स्वधर्माशी फटकून वागत विवेकाचा आवाज शाबूत ठेवणारे जर्मन साहित्यिक गुंटर ग्रास भारतात अगदी पहिल्यांदा आले, तेव्हाही कर्माऐवजी प्रयत्नांवर विश्वास ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. तो कोरडा वा दूरचा नव्हता, हे कोलकात्यातील त्यांच्या दीर्घ वास्तव्यातून दिसून आले. भारताचे प्रतिबिंब त्यांच्या कादंबऱ्यांतून उमटलेच पण, ‘कोलकात्यातून त्यांनी जग समजून घेतले’!  
मात्र, या देशाशी ग्रास यांनी जोडलेले नाते दुतर्फी होते की नव्हते? याचा हा एक शोध..

नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरलेले दिवंगत जर्मन लेखक- कादंबरीकार- कवी आणि चित्रकार गुंटर ग्रास हे भारतात काही काळ वास्तव्यासाठी आले, तेव्हा दिसलेल्या विषमता आणि गरिबीचं प्रतिबिंब मांडणारं ‘शो युअर टंग’ हे पुस्तक (पानोपानी स्वरेखित चित्रांसह) त्यांनी लिहिलं. त्याआधीच्या भेटींमध्येच ‘भारतातल्या गरिबीकडे आपण कसे पाहणार आहोत?’ हा प्रश्न त्यांना पडला होता, हे त्यांच्या ‘द फ्लाउंडर’ या कादंबरीतून दिसतं. या साऱ्याची उजळणी करणारा मजकूर पुढील परिच्छेदांत वाचायला मिळणार असून मुंबईत ग्रास यांना आदरांजली वाहण्यासाठी गेल्याच बुधवारी (२२ एप्रिल) झालेल्या सभेचा संदर्भ या लिखाणाला आहे. प्रथमच स्पष्ट केलं पाहिजे की, हा मजकूर म्हणजे गुंटर ग्रास यांना समग्र आदरांजली नव्हे. ‘ग्रास आणि भारत यांचं नातं काय?’ एवढाच प्रश्न घेऊन, त्याची ग्रासच्या काही लिखाणातून आणि मुंबईतल्या सभेतून मिळालेली उत्तरं मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचे तीन अभारतीय मानकरी भारताविषयी लिहिते झाले होते. कवी ऑक्टोविओ पाझ (नोबेल १९९० मध्ये) यांची भारतात मेक्सिकोचे राजदूत म्हणून रीतसर नेमणूक झाली असता त्यांनी हा देश भरपूर पाहिला. पुढे ‘इन लाइट ऑफ इंडिया’ यांनी म्हटलं होतं. पाझ यांनी ही उत्तरं शोधणारं पुस्तक लिहिलं. पाझ यांच्यानंतर सुमारे १६ वर्षांनी भारतात दीर्घ वास्तव्याच्या इराद्यानं गुंटर ग्रास कोलकात्यास आले. पाझ यांनी भारत पाहिला होता, तर ग्रास यांनी सामाजिक विषमता आणि तिचं महत्त्वाचं दृश्यरूप असलेली गरिबी पाहिली. तिसरे नोबेल-मानकरी म्हणजे व्ही. एस. नायपॉल. त्यांनी ‘इंडिया : अ मिलियन म्यूटिनीज नाऊ’ या पुस्तकातून, भारतात बंडखोरांना (सुधारकांना) पुन्हा ‘आपलेच’ मानणारी (आणि पुन्हा पूर्वपदावर येणारी) स्थितिशीलता कशी दिसते हे मांडलं. नायपॉल यांचं भारतविषयक लिखाण कधी कादंबरीत दिसलं नाही. नायपॉल यांच्या कादंबऱ्यांतली भारतीय वंशाची पात्रं (मिस्टिक मॅस्यूर, अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास) त्रिनिदाद वगैरे देशांमधली असतात. ऑक्टोव्हिओ पाझ यांच्या निबंधांत आणि कवितांत भारत जसा पाझरतो, तसं नायपॉल यांनी भारतात येऊन गेल्यावर लिहिलेल्या पुस्तकांचं होत नाही. ते ‘प्रवासी’च राहतात. त्यांना आपल्या भूमिका भारतामुळे बदलायच्या नसतात. ग्रास याबाबतीत पाझच्या जवळ जाणारा आहे. अर्थात, ‘जर्मनीच्या विवेकाचा आवाज’ असं ग्रास यांचं वर्णन होत असे, हे लक्षात घेता नायपॉल यांच्याशी त्यांची तुलना व्यर्थच आहे. लिखाण राजकीय-सामाजिक जाणिवेतून झालं पाहिजे, या मताचे ग्रास हे खंदे पुरस्कर्ते होते; पण त्यांच्या राजकीय/ सामाजिक निरीक्षणांना नेहमीच लेखकीय ‘जाणिवां’चा आधार असे.
दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात बालपण गेलेल्या आणि मध्यमवर्गीय घरातल्या गुंटर ग्रास यांना गरिबी माहीतच नव्हती असं नाही; पण भारतासारख्या सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध मानल्या जाणाऱ्या देशानं त्यांना विद्यमान गरिबीचा, विद्यमान विषमतेचा चेहरा दाखवला. मुख्य म्हणजे, आपण या गरिबीशी कसे वागणार आहोत, असा प्रश्नही भारतामुळे त्यांना पडला. त्याची लौकिक- मानवी पातळीवरली उत्तरं- म्हणजे एखाद्या संस्थेला आर्थिक मदत देत राहणं वगैरे – त्यांनी स्वत:पुरती शोधलीच. पण महत्त्वाचं असं की, प्रत्येक भारत-भेटीचं कशा ना कशा प्रकारचं प्रतिबिंब ग्रास यांच्या लिखाणात उतरलं. ग्रास यांच्या ‘द फ्लाउंडर’ (डेर बुट) या १९७७ सालच्या कादंबरीत वास्को नावाचं एक पात्र अवचितच येतं. वास्को द गामा ‘आजच्या’ भारतात पोहोचतो आणि आपल्याला हवा असलेला भारत हा नव्हता, हे त्याच्या लक्षात येतं. ‘वास्को रिटर्नस्’ नावाच्या या प्रकरणात ग्रास यांनी लावलेला सूर आत्मनिवेदनपर आहे. वास्को द गामा हे पाश्चात्त्य भारत-कल्पनांचं आद्य मनुष्यरूप, म्हणून इथे- ऐन १९७५ सालच्या (संजय गांधींच्या काळातल्या) भारतात- येतं. इथं आता म्युझियम वगैरे झालीत आणि या देशानं आपला देदीप्यमान इतिहास त्यात ठेवलाय, पण दिल्लीत झोपडय़ासुद्धा वाढू लागल्या आहेत, असं ग्रास हे या कादंबरीतल्या ‘वास्को’कडून वदवून घेतात. ग्रास दिल्लीत ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मध्ये व्याख्यानाचं निमंत्रण स्वीकारून आले, पण त्यांनी एकही संग्रहालय न पाहता झोपडपट्टय़ा पाहिल्या होत्या, असं मार्टिन काम्पशेन यांनी ‘माय ब्रोकन लव्ह : गुंटर ग्रास इन इंडिया अ‍ॅण्ड बांग्लादेश’ या पुस्तकाच्या ५० पानी प्रस्तावनेत म्हटलं आहे.
हे मार्टिन काम्पशेन गेली ३० र्वष शांतिनिकेतनात राहतात. ‘टागोर अभ्यासक’ अशी ख्याती असलेल्या काम्पशेन यांनी गुरुदेवांच्या काव्याचे खंडच्या खंड मूळ बंगालीतून जर्मन भाषेत आणले, रवीन्द्रनाथांचा प्रभाव पाश्चात्त्य आणि भारताबाहेरल्या अविकसित देशांवरही कसा पडला याचं संशोधन केलं.. आणि ग्रास त्यांना मित्र मानत! मुंबईतल्या सभेसाठी कोलकातामार्गे मार्टिन काम्पशेन खास आले होते. त्यांचं ग्रासवरलं ते पुस्तक पेंग्विन-व्हायकिंगनं २००० सालीच काढलं असलं तरी हल्ली ते कुठेच मिळत नाही आणि मुंबईतल्या ‘मॅक्समुल्लर भवना’च्या ग्रंथालयात मात्र त्याची प्रत वाचायला मिळते. या पुस्तकात ग्रास यांच्या भारतविषयक चार महत्त्वाच्या मुलाखती आहेत आणि चित्रकार शुवप्रसन्न, मॅक्समुल्लर भवनाचे तत्कालीन प्रमुख जोकिम ब्यूल यांच्या आठवणीदेखील. पण ग्रास यांच्याविषयी साहित्यिकांना काय वाटतं, याचा शोध घेणारा भाग विखुरलेला असला तरी अधिक महत्त्वाचा आहे. समीक्षकाग्रणी सदानंद मेनन आणि इंग्रजी साहित्यव्यवहारात स्वत:ला गाडून घेणारे पी. लाल आणि बंगालमधले समीक्षक शुभरंजन राय तसंच बेहुला चौधुरी यांच्या मुलाखती या पुस्तकात आहेत. ‘कलकत्त्याचे प्रश्न हे आजच्या जगाचेच प्रश्न आहेत, हे ग्रास यांनी जाणलं होतं’ असं बिनतोड विश्लेषण सदानंद मेनन करतात. प्रस्तुत मजकुरासाठी या पुस्तकाचं एकदा (काहीसं वेगानं) वाचन झालेलं असल्यामुळे, त्यातील संदर्भ इथे वारंवार येत राहतील.
ग्रास यांनी अगदी पहिल्या भारतभेटीत दिल्लीमध्ये दिलेलं ते व्याख्यान या पुस्तकात आहे. ‘संयुक्त राष्ट्रांकडून जगाला जी आशा होती, ती आता उरलेली नाही’- ‘तिसऱ्या जगाच्याही पलीकडे, गरिबांमधले गरीब देश अशी ओळख असलेलं आणि गरीबच राहणारं ‘चौथं जग’ आहे’, अशी विधानं करत या व्याख्यानात ग्रास यांनी, जगात एकंदरच उमदेपणा कमी आणि ‘दारिद्रय़’ (आर्थिक गरिबीच्या पलीकडली स्थिती, या अर्थानं) वाढतं आहे, याकडे लक्ष वेधलं आणि याला कारणीभूत असलेल्या विषमतेवर प्रहार केले. या व्याख्यानाच्या अखेरीस भारतीयांना ग्रास यांनी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचं मराठी भाषांतर साधारण असं :
‘‘मग मी तुम्हाला- आणि मला स्वत:लासुद्धा- असं विचारतो की, भारतातलं दारिद्रय़ खरोखरीच इतकं अटळ वगैरे आहे का.. जणू काही, भागधेय किंवा ‘कर्मा’नंच ते या देशाच्या माथी मारलं आहे? तसं असेल, तर मी (मला इथे मिळालेल्या) शहाणपणाची कडवट चव घेऊनच घरी (जर्मनीत) परतेन. किंवा (त्यापेक्षा हेच खरं आहे ना? की-) भारतातलं दारिद्रय़ हे जगातल्या एकंदर दारिद्रय़ाप्रमाणेच वर्ग आणि जात-वर्चस्ववादामुळे, आर्थिक अपयशांमुळे आणि भ्रष्टाचारामुळे वाढतं आहे? तसंच असेल, तर हे दारिद्रय़ आपण नाहीसं करू शकतो.. ते मानवी प्रयत्नांचं (प्रयत्नांच्या आवाक्यातलं) काम आहे.’’
यावरून इतकं निश्चित समजतं की, भारताबद्दल ग्रास हे अगदीच ‘वास्को’ नव्हते! या देशाच्या ‘इनर्शिया’ला- स्थितिवादाला कारणीभूत असलेल्या तत्त्वज्ञानाची जुजबी माहिती त्यांना होती आणि भारताची स्थिती बदलण्याचं काम या स्थितीच्या आकलनापासून सुरू झालं पाहिजे, याची जाणही त्यांना होती.
इथून पुढे मुद्दाम, ‘हेडबर्थस्- ऑर, द जर्मन्स आर डाइंग आउट’ या १९८२ सालच्या अपरिचित कादंबरीकडे लक्ष वेधलं पाहिजे. ग्रास यांच्या दीर्घ कोलकाता-वास्तव्याच्या (१९८६) आधीची ही कादंबरी ‘द व्हेक्सिंग चीअरफुलनेस ऑफ बॉम्बेज् पुअर’ नावाच्या प्रकरणात, मुंबईत ‘गरिबीचं छानपैकी दर्शन घ्यायला’ आलेल्या एका जर्मन दाम्पत्याचे अनुभव मांडते. ‘धारावी टूर’ (- झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या या वस्तीतील उद्योगजगत पाहा) अशा रीतसर जाहिराती एकविसाव्या शतकात सुरू झालेल्याच आहेत, त्याआधीचं हे पुस्तक ग्रास यांच्या १९७८ सालच्या धावत्या मुंबई-भेटीवर आधारित आहे. त्यात कथाभाग असा की, ‘सिसिफस टूर्स’ नावाची कंपनी दारिद्रय़ाचा साक्षात् अनुभव देण्यासाठी गलिच्छ वस्तीतून फॉरेनरांना फिरवून आणते. तुम्ही आणखी पैसे मोजलेत तर झोपडीतच रात्र घालवण्याचं ‘अ‍ॅडव्हेंचर’सुद्धा तुम्ही करू शकता, अशी ‘सोय’ या सिसिफस कंपनीनं दिली आहे. आपल्या टूरमधून ‘जास्तीत जास्त अनुभव’ उपटायचेत असं ठरवून पैसे उधळणारं ते जर्मन जोडपं, चावणाऱ्या डासागणिक पैशाचा पुरेपूर मोबदला घेत असताना आसपास दिसलेल्या गरिबांबद्दल विचार करतं तेव्हा त्यांना एक साक्षात्कार होतो : गरिबांचं आनंदीपण, काळोखातच राहणारे ते हसरे चेहरे- हे ‘भयावह- भयानक सौंदर्य’ आहे.
‘कलेच्या सौंदर्यलक्ष्यी कार्या’बद्दल चरचरीत भाष्य इथे आहेच, शिवाय सिसिफस हे नाव वैशिष्टय़पूर्ण आहे (ग्रीक कथेतला सिसिफस एक गोल दगड उंच डोंगरावर चढवण्याच्या कामी लागलेला असताना कित्येकदा तो दगड गोलाईमुळे पायथ्याशी येतो). मात्र आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं हे ठरतं की, जर्मन आणि पुढे इंग्रजी वाचकांना ‘भयावह- भयानक सौंदर्या’चा ग्रासनं देऊ केलेला अनुभव गरिबीतल्या ‘सुखा’शी संबंधित आहे आणि हे सुख मुंबईत तुम्हाला पाहायला मिळतं, असं लेखक सांगतो आहे. अशा ‘भयावह’ अनुभवाशी असलेला दूरस्थपणा संपावा, यासाठी स्वत:च्याच पात्रांना उपरोधविषय बनवण्याची जोखीम हा लेखक उचलतो आहे. याबद्दल मार्टिन काम्पशेन यांनी पुस्तकात दिलेला तपशील असा की, ‘तेरे देस होम’ (माणसांची पृथ्वी) या बिगरसरकारी संस्थेचं भारतातलं काम पाहणारे आदी पटेल हे पारशी गृहस्थ गुंटर ग्रास आणि त्यांची पत्नी ऊटे यांना मानखुर्दनजीकच्या चित्ता कॅम्प झोपडपट्टीत घेऊन गेले होते, तिथलं हे वर्णन आहे. याच प्रकरणात पुढे मुंबईनजीकच्या मनोरी बेटावरल्या कोळीवाडय़ातला अनुभवही आहे.
‘शो युअर टंग’ हे अख्खं पुस्तकच कोलकाता शहरातल्या जवळपास सहा महिन्यांच्या वास्तव्यावर आधारित आहे. मार्टिन काम्पशेन यांच्या पुस्तकात ‘शो युअर टंग’चे अंश देणं खुबीनं टाळलं आहे. पण रेखाचित्रं, अनुभव टिपणारी दैनंदिनी आणि कविता यांचा हा मेळ ज्या फिरणं-बोलणं यांवर आधारित आहे, त्यांची दुसरी बाजू कोलकात्यात ग्रास यांना बऱ्याचदा भेटलेल्या माणसांनी या पुस्तकात मांडली आहे. ग्रास कोलकात्यात अगदी म्हणजे अगदी साधेपणानंच राहिले, दूरच्या खेडेवजा गावातून लोकल गाडी पकडून रोज ते कोलकाता शहरात येत, माणसांशी बोलताना नेहमीच शांतपणाने ऐकून घेत आणि मोजकेच प्रश्न विचारत, हे तर बऱ्याच जणांनी सांगितलंच आहे. परंतु चित्रकार शुवप्रसन्न हे ग्रास दाम्पत्याच्या या घरी गेले असता ‘पाऊस पडत होता.. गुंटर ग्रास मला त्यांनी केलेली काही मुद्राचित्रे दाखवत असताना, पावसाने अख्खे छप्पर गळू लागले होते. त्या गळत्या-टपकत्या थेंबांचा मारा चुकवण्याची कसरत मात्र ग्रास यांनी अचूकपणे केली आणि मुद्राचित्रे दाखवण्याचे काम पूर्ण केले’ असाही अनुभव आहे. पुढे शुवप्रसन्न यांनीच, शहराच्या साल्ट लेक भागात आपल्या एका नातेवाइकाचे रिकामे अपार्टमेंट ग्रास यांना राहायला दिले. ग्रास कोलकात्यात भरपूर लेखकांना भेटले होते (ते मदर तेरेसांना किंवा सत्यजित रायना भेटले नाहीत), त्याचे संदर्भही या पुस्तकात अनेकांकडून येतात. ग्रास यांनी कोलकात्यातील ज्या ‘कलकत्ता सोशल प्रोजेक्ट’ (सीएसपी) या संस्थेला मदत केली, तिच्या संस्थापक कल्याणी कार्लेकर पुस्तकातील पूर्ण प्रकरण लिहू शकल्या नाहीत, पण त्यांचे पत्र मार्टिन काम्पशेन यांनी प्रस्तावनेत उद्धृत केले आहे.
मुंबईतल्या आदरांजली सभेत, मार्टिन काम्पशेन यांनी ग्रास यांच्याबाबत अटळपणे चर्चिल्या जाणाऱ्या मुद्दय़ालाही हात घातला. ‘मी १७ वर्षांचा असताना नाझींच्या ‘एसएस-वाफेन’मध्ये काम केले होते’ ही कबुली ग्रास यांनी २००६ मध्ये दिली. माणसे मारण्याच्या कामाशी त्यांचा संबंध नव्हता. या कबुलीनंतर, ‘ते इतका काळ गप्प का राहिले?’ हा प्रश्न सुनामीसारखा उचंबळला. एका तरुण पोराचा नाझींमध्ये सहभाग, या गुन्ह्यापेक्षा ‘एका लेखकाने- ‘विवेकाच्या आवाजा’ने त्याबाबत गप्प राहणे’ हाच मोठा गुन्हा मानला गेला.. पण, ‘भारतात मात्र तसे झाले नाही’ असे मार्टिन काम्पशेन म्हणाले.
