध, विषयांध असल्यामुळे त्या तरुण व सुंदर शेळ्यांच्या ठिकाणी आसक्त झाला. त्याची विषयवासनाच इतकी उग्र की इतक्या तारुण्यसंपन्न अजा – स्त्रियांसह रत होऊनही तो अतृप्तच. त्याची पुत्रकामाची अत्यंत प्रबल अशी वासनालोलुपता विशेष बळावली, फोफावली म्हणून तो अजांच्या – शेळ्यांच्या – स्त्रियांच्या ठिकाणी अत्यंत रत झाला. ‘आत्मा वै पुत्र नामासी’ या प्रमाणे पुत्राच्या रूपाने आत्मरूप नारायणाचे नामस्मरण घडले, चित्तात जडले व तो मुक्त झाला..’’ ‘‘शुकाकारणें कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं।।’’ या चरणाचा अर्थ उलगडताना श्रीकाणेमहाराज म्हणतात, ‘‘हा शुकरूपजीव म्हणजे पोपट दशेंद्रियांच्या पिंजऱ्यात अडकून राहिला आहे. या सोनेरी पिंजऱ्यातून या पोपटाला, शुकाला सुटावयाचे असल्यास या जीवाने कुंटिणीप्रमाणे मध्यस्थ, दुभाषी, आत्महितैषी अशी सम म्हणजे जी दुसरी पश्यंती त्या वाणीने चित्तात चित्ताची देवता जी नारायण तिचे नामस्मरण केल्यास त्या पश्यंती मुखाने प्रेमयुक्त रसाळ नामस्मरण करणाऱ्या जीवाची ख्याती, प्रशंसा – प्रसिद्धी पुराणी अशा आत्मरूपात झाली. म्हणजे तो जीव पुराणी म्हणजे जुन्यात जुनी, जगदारंभीची परब्रह्मवस्तू – आत्माराम – त्या रूपात हा जीव (शुक) पिंजऱ्यातून उडून जाऊन मिळाला. ब्रह्मरूप झाला. म्हणून हे मना, तू त्या नारायणाचे स्मरण कर.’’ (आत्मदर्शन, प्रकाशक – श्रीपाद प्रकाशन, डोंबिवली). तर ९५व्या श्लोकाचा श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर आणि श्रीकाणेमहाराज यांनी सांगितलेला अन्वयार्थ आपण पाहिला. आता ९६वा श्लोक हा दैत्यकुलोत्पन्न प्रल्हादाने नामस्मरणाच्या योगाने साधलेली हरिभक्ती उलगडून दाखवतो. शिव आणि पार्वती हे या विश्वाचे आदिबीज नामातच तल्लीन आहे. अर्थात विश्वाच्या कणाकणात ती नाममयताच भरून आहे. त्या महादेवाप्रमाणेच सामान्य जिवाचाही नामानं कसा उद्धार होतो, आत्मिक उन्नती होते हे अजामिळ आणि गणिकेच्या रूपकांतून आपण जाणलं. आता दानवाची कथा सुरू होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

 

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy