मानव जन्म मिळाला एवढय़ानं काही अंत:करण विशुद्ध होणं साधत नाही. गेल्या अनंत जन्मांचे बरे-वाईट संस्कार असतातच. अध्यात्माच्या- अर्थात अंतर्यात्रेच्या- मार्गावर आल्यानं ते लगेच दूर होत नाहीत. विशुद्ध आंतरिक स्थिती अशा ‘वाराणसी’त म्हणजेच ‘काशी’त प्रवेश करणं आणि ‘पूर्वज’ अशा पूर्वीपासून मनात उत्पन्न झालेल्या वासनांची निवृत्ती होणं स्वबळावर साधणारं नसतं. गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे, या मार्गावर प्रामाणिकपणे चालू लागल्यास ‘पूर्वज’ अशा कामभावनेस ऊध्र्व गती लाभते. आधी संकुचित कामनांच्या खोडय़ात जीव घुटमळत होता. आता मोक्षप्राप्तीची कामना उत्पन्न होते. आधी भौतिकाच्या प्राप्तीत अडथळा आला तर क्रोध येत असे, आता अध्यात्म मार्गावरील वाटचालीत आपल्याच उणिवांपायी जो अडसर येत असतो त्यानं स्वत:विषयीच क्रोध उत्पन्न होतो. आधी भौतिकाच्या प्राप्तीचा लोभ आणि मोह होता, आता सन्मार्गावर अग्रेसर करणाऱ्या सद्विचारांना ग्रहण करण्याचा लोभ वाटतो. आधी दुसऱ्याची भौतिक प्रगती पाहून मत्सर वाटत असे, आता दुसऱ्याची आध्यात्मिक प्रगती पाहून मत्सर वाटू शकतो. आता कुणी म्हणेल, असं कसं शक्य आहे? साधकाला मत्सर कसा वाटू शकतो? पण नीट विचार केला तर जाणवेल की, अशुद्ध वासना शुद्ध होताना त्यांचे जुने ठसे तात्काळ विरत नाहीत. आणि वासना शुद्ध होणं नव्हे तर वासनायुक्त अंत:करणाचं निर्वासन होणं, वासनामुक्त होणं, निरीच्छ होणं हेच खरं साधायचं आहे. मग हे कोणाच्या बळावर साधेल? तर केवळ सद्गुरूच्याच! हा सद्गुरू कसा असतो, एखाद्याच्या मनात या ‘वाराणसी’च्या यात्रेला जाण्याची इच्छा जरी निर्माण झाली तरी हा सद्गुरू त्या यात्रेची तयारी कशी करून देतो, ज्यानं ही यात्रा सुरू केली आहे त्याला मार्गात अग्रेसर कसा करतो, जिवाचं हित साधण्यासाठी तो नित्य कसा कार्यरत असतो; याचं वर्णन समर्थ ‘मनोबोधा’च्या ९९व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत करतात. ते म्हणतात, ‘‘मुखें रामनामावळी नित्यकाळीं, जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी!’’ हा सद्गुरू कसा आहे? तर, ‘‘मुखें रामनामावळी नित्यकाळीं!’’ त्याच्या मुखी सदोदित शाश्वताचं स्मरण असतं.. आणि ‘मुख’चा व्यापक अर्थ आपण मागेच जाणला त्यानुसार जगाशी मला जोडणारी आणि जग माझ्या जाणिवेच्या परिघात आणणारी जी जी इंद्रियद्वारं आहेत, ती ‘मुख’च आहेत. थोडक्यात सद्गुरू जगात वावरत असला तरी तो सदोदित परम भावातच निमग्न असतो. हा सद्गुरू ‘चंद्रमौळी’ आहे. चंद्र हे मनाचं रूपक आहे. मन अस्थिर असतं. चंद्रबिंबाच्या घटत्या आणि वाढत्या कलेप्रमाणे मनाचेही चंचल चढउतार सुरू असतात. असं चंचल मन जेव्हा बुद्धी व्यापून टाकतं तेव्हा बुद्धीही थाऱ्यावर राहत नाही.  तेव्हा या मनाचा त्याग न करता मनाच्या या चंचलतेला कसं मस्तकाबाहेर ठेवायचं, हे सद्गुरू प्रत्यक्ष दाखवतात. जिवाला सदोदित त्याचं परमहित कशात आहे, हेच सांगतात. त्यांच्या जीवनातूनही, प्रत्यक्ष जगण्यातूनही व्यापकतेचा संस्कार साधकावर होत असतो. प्रतिकूल परिस्थितीतही ते अतिशय निर्भयतेनं, नि:शंकतेनं आणि सहजतेनं जगत असतात. ती निर्भयता, नि:शंकता आणि सहजता परमात्म्याच्या परम आधारानं जगण्यात कशी उतरवता येते, हे ते साधकाला सदोदित सांगतच असतात. तो आधार प्राप्त करण्याच्या वाटचालीची सुरुवात साध्या सोप्या नामानं करायला ते सांगतात.. आणि इथंच विकल्पांचा झंझावात आणि ‘मनोबोधा’चा शंभरावा श्लोक सुरू होतो! समर्थ रामदास विरचित ‘मनाच्या श्लोकां’चा मध्यबिंदू आपण अशा तऱ्हेनं सव्वा वर्षांनं गाठत आहोत!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy