अज्ञान काय ते सांगता येतं आणि त्या अज्ञानाचं निरसन झालं की ज्ञान आहेच! आता हे वाक्य सरळ एका ओघातलं वाटतं ना? पण या वाक्याचे दोन भाग आहेत. ‘अज्ञान काय आहे ते सांगता येतं’ हा पूर्वार्ध आणि ‘त्या अज्ञानाचं निरसन झालं की ज्ञान आहेच’ हा उत्तरार्ध. या पूर्वार्ध आणि उत्तरार्धाच्या मध्ये ‘आणि’ ही एक फार मोठी, खोल दरी आहे! ती पार करणं सोपं का आहे?  ते अज्ञान कसं काढून टाकणार, त्याचं निरसन कसं करणार, ही दरी कशी ओलांडणार? साईबाबा नानासाहेब चांदोरकर यांना जे विचारतात की, ‘‘नाना नुसता नमस्कार करून, नुसती सेवा करून आणि नुसता प्रश्न विचारून ज्ञान ‘मिळतं’ का रे?’’ त्याचा मथितार्थ हाच आहे की, ही दरी ओलांडणं एवढं सोपं आहे का? ही दरी कशी ओलांडावी? नुसती सेवा करून, नुसता नमस्कार करून आणि प्रश्न विचारून उत्तर मिळालं तरी तेवढय़ानं दरी ओलांडता येईल का? एक काटकुळा माणूस आहे. तो एका पैलवानाच्या सेवेत राहिला. त्याला प्रणिपात करू लागला नि एक दिवस त्यानं विचारलं, ‘‘मी पैलवान कसा होईन?’’  मग पैलवानानं दिलेलं उत्तर नुसतं ऐकून का तो काटकुळा माणूस लगेच पैलवान बनेल? नाही ना? त्या उत्तरानुसार आचरण करावं लागेल ना? तर, ‘अपेक्षित जे आपुले’च्या दोन बाजू आहेत. अहो, गवयाला वाटतंच ना, की आपल्या पोरानंही गवई व्हावं असं? पण त्यासाठी बापानं जशी गानतपस्या केली तशी आपल्या परीनं पोरानंही करायला हवी ना? मग जो आनंद माझ्या सांगण्यानुसार प्रयत्न करताच सहजसाध्य आहे, तो माझ्या माणसाला मिळावा, अशी आस सद्गुरूंना नसणार का? त्यांच्याजवळ राहूनही आम्ही दु:खं ओढवून घेतो याचं त्यांना वाईट वाटतं. ‘उभा कल्पवृक्षातळी दु:ख वाहे’ ही आमची स्थिती बदलावी, अशी कळकळ त्यांना वाटते. तेव्हा आपल्या शिष्यानंही परमानंदाची प्राप्ती करावी, अशी त्यांची आपल्याकडून अपेक्षा आहे. त्या अपेक्षेला अनुसरूनच ते सर्व बोध करतात. आमचा प्रश्न कोणताही असो, भौतिकातलं आमचं रडगाणं कोणत्याही सुरातलं असो, त्यांचा बोध एकच असतो! प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात आणि मांडणी वरकरणी वेगळी भासेल, पण शेवटी त्यांचं पालुपद एकच असतं, भगवंतावर सर्व भार सोडा! ‘तू व्यापक हो’ हे एकच उत्तर आहे त्यांचं. ‘मी’ आणि ‘माझं’चं मनातलं ओझं बाजूला ठेव, हे उत्तर आहे त्यांचं. मग त्यांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या सांगण्यानुसार वागू लागणं, ही त्यांची खरी सेवा आहे! लोक श्रीमहाराजांकडे गोंदवल्यास येत, श्रीमहाराजच कशाला, पावसला स्वरूपानंदांकडे, शिर्डीला साईबाबांकडे लोक येत, त्या येण्याचा हेतू काय असे? त्यांची सेवा करावी, बोध ऐकावा. प्रत्यक्षात काय होतं? आम्ही आमच्या प्रापंचिक अडीअडचणीच त्यांच्यासमोर मांडत राहातो आणि त्या दूर कराव्यात, या इच्छेची माळ मनात जपत राहातो. श्रीमहाराज एकदा म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही माझी सेवा करायला येता, की माझ्याकडून सेवा करून घ्यायला येता?’’ तेव्हा माझ्या इच्छेनुसार त्यांनी गोष्टी घडवाव्यात, ही खरी सेवा नव्हे, तर त्यांच्या इच्छेनुसार मी घडावं, ही खरी सेवा.