आपल्या देशातील लोकांचं काही सांगता येत नाही. कुठं खुट्ट झालं तरी त्यांना ऐकू येतं, कुणाची पापणी लवली तरी त्यांना दिसतं. मग हे ‘ऐकू आलेलं’.. ‘दिसलेलं’ समाजमाध्यमांच्या चावडीवर मांडण्याची त्यांना कोण घाई. अगदी परवाची गोष्ट. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गेले होते त्यांच्या राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पन्ना जिल्ह्य़ात. तिथल्या कामटा गावात पाऊस आणि पुरानं कहर केलेला. अशा पावसात गावातले नाले दुथडी भरून वाहणारच. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचा सुरक्षारक्षकांचा, पोलिसांचा ताफा यांना असाच एक नाला ओलांडायचा होता. बघतात तो काय, नाल्याला जवळपास पावलांच्या वपर्यंत पाणी. त्यातून सुरक्षारक्षक, पोलीस पार जातील, पण मुख्यमंत्र्यांचे काय? ते कसे जाणार इतक्या पाण्यातून? नाला पार करण्यासाठी हाती काही साधन नाही. एरवी सुरक्षारक्षक, पोलीस यांना सवय एखाद्याला त्याचं बखोट धरून उचलायची. तीच सवय इथे कामी आली आणि चौहान साहेबांना बखोट धरून नाही, तर अलगदपणे उचलून त्यांनी नाल्याच्या पार सुरक्षित नेलं. इतकी साधी गोष्ट ही. मुख्यमंत्र्यांचा पूरदौरा म्हणजे छायाचित्रकार असणारच तिथे. त्या छायाचित्रकारांनी या दृश्याची छायाचित्रे काढली पटापटा, वृत्तपत्रांनी ती छापली आणि समाजमाध्यमांवर त्यावर प्रतिक्रियांचा पूरच आला. कुणी म्हणालं, ‘ही तर शिवराजसिंह चौहान यांनी केलेली पुराची हवाई पाहणी’.. कुणी म्हणालं, ‘हे तर पूरऑलिम्पिकच’.. कुणी दुसरा फोटोच दाखवत म्हणालं, ‘त्या ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून अशा वेळी गमबूट घालून पाण्यात उतरतात’. काय म्हणावं या असल्या प्रतिक्रियांना! या प्रतिक्रियाबाजांनी जरा वास्तव जाणून घ्यायला हवं. खरं तर आपल्याला सुरक्षारक्षकांनी असं उचलून न्यावं, अशी मुळीच इच्छा नव्हती चौहान यांची. पण ‘एवढय़ा पाण्यातून जाऊ नका साहेब, आम्ही तुम्हाला उचलून नेतो’, असं म्हणत सुरक्षारक्षक गळीच पडले त्यांच्या. लाख भिजले तरी चालतील.. लाखांचा पोशिंदा भिजता कामा नये, असं त्यांचं म्हणणं. त्यांचं मन चौहान यांना मोडवेना. त्यातून हे उद्भवलं. खरं बघायला गेलं तर पुराची पाहणी विमान, हेलिकॉप्टर यातूनच करायची असते. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच करतात. आणि आपले प्रधानसेवक तर पुराचीच काय, अनेक गोष्टींची अशीच हवाई पाहणी करतात. पण त्यांची नजरच एवढी तीक्ष्ण की त्यातून काही म्हणता काहीच सुटत नाही. अशा हवाई पाहणीमुळे दृष्टी व्यापक होते. समोर जे काही दिसतंय त्यामुळे मन उगाच भरून वगैरे येत नाही. त्यावर अलिप्तपणे विचार करता येतो आणि वास्तवास धरून तोडगे सुचतात. तेव्हा राजस्थानच्या वसुंधराराजेंप्रमाणे शिवराजसिंहांनीही विमान विकत घेण्याचं जमवावं, हे बरं!