ते खरेच आहे. भारतीय माध्यमांनी, बिनीच्या लेखकांनी किंवा सामान्य वाचकांनीही ग्रास यांच्या कबुलीची बातमी फारशी गंभीर मानली नाही, त्यावर संताप वा नापसंतीची प्रतिक्रियाही भारतातून उमटली नाही. ‘असे का झाले?’ हा प्रश्न मार्टिन काम्पशेन यांनी सभेत उपस्थित केला. त्याची संभाव्य उत्तरेही त्यांनी दिली : (१) हिटलरनं अत्याचार केले, हे काही ‘भारतीय इतिहासावरलं ओझं’ नाही.. म्हणून अनेक भारतीय आजही हिटलरकडे एक कार्यक्षम नेता म्हणून पाहू शकतात. त्यामुळे भारतात ग्रास यांची कबुली ‘धक्कादायक’ ठरलीच नाही. (२) लहान होता, चुका झाल्या- होणारच, अशी क्षमाशीलता भारतीय मानसिकतेत आहे. (३) भारतावर ज्या इतिहासाचे ओझे आहे, तो फाळणीपासूनचा इतिहास आहे.. त्याबद्दल कुणी कधी कबुल्या वगैरे दिल्या, त्या गाजल्या, असे काही इथे झालेले नाही.. त्यामुळे, ग्रास यांनी उशिरा का होईना, कबुली दिली, याचेच विचारी भारतीयांना अप्रूप वाटले असावे.
..काम्पशेन यांची ही मीमांसा भारतीयांना समजून घेण्याच्याच इच्छेने आणि भारतीयांचा पूर्ण आदर ठेवूनच होती, यात वाद नाही. हे भारतीय मानसिकतेला समजून घेणं होतं. पण ग्रास यांच्या पहिल्या व्याख्यानाच्या अखेरीला भारत बदलण्याची जी प्रयत्नवादी जिगर दिसत होती, तिच्याशी अर्थातच हे अशा प्रकारे ‘समजून घेणं’ (समजुतीने गप्प बसणं) सुसंगत नाही. ती जिगर कुठे जाते, याच्या शोधासाठीच तर भारतात ग्रास आपणहून (कुणीही प्रायोजित केलं नसताना) राहायला आले. स्वधर्माशी- विशेषत: कॅथलिक ख्रिश्चनांशी नेहमीच फटकून असणारा आणि धर्म, जात, वर्ण हे भेद असू नयेत यासाठी लिहिणारा ग्राससारखा लेखक भारतीयांना सांगत होता.. ‘शो युअर टंग’ – कालीमातेनं दुष्टांचं निर्दालन करण्याआधी तिची जीभ दाखवली.. तुम्ही लेखक- कवी- पत्रकार मंडळी, तुमची भाषा तरी दाखवा..
हे सांगू पाहणाऱ्या ग्रास यांचा प्रयत्नवाद वायाच गेला आहे, अशी सूचक कबुली मार्टिन काम्पशेन यांच्या व्याख्यानाअंती मिळत होती.
‘अनेक सुधारकी विचारांचा पराभव ही भूमी करणार’ असा सूर नायपॉल यांनी तर लावलेलाच होता. त्याप्रमाणेच ग्रास यांच्या प्रयत्नवादाचं ‘वांगं’ झालं का?
हे खरं मानायचं, तर ‘ग्रास यांचा भारत’ हे या मजकुराचं शीर्षकही व्यर्थच ठरेल.