पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या प्रचारतंत्रातील सर्वात महत्त्वाचे तंत्र होते ते म्हणजे शत्रू वा विरोधक हा पूर्णत: काळ्याच रंगात रंगविणे. त्याचप्रमाणे लहान मुले, आपले कुटुंब यांबाबत सर्वाच्या मनात हळवा कोपरा असतो. भित्तिचित्रांतून, पत्रकांतून याचाही तेव्हा चलाखीने वापर करण्यात आला होता..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिले महायुद्ध हा प्रचाराच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. ते सुरू झाले हत्येच्या एका घटनेपासून आणि त्यात मारले गेले लक्षावधी लोक. या काळातील प्रचाराचे ढोबळमानाने तीन भाग करता येतात. एक- शत्रुराष्ट्रांनी एकमेकांविरोधात केलेला प्रचार. दुसरा- आपल्याच नागरिकांसाठी (खरे तर नागरिकांविरोधात) केलेला प्रचार आणि तिसरा भाग जर्मनी आणि ब्रिटनने अमेरिकेतील नागरिकांसाठी केलेला प्रचार. या तिन्ही भागांत बाजी मारली ती ग्रेट ब्रिटनने. आपल्या नागरिकांना ब्रिटनने युद्धासाठी तयार केलेच, देव, देश, राजा आणि धर्मासाठी प्राण हाती घेण्याची प्रेरणा दिलीच, परंतु या महायुद्धापासून दूर राहू इच्छिणाऱ्या अमेरिकी नागरिकांनाही अखेर ‘स्वेच्छेने’ युद्धात उतरण्यासाठी तयार केले. आजच्या काळातील प्रचारक, पीआर कंपन्या आणि जाहिरातदारांनाही मार्गदर्शक ठरावा असाच तो प्रचार होता.

कोणत्याही देशासमोर युद्धकाळात दोन मोठी अंतर्गत आव्हाने असतात. एक म्हणजे सैन्यभरतीचे आणि दुसरे युद्धसामग्रीचे, पैशाचे. युद्ध म्हणजे दोनशे रुपयांच्या तिकिटात मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहण्याचा थरारपट नसतो. ते पडद्यावर मोठे आकर्षक वाटते. परंतु प्रत्यक्षात ते जीवघेणे असते. त्यासाठी पैसे लागतात. ब्रिटनने युद्ध सुरू होताच पहिल्या दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणावर सैन्यभरती मोहीम राबविली. ‘ब्रिटनच्या महिला म्हणताहेत- जा!’, ‘ब्रिटन्स, तुमच्या राजाला आणि देशाला तुमची गरज आहे. युद्ध संपायच्या आत सैन्यात सहभागी व्हा’, ‘जर इंग्लंड हरले, तर तुम्हीही हराल!’, अशा प्रकारच्या असंख्य भित्तिपत्रकांच्या, पत्रकांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारने जनतेला सैन्यभरतीसाठी उद्युक्त केले. समोरच्या देशाला आक्रमक, राक्षस, देव आणि देशाचा शत्रू ठरवून आपल्या नागरिकांमध्ये भय निर्माण करायचे, त्यावर देशभक्तीच्या भावनेचा मुलामा चढवायचा, अशी प्रचारतंत्रे वापरून ब्रिटनने भरती मोहीम यशस्वी केली. परंतु साधारणत: १९१७ च्या सुमारास ब्रिटिश सरकारपुढे वेगळीच काळजी निर्माण झाली. पहिल्या दोन वर्षांतच देशासमोर आर्थिक संकट आ वासून उभे राहिले. अन्नटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले. साधा ब्रेड घेण्यासाठी दुकानांसमोर लोकांच्या रांगा लागू लागल्या. कारखान्यांतील कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले. सक्तीची लष्करी भरती आणि अन्नटंचाई यांविरोधात नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला. याच काळात रशियामध्ये झारशाहीविरोधात बंड सुरू झाले होते. ब्रिटनमध्ये तसे होऊ  नये याची काळजी घेणे भाग होते. लोकांचा ढळता विश्वास सावरणे आवश्यक होते. त्यांच्या विचारांना वळण देणे गरजेचे होते. पण ही मोठय़ा खुबीने करावयाची गोष्ट होती. सरकारचा त्यात थेट सहभाग आहे हे नागरिकांना समजले तर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पंतप्रधान डेव्हिड लॉईड जॉर्ज यांनी राष्ट्रीय युद्धध्येय समिती स्थापन केली. समितीचे सदस्य अत्यंत काळजीपूर्वक निवडले. आजच्या भाषेत सांगायचे तर ही समिती म्हणजे सरकारची पीआर- जनसंपर्क – एजन्सीच होती.

या समितीने लाखो पत्रके, भित्तिपत्रके, पोस्ट कार्डे प्रसिद्ध केली. विविध वृत्तपत्रांतून युद्धाचे समर्थन करणारे लेख प्रसिद्ध करण्यात आले. तशा प्रकारच्या भाषणांचा सपाटा लावण्यात आला. समितीने चित्रपट माध्यमाचाही मोठय़ा प्रमाणावर वापर करून घेतला. खास युद्धपट तयार करून ते ग्रामीण भागात दाखविण्यात आले. अशा प्रकारच्या प्रचारातून ब्रिटनने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार केले. वरवर पाहता या प्रचारात काहीही वेगळे वाटणार नाही. वाटण्याचे कारण नाही. युद्धास सामोऱ्या जाणाऱ्या देशाच्या सरकारने याहून वेगळे काय करायचे असते? एरवी शासन नावाची यंत्रणा बऱ्यापैकी मठ्ठ असते. तिची भाषा, तिचा संदेश हे सारेच ओबडधोबड आणि रूक्ष असते. पण तिचे प्रचाराचे मार्ग असेच असतात. मग या समितीने वेगळे काय केले? वेगळेपण होते ते प्रचाराच्या तंत्रात.

