कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पराकोटीचे पुरोगामी नेते आहेत, यात शंका नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा असल्या भाकडकथांवर त्यांचा अजिबात विश्वास नाही. उलट, असल्या अनिष्ट समजुतींच्या विळख्यातून समाजाला सोडविण्यासाठी कठोर कायदा केलाच पाहिजे, यासाठी ते सतत आग्रही होते. आपली ही भूमिका ते आक्रमकपणे समाजाच्या गळी उतरविण्यासाठी प्रयत्न करत असत. हळूहळू बदल घडेल आणि या प्रथा बंद होऊन अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज जागा होईल, यावरही त्यांचा विश्वास होता. पण अचानक, दहा दिवसांपूर्वीच्या त्या घटनेने अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमेचा सारा नूरच पालटून गेला. जेमतेम दहा मिनिटांच्या त्या खेळाने सारे भविष्यच जणू बिघडून गेले. काही गोष्टींचे आकलनच होत नाही, तेव्हा त्याचे अर्थ शोधण्याचे प्रयत्न सुरू होतात. सिद्धरामय्यांच्या आलिशान सरकारी गाडीवर बसलेल्या एका इवल्याशा कावळ्याच्या पिल्लाने अंधश्रद्धा विरोधाच्या लढाईलाच जोरदार धक्का दिला. एका महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या बोनेटवर बसलेले हे बिचारे पिल्लू पंख पसरून भरारी मारण्याएवढे मोठेही झाले नव्हते. त्याला तेथून उठविण्याचे सारे प्रयत्न थकल्यावर अखेर कुणीतरी त्याला उचलून दुसरीकडे ठेवले, आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे निघाला. पण तोवर प्रस्थानाच्या मुहूर्ताची वेळ हुकली होती. तब्बल दहा मिनिटांच्या या विलंबामुळे सारे वेळापत्रकच विस्कळीत झाले होते. एका कावळ्याने मुख्यमंत्र्यांना असा इंगा दाखविल्यानंतर उभ्या कर्नाटकात त्याची चर्चा तर होणार, हे साहजिकच होते. मग शकुन-अपशकुनाच्या शंकाही सुरू झाल्या आणि कुणीतरी मुख्यमंत्र्यांच्या शनि-पीडेची शंका बोलूनही दाखविली. राजवाडय़ाच्या सौधावर बसला तरी कावळा कधी मोर होत नाही, असे माणसाचे म्हणणे असले, तरी त्या बिचाऱ्या कावळ्यास मात्र, राजवाडा काय आणि झाडाची फांदी काय, दोन्ही सारखेच असते. आपण ठिय्या मारलेली गाडी राज्याच्या मुख्यमंत्र्याची आहे, हे त्याला माहीत असते, तर असा उद्दामपणा करण्याची त्याची िहमत तरी झाली असती का?.. पण तो तेथे बसला यात शकुनाचेच काहीतरी संकेत असले पाहिजेत, असे जनतेला वाटू लागले असावे. शेवटी, मुख्यमंत्र्याच्या पदावरील व्यक्तीला जनभावनांचा आदर करावाच लागतो. कावळा हा तर शनीचे वाहन असल्यामुळे आपल्या नेत्यावर शनीची वक्रदृष्टी तर होणार नाही ना, या चिंतेने राज्याच्या जनतेला ग्रासले असेल, तर त्याची दखल घेऊन जनतेच्या मनातील भयभावना दूर करणे हेही राज्यप्रमुख म्हणून त्याचे कर्तव्यच ठरते. सिद्धरामय्या हे अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचे कट्टर विरोधक असल्याने, कावळ्याच्या त्या अपशकुनावर भलतासलता कर्मकांडाचा उतारा करण्याचे टाळून त्यांनी थेट गाडीच बदलून टाकली. कावळा बसलेली ती गाडी आता वापरातून रद्द झाली आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसाठी ३५ लाखांची नवी गाडी तनात करण्यात आली आहे. कावळा बसायला आणि गाडी बदलायला एकच गाठ पडली असे तर कदाचित झाले नसेल ना?