दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने कसे गेले कळलेच नाही, या विचारात रावसाहेबांनी समोरच्या कॅलेंडरवर नजर टाकली. मोठा सुस्कारा सोडला. त्यांच्या अशा उभे राहण्याने सौ. रावसाहेब कमालीच्या अस्वस्थ झाल्या. डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात रावसाहेब जरा जास्तच खुशीत असतात. ‘यूटय़ूब’वर गाणी काय लावतात, मध्येच गुणगुणतात काय. आताही त्यांनी गाण्याचा आवाज वाढविला- ‘आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हनत्यात ते दावशील का?’ या संगीताच्या साथीने ३१ डिसेंबरच्या तारखेवर रावसाहेबांची नजर खिळली होती. तेव्हा रावसाहेबांची आई म्हणाली, ‘भलताच खुशीत दिसतोय रे, काय झालं काय?’ तसं रावसाहेबांची नजर कावरीबावरी झाली. ‘कुठं काय’, म्हणत जरा बाजूला झाले. भाजीला फोडणी देणाऱ्या सौ. रावसाहेबांनी ती कावरीबावरी नजर बरोबर पकडली. ‘दरवर्षीप्रमाणं डोