‘अजिबात एक शब्द बोलू नकोस’ दिवाणखान्यातल्या एका कोपऱ्यात ‘प्रमोटेड कोविड १९’ अशी गुणपत्रिका घेऊन बसलेल्या बंडय़ावर काकू कडाडल्या. ‘इतकी वर्ष अभाविपत राबराब राबलास. त्यांचा परीक्षेचा आग्रह बघून अचानक तू युवासेनेत गेलास. आणि हा दलबदलूपणा कशासाठी केला तर परीक्षा रद्दच्या कळपात राहणे केव्हाही सोयीचे म्हणून. हा स्वार्थीपणा कशासाठी तर परीक्षा द्यायचा कंटाळा आला म्हणून. टाळेबंदीच्या काळात गावभर उनाडक्या करायला तुझ्याजवळ वेळ आहे. संघटनेच्या आंदोलनात घोषणा देण्यासाठी सवड आहे.  फक्त परीक्षाच नको. वा रे वा! आता भोग कर्माची फळं. बसला तुझ्यावर कोविडचा शिक्का. आता नोकरीच्या बाजारात तुझी किंमत शून्य. अरे, रक्ताचे पाणी करून, घाम आटवून तुला शिकवले. आईवडिलांचा काही तरी विचार करायचा ना!’ ‘पण, ते मंत्री..’ बंडय़ाला मध्येच थांबवत काकू पुन्हा सुरू झाल्या. ‘नाव नको घेऊ त्यांचे. कोणत्याच अँगलने ते मंत्री वाटत नाहीत. तसेही या सेनेवाल्यांना शिक्षणातले काही कळते यावर माझा विश्वास नाही. हे सरकार नेमके चालवते तरी कोण हेच कळायला मार्ग नाही. परीक्षा हवी, नको यातच सारे अडकलेले. परीक्षा म्हणजे तीन पत्त्यांचा खेळ वाटला की काय यांना!  यांना झेंडेकरी हवेत की पदवीधारक, असाच प्रश्न राहून राहून मला सतावतोय. आणि तो गुणपत्रिकेवर कोविडचा उल्लेख करणारा कोण आहे सटवीचा? मधल्या काळात नक्कीच त्याला क्वारंटाइन तरी व्हावे लागले असणार. मी भोगले तर इतरांनी का नाही अशाच मनोवृत्तीचा माणूस असेल तो..’ काकूंच्या तोंडाचा पट्टा थांबेचना ‘अगं आई, ते कोण हे ठाऊक नसताना कशाला त्यांना शिव्या मोजतेस? झाली चूक, आता दुरुस्त करणार आहेत!’ बंडय़ा करवदताच काकूंचा पारा पुन्हा चढला. ‘तू मध्येमध्ये बोलूच नको. तुझे बाबा बघ, बोलताहेत का मध्ये.’ हे ऐकताच पेपर वाचत असलेल्या तात्यांनी त्यात आणखी डोके खुपसून घेतले. मग काकूंचा मोर्चा पुन्हा बंडय़ाकडे वळला. ‘परवा त्या नलूच्या मुलीच्या लग्नात गेलेले. तिथे दोनशे लोक होते. बाजारात तर प्रचंड गर्दी दिसली. चौकात तर टोळक्यांचा गराडा कायम असतो. तरीही परीक्षाच नको असा धोशा लावलाय यांनी. एकदा का हे जिंकले की कोविडचा शिक्का ठरलेला तुमच्या कपाळावर. अरे ब्रिटिश काळात कसे मागासांवर गुन्हेगारीचे शिक्के मारले जायचे? तसेच हे! त्यातून हे सरकारी बाबू अजून बाहेर आलेच नाहीत. आधीच्या गुणांची सरासरी काढताना रेकॉर्डवर नोंद म्हणून तरी ते कोविडचा उल्लेख ठेवतीलच. तुझ्या लक्षात येईल तेव्हा उशीर झालेला असेल. ते काही नाही, तू परीक्षा झालीच पाहिजे या बाजूने उभा राहा. करोना काय आज आहे, उद्या नाही. पुढच्या आयुष्याचा विचार करणार की नाही?’ ‘मग काय पुन्हा अभाविपमध्ये जाऊ? ’ बंडय़ाने हे वाक्य उच्चारताच काकू उद्गारल्या, ‘काहीही कर.. पण माझ्या घरात कोविडची गुणपत्रिका नको. गेले चार महिने काळजी घेत करोनापासून दूर राहिलो. आता पदरात पडणारी गुणपत्रिकासुद्धा विनाकरोनाची हवी.’ आता यावर वाद घालण्यात अर्थ नाही हे बघून बंडय़ा उठला. त्याने घराचे दार उघडले तर फाटकात युवासैनिक उभेच.. गुलाल घेऊन, शिक्का पुसल्याचा जल्लोष करायला!