नशीब, दैव, योगायोग या साऱ्या मनाच्या आभासी अवस्था आहेत. मुळात मन हीच एक आभासी अवस्था असल्याने, मनाच्या नावावर सुरू असलेल्या खेळात अधिक रममाण होण्यात अर्थ नसतो. त्यामुळे, या साऱ्या आभासी अवस्था असतील, तर ‘भौतिक’ काय, असा प्रश्न पडतो, आणि त्याचे उत्तरही मिळते. ‘कर्म’ हीच ती भौतिक अवस्था! पण आपली संस्कृती मोठी विचित्र आहे. मुळात, मनाप्रमाणेच, संस्कृती हीदेखील एक आभासी अवस्थाच म्हणायला हवी. या संस्कृतीच्या खोलात शिरले, की अधिकच गोंधळायला होते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे शिकविणारी ही संस्कृती, ‘कर्म करीत राहा, फळ आपोआप मिळेल’, असा विश्वास देते आणि आपण ‘कधी तरी फळ मिळेल’, असा आशावाद जोपासत बसतो. तेवढय़ात, ‘फळाची अपेक्षा न करता कर्म करा’, असा हितोपदेश ऐकू येतो आणि मन सैरभैर होते. कर्म हीदेखील आभासी अवस्था आहे की काय असे वाटू लागते. फळाची अपेक्षा न करता कर्म करणे म्हणजे, नशिबावर हवाला! नशीब बलवत्तर असेल तरच फळ मिळेल, हा संदेशच खरा असे वाटू लागते आणि नशिबाच्या मागे धावणे सुरू होते. असे धावणे ही मात्र ‘भौतिक’ अवस्था असते, म्हणून तर लॉटरीसारख्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. मग कधी एखाद्या सरकारला वाटू लागते की, लॉटरीमुळे समाज दैववादी होऊ  लागला आहे. कर्मावरचा त्याचा विश्वास ढळू लागला आहे आणि एकूणच या दैववादात गुरफटण्यामुळे देशाला ऐदीपणाची सवय लागत आहे. असा विचार करणारा कुणी तरी लॉटरीसारख्या नशिबाच्या खेळावर बंदी आणण्याचाही विचार करू लागतो, पण पुन्हा त्यापासून सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या महसुलाचे आकडे त्याच्या मनाभोवती फेर धरू लागतात. मन ही आभासी अवस्था असली, तरी त्यामध्ये नाचणारे हे आकडे हे भौतिक वास्तव असते आणि ते नाकारता येणार नसल्याने लॉटरीबंदी हे केवळ स्वप्न होऊन जाते. स्वप्न हीदेखील एक मानसिक आणि आभासी अवस्था असल्याने, ते कधीच खरे ठरणार नसते. त्यामुळे लॉटरीबंदी झालीच, तर तो योगायोगच ठरेल, असा विश्वास बळावू लागतो. आता अशा योगायोगाचे वास्तव दिवस दिसू लागले आहेत. ‘जीएसटी’ नावाच्या एका भौतिक कर्मामुळे लॉटरीबंदीचे आभासी स्वप्न वेगळ्या मार्गाने वास्तवात उतरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. लॉटरी नावाच्या नशिबाला ‘जीएसटी’चा भार सोसवेना झाल्याने त्याची गती मंदावत आहे आणि नशीब व कर्म यांच्या या शर्यतीत कर्माचा विजय होतो आहे. कर्माचा विजय होतो, तेव्हा नशीब हताश होते आणि शेवटी पदरात दु:ख पडते, हे आभासी असले तरी सत्य असते. महसुलाचा भौतिक मुद्दा निघाला, की आभासी असलेल्या सत्याचाही विजय होतो, तो असा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on lottery business flops due to gst