कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे व्यवस्थापनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यानंतर शेवटचे हत्यार म्हणून संपाचे हत्यार उगारावे लागते, याचे भान बजाज कंपनीतील कामगार नेत्यांना राहिले नाही, त्यामुळे कोणतीही मागणी मान्य न होता त्यांना पन्नास दिवसांच्या संपानंतर सपशेल माघार घ्यावी लागली. कोणतेही आंदोलन सुरू करताना, ते माघारीचे सर्व दोर कापले जाईपर्यंत चिघळू द्यायचे नसते, हा सिद्धान्त लक्षात न घेतल्याने असे झाले आहे. गेले नऊ महिने देशातील वाहनविक्री सातत्याने कमी होते आहे. देशातील अनेक वाहनउद्योगांना त्याचा फटका बसल्याने काही ठिकाणी कारखाने बंद ठेवण्यावाचून पर्याय उरलेला नाही. अशा स्थितीत कारखाने सुरू राहून कामगारांना वेतनाची हमी मिळणेही दुरापास्त झाले असताना बजाज कंपनीच्या आकुर्डी येथील प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांनी पन्नास दिवसांचा संप करणे हे खरे तर असमंजसपणाचे म्हटले पाहिजे. ज्या आकुर्डीतील कामगारांनी संप केला, ते प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित नव्हतेच. त्यामुळे या संपाचा प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम किती झाला, यापेक्षाही वातावरण गढूळ झाले, हे महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी टाटांच्या टेल्को या मोठय़ा कारखान्यात राजन नायर यांच्या नेतृत्वाखाली दीर्घ काळ संप झाला होता. त्यामुळे नायर यांचे नेतृत्व या औद्योगिक पट्टय़ात सर्वमान्य झाले होते. त्यानंतरच्या काळात कामगारांच्या चळवळीही थंडावल्या. बजाजमध्ये संप करणाऱ्या विश्वकल्याण कामगार संघटनेला खरे तर चाकणमधील उत्पादन प्रकल्पात आपले बस्तान बसवायचे आहे. तेथे शिरकाव झाला नाही, म्हणून व्यवस्थापकीय कार्यालय असलेल्या आकुर्डीत संप झाला. संपासाठीचे जे कारण देण्यात आले, तेही सबळ नव्हते. प्रत्येक कामगाराला कंपनीचे समभाग द्यावेत या प्रमुख मागणीसाठी  संप करणे हे उचित आहे, असे कामगार क्षेत्रातील कुणीही मान्य करणार नाही. तीस वर्षांपूर्वी याच बजाजमधील सर्वात तळातील कर्मचाऱ्याला देशातील सर्वात अधिक वेतन मिळत असे. गेल्या काही दशकांत वाहन उद्योगात आलेल्या स्पर्धेमुळे बजाजच्या वाहनांचा बाजारातील टक्काही कमी झाला. तरीही कंपनीने हुशारीने आपले उत्पादन प्रकल्प चाकणच्या बरोबरीने औरंगाबाद आणि पंतनगर येथेही सुरू केले.  कंपनीने कामगार संघटना निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न केल्याचा आरोप विश्वकल्याण कामगार संघटनेनेच केला आहे. या संघटनेने यापूर्वी पंतनगरमध्ये संप घडवून आणला होता. आता चाकण येथील उत्पादन प्रकल्पात याच संघटनेला शिरायचे आहे. त्यामुळे आकुर्डीत झालेला संप हा शेअर मिळण्याची मागणी पुढे करून झाला असला, तरी त्यामागील हेतू वेगळाच असल्याचे लपून राहिलेले नाही. बदलत्या जागतिक औद्योगिक वातावरणात भारतीय उद्योगांनी आपले अस्तित्व टिकवले नाही, तर येत्या काही काळात परिस्थिती हाताबाहेर जाईल, याचे भान कामगार नेत्यांनी ठेवणे आवश्यक झाले आहे. कामगारांचे हित साधण्याच्या नावाखाली आपले अहंकार कुरवाळत बसण्याने काहीच साध्य होणार नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. उद्योगांमधील औद्योगिक वातावरण सामंजस्याचे राहण्यासाठी उद्योग आणि कामगार संघटना या दोघांनीही आपली अहंमन्यता बाजूला ठेवून काम करण्याची गरज या संपामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.