पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाकडूनच हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर देशभर शिखांच्या विरोधात भडका उडाला. एकटय़ा दिल्ली शहरातच सुमारे तीन हजार शिखांची त्यामध्ये हत्या झाली. त्या वेळी दिल्लीतील दंगलीस कारणीभूत असल्याच्या आरोपातून काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सज्जनकुमार यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने आता शीख समाजात अस्वस्थतेची भावना पसरली आहे. दिल्लीच्या कडकडुमा न्यायालयाने हा निर्णय देताना सज्जनकुमार यांना निर्दोष ठरवून, अन्य पाच जणांना दोषी ठरवले आहे. पाच शिखांच्या हत्येस कारणीभूत असल्याचा आरोप या सहा जणांवर होता. जातीय तेढ वाढवणे आणि दंगल भडकवणे असे त्यांच्यावर आणखी आरोप होते. पंजाबमध्ये सुरू झालेल्या स्वतंत्र खलिस्तानच्या चळवळीला श्रीमती गांधी यांनी दिलेले सशस्त्र उत्तर आणि सुवर्णमंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार यामुळे शिखांच्या मनात असंतोष होताच. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे या सगळ्याच ज्वालामुखीत तेल ओतले गेले आणि पुन्हा काही काळ सारा देश दंगलीत होरपळून निघाला. नंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांनी संत लोंगोवाल यांच्याशी करार करून शांततेचा प्रस्ताव ठेवला, तरीही हा ज्वालामुखी पूर्ण शांत झालाच नाही. सज्जनकुमार यांना निर्दोष सोडण्याचा निषेध हा त्याचाच एक भाग आहे. १ नोव्हेंबर ८४ रोजी दिल्लीतील केट परिसरातील पालम वसाहतीमध्ये झालेल्या दंगलीत सज्जनकुमार यांचा सहभाग होता, या आरोपाखाली हा खटला चालवण्यात आला. २८ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल देतानाही न्यायालयाने या प्रकरणी आणखी सुनावणी होण्याची गरजही व्यक्त केली आहे. सज्जनकुमार यांच्यावर शीखविरोधी दंगलप्रकरणी दाखल झालेला हा तिसरा खटला होता. स्वत: सज्जनकुमार दंगलीत सामील झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. दंगलीत एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती व त्या वेळी तिथे जगदीश कौर उपस्थित होत्या. त्यांनी या खटल्यात सज्जनकुमार यांच्याविरोधात साक्ष दिली होती. या दंगलींचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवल्यानंतर नानावटी आयोगाच्या शिफारसींमुळे २००५ मध्ये सज्जनकुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. सीबीआयचे या प्रकरणातील म्हणणे गंभीर स्वरूपाचे होते. सज्जनकुमार यांनी दिल्ली पोलिसांना हाताशी धरून जेथे जेथे आपले नाव गोवले आहे, तेथे ते पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सज्जनकुमार आणि पोलीस यांनी एकत्रितरीत्याच ही दंगल घडवून आणली असाही गंभीर आरोप सीबीआयने केला. काँग्रेस पक्षाने सज्जनकुमार यांना वाचवण्यासाठी आपली राजकीय शक्ती पणाला लावली, असे शिखांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या निकालानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी न्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्यात आला आणि नंतर दिल्लीतील मेट्रो बंद पाडण्यात आली. निषेध करणाऱ्यांनी दिल्ली पठाणकोट महामार्गही काही काळ बंद ठेवला. न्यायालयाचा निर्णय अयोग्य वाटला, तर त्यासाठी वरच्या न्यायालयात दाद मागता येते. आता उच्च न्यायालयात तशी दाद मागणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. निर्णय आपल्या विरोधात गेला, म्हणून कायदाच हातात घेणे जसे चुकीचे आहे, तसेच अशा प्रकरणात कोणलाही समाज म्हणून दोषी ठरवण्याची मानसिकताही चुकीची ठरते. सज्जनकुमार निर्दोष नसतील, तर त्यांना वरच्या न्यायालयात शिक्षा मिळूही शकते. परंतु निकाल आपल्या मनासारखा झाला नाही, म्हणून सारे जनजीवन विस्कळीत करणेही न्यायाचे नाही.