पावसाळा आला की खड्डय़ांच्या आणि लोकल तुंबल्याच्या बातम्या येणार. हिवाळा आला की शेकोटय़ांची छायाचित्रे प्रथमपृष्ठी दिसणार वृत्तपत्रांच्या आणि उन्हाळ्यात दुष्काळाची, पाणी टंचाईची वार्तापत्रे लिहिण्यास वृत्तपत्र प्रतिनिधींचे हात शिवशिवू लागणार. याला का बातम्या म्हणावयाचे? वृत्तपत्रविद्या काय सांगते, की मनुष्यास कुत्रा चावला तर ती बातमी नाही. हल्ली त्याही बातम्या येतात म्हणा ठळक टंकात. परंतु शास्त्रशुद्ध बातमी ती हीच, की जी सांगते की मनुष्यप्राणी कुत्र्यास चावला. आता या न्यायाने आक्टोबरमासी आक्टोबरताप वाढला तर त्यास का वृत्तावलीत बसवायचे? किंवा या मासोत्तमात विजेची टंचाई निर्माण झाली, तर का लगेच घामाघूम व्हायचे? विजेचे भारनियमन हे का सत्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे आपल्याकडे? पण तरीही माध्यमे आपली जागा भरण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या मोठय़ा करून छापतात, यास काय म्हणावे? काय तर म्हणे, अडीच हजार मेगावॉटपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. मग? बिघडले काय त्यात? वीजप्रकल्पांना पुरेसा कोळसा मिळत नाही म्हणून वीजनिर्मितीत घट झाली. यात काय विशेष? होणारच ना तसे. कोळसा मिळत नाही म्हटल्यावर काय कागद जाळून वीज तयार करणार? बरे कोळशाचेही असे आहे की त्याचा पुरवठा सुरळीतच आहे. कोळसामंत्र्यांनीच तशी घोषणा केल्यानंतर पुढे शंका उरतेच कोठे? तेव्हा सत्य हे की भारनियमन होत आहे आणि त्याने कोणी उगाच तापण्याचे कारण नाही. खरे तर आता नागरिकांनी त्याची सवय करून घ्यायला नको का? आयुष्यात का फक्त विजेचेच भारनियमन आहे? किती तरी भारांचे नियमन करूनच आपल्याला जगायचे असते ना? भार महागाईचा, भार कुटुंबाचा, भार कार्यालयीन कामाचा, भार लोकल प्रवासाचा, त्यातील गर्दीचा. त्रिविध ताप असतात जीवनात, तसेच नाना भार असतात. त्याने खचून आपण घामाघूम झालो तर व्हायचे कसे? आणि अखेर आपल्या भल्यासाठीच झटणाऱ्या सरकारला याची काळजी नाही का? वजनउचल व्यायाम प्रकारात नाही का आपण हळूहळू किलोकिलो वजन वाढवत नेतो. त्यामुळे आपली क्षमता वाढत जाते. तद्वतच सरकार आपली भारवहन क्षमता वाढविण्याकरिता भिन्नभिन्न उपक्रम राबवीतच असते. आताचेच पाहा ना, काही दिवसांसाठीच असलेले विजेचे भारनियमन हळूहळू दिवाळीपर्यंतही वाढविण्यात येत आहे. क्षमता वाढविण्याचाच हा प्रकार. यामुळे नागरिक कसे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सशक्त होतात. त्यांस छान झोप लागते व रात्री स्वप्ने पडत नाहीत. अशा अस्वप्नाळूंना मग दिवसाची स्वप्नेही छान आनंद देतात. पण माध्यमांना काय त्याचे? कसलेही नियमनच उरलेले नाही त्यांना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on electricity shortage in maharashtra
First published on: 06-10-2017 at 02:46 IST