प्रपंचाचा प्रभाव साधकाच्या मनातून पूर्ण ओसरलेला नसतो आणि प्रपंचात लहानसहान सोयी लाभल्या तरी त्याला हायसं वाटतं. गोष्ट अगदी साधी आहे. कृ. प. भिडे सांगतात, ‘‘एकदा बोलण्याच्या ओघात मी स्वामींना ‘एक दूधवाला चांगलं दूध पुरवत असतो,’ असं म्हणालो. ‘सुरुवातीला दूधवाला ज्या दर्जाचं दूध घालील त्याच दर्जाचं दूध तो शेवटपर्यंत देत राहील का?’ एवढंच स्वामी त्यावर म्हणाले. आठ दिवस गेले नाहीत तोच स्वामीजींच्या सांगण्याचा प्रत्यय येऊ लागला!’’ (स्वामी स्वरूपानंद स्मृती सौरभ, पृ. ८). आता ही घटना वरकरणी अगदी क्षुल्लक वाटते, पण ती साधकावस्थेतल्या एका महत्त्वाच्या मुद्दय़ाला स्पर्श करते. प्रपंचातल्या लहानसहान सोयींचं आपल्याला अप्रूप वाटतं याचाच अर्थ प्रपंचाच्या खऱ्या अशाश्वत स्वरूपाचं भान आपल्या मनात सतेज नसतं, हाच आहे. प्रपंचातल्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या कधीच एकसारख्या राहात नाहीत. मी जसा स्वार्थप्रेरितच जगतो, ‘मी’केंद्रितच जगतो तशीच माझ्या अवतीभोवतीची माणसंही स्वार्थप्रेरित आणि ‘मी’केंद्रितच असतात. त्यांच्यावर विसंबणं आणि भावनिक, मानसिकदृष्टय़ा अवलंबू लागणं हे कालांतरानं आत्मघातक ठरतं. मग त्या सोयी कायम राहाव्यात यासाठी सद्गुरूंनाच आपण साकडं घालू लागतो, किंबहुना कुठे जायला निघालो असताना घराबाहेर पडताच वाहन मिळणं, काम त्वरेनं होणं, अनपेक्षित मदत मिळणं, डॉक्टरकडे गेलो असताना गर्दी नसणं, औषधाला गुण तात्काळ येणं अशा सर्व गोष्टींमध्ये आपण सद्गुरूंची कृपा पाहू लागतो. सद्गुरूंमुळे आपलं भौतिक जगणं चिंतामुक्त होत जातं, हे खरं पण तो त्यांचा खरा हेतू नाही. त्यासाठी ते माझ्या जीवनात आलेले नाहीत, पण माझ्या जीवनातील लहानसहान सुखसोयी टिकणं वा न टिकणं, यात मी जेव्हा सद्गुरूंची कृपा जोखू लागतो तेव्हा माझ्या आंतरिक वाटचालीत मोठं धोक्याचं वळण आलं आहे, हे पक्कं समजावं. ते वळण दिसून मी सावध झालो नाही तर मग अनेकदा मी याच भौतिकाचं रडगाणं गाण्यापुरतं जणू त्यांच्या चरणी जाऊ लागतो! चिपळूणचे हरिदास पटवर्धन स्वामींच्या दर्शनाला सपत्नीक गेले होते. ते खोलीत शिरताच मुलगा श्रीपाद रडायला लागला. पटवर्धन सांगतात : चि. श्रीपाद रडू लागला म्हणून मी त्याला घेऊन बाहेर गेलो. स्वामींनी लगेच मला आत बोलावले व म्हणाले, ‘‘मुलं आहेत. ती रडायचीच. तुम्ही नाही रडायचं!’’ (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ५०). या लहानशा वाक्यात साधकासाठी किती मोठा बोध भरला आहे! महाराजांच्या दर्शनाला आपण गेलो आहोत आणि त्यांच्यासमोर मुलं रडली की आपण त्यांना दटावतो आणि गप्प करतो, त्यानंतर मग महाराजांशी बोलताना आपण त्या मुलांपेक्षा भौतिकाच्या रडगाण्याचा कितीतरी पटीने मोठा सूर लावतो! तेव्हा माझ्या सभोवातलच्या भौतिकाच्या मर्यादा सद्गुरूच मनावर बिंबवतात. खरं तर त्यांना कोणत्या नियमांनी बांधणार? तरी ते व्यवहाराचे नियम पाळतात आणि ते पाळायला साधकालाही आपल्याच आचरणातून शिकवतात. त्याची एक मजेशीर आठवण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2014 रोजी प्रकाशित
१५८. वस्तुपाठ – २
प्रपंचाचा प्रभाव साधकाच्या मनातून पूर्ण ओसरलेला नसतो आणि प्रपंचात लहानसहान सोयी लाभल्या तरी त्याला हायसं वाटतं. गोष्ट अगदी साधी आहे.
First published on: 13-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual life and worship part two