हा प्रचार ‘मीठी छुरी’ म्हणतात त्या प्रकारचा होता. समोरचा शत्रू हा सैतानी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यामुळे ब्रिटिश संस्कृती, परंपरा, नीतिमूल्ये संकटात आली आहेत. त्यांचा बचाव करायचा आहे. असे पत्रकांतून, चित्रांतून लोकांच्या मनावर ठसविण्यात आले होते. सर्वसामान्य कर्मचारी, कामगार यांना आदेश घेण्याची सवय असते. त्यांच्यासाठी ‘शांत राहा, तुमचे कर्तव्य पार पाडा’ अशी आदेशात्मक भित्तिचित्रेही कारखान्यांतून वगैरे लावण्यात आली होती. युद्धसमर्थनपर लेख लिहिणारे, भाषणे करणारे लोक सरकारशी संबंधित असल्याचे दिसता कामा नयेत, त्यांचा चेहरा ‘निष्पक्षपाती’च दिसला पाहिजे, अशी काळजी घेण्यात आली होती. असा प्रचार सर्वसामान्य नागरिकांकडून आला किंवा सुप्रतिष्ठित परंतु सरकारशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींकडून, उदाहरणार्थ, साहित्यिक, कलाकार, उद्योगपती, तज्ज्ञ यांच्याकडून आला, तर तो लोकांना अधिक खरा वाटतो. हे तत्त्व येथे पाळण्यात आले होते. सरकारी प्रचारतंत्राला दाद न देणारी काही शांततावादी बुद्धिनिष्ठ व्यक्ती समाजात असतातच. त्यांना गप्प करण्यासाठी, त्यांच्या सभा उधळून लावण्यासाठी ‘राष्ट्रभक्त’ नागरिकांचे गट तयार करण्यात आले. ते ‘स्वतंत्र’ गट असत. त्यामुळे त्यांनी हिंसाचार केला, भडक वक्तव्ये केली, तरी त्यांचा सरकारशी संबंध नाही असे म्हणून हात झटकणे सोपे असे. एकंदर लोकांच्या मानसिकतेचा विचार करून ही धूर्तपणाची कामे करण्यात आली होती. त्या प्रचारतंत्रातील सर्वात महत्त्वाचे तंत्र होते ते म्हणजे शत्रू वा विरोधक हा पूर्णत: काळ्याच रंगात रंगविणे. आपल्या विरोधकामध्येही काही चांगले गुण असू शकतात हे कधीही मान्य करायचे नाही. तो सैतानी, राक्षसी प्रवृत्तीचा आहे असेच नागरिकांच्या मनावर बिंबवायचे. युद्धकाळातील भित्तिचित्रांतून जर्मनांचा चेहरा नेहमीच आक्रमक हूण, राक्षसी दाखविण्यात येत असे. एक महाकाय, दात विचकणारा गोरिला, त्याच्या एका हातात असहाय नाजूक स्त्री आणि दुसऱ्या हातात जाडजूड सोटा. त्या सोटय़ावर एक जर्मन शब्द- कल्टर. म्हणजे जर्मन संस्कृती. असे एक गाजलेले अमेरिकी भित्तिपत्रक हे याचेच उदाहरण म्हणून सांगता येईल. प्रचाराचे दुसरे एक तंत्र म्हणजे भावनांना नकळत हात घालणे. आपण नेहमीच समाजाबरोबर असावे अशी एक अंत:प्रेरणा व्यक्तीच्या मनात असते. लहान मुले, आपले कुटुंब यांबाबत सर्वाच्या मनात हळवा कोपरा असतो. याचाही चलाखीने वापर करण्यात आला होता. आज आपल्याला उपाशी राहावे लागत असले, तरी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी हे सहन केले पाहिजे, तिकडे सीमेवर आपले सैनिक गोळ्या खाऊन मरत असताना, आपण कमी खाल्ले पाहिजे, अन्नाची बचत केली पाहिजे, असे संदेश या काळात ब्रिटिश भित्तिचित्रांतून, पत्रकांतून देण्यात येत होते. या काळात ब्रिटिश सरकारने वॉर बॉण्ड, सेव्हिंग सर्टिफिकेट काढली होती. त्याचा प्रचार करणाऱ्या भित्तिपत्रकात अतिशय गोजिरवाण्या लहान मुलींची चित्रे होती आणि त्यावर लिहिले होते- ‘तुमच्या मुलांसाठी बचत प्रमाणपत्रे खरेदी करा. ती जगतील आणि तुम्हाला धन्यवाद देतील.’

या अशा प्रचारातून ब्रिटिश सरकारने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार केले. उपासमारीने हैराण झालेले लोक, असंतुष्ट कामगार-कर्मचारी या साऱ्यांना भरपूर कष्ट करण्यास प्रवृत्त केले. त्यातून युद्धसामग्रीचे उत्पादन वाढविले. पण तसेही लोकांना देशप्रेमाचा हवाला देऊन कामाला लावणे सोपे असते. ब्रिटनची खरी कसोटी होती ती दुसऱ्या देशाच्या- अमेरिकेच्या- नागरिकांना आपल्या बाजूने युद्धात खेचण्यात. त्या वेळी जर्मनीही तसाच प्रयत्न करीत होती. परंतु यशस्वी ठरले ते ब्रिटन. त्यासाठी त्यांनी कशा प्रकारे प्रचारतंत्रे वापरली हे पाहणे मोठे रंजक आहे..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

मराठीतील सर्व प्रचारभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous poster from the first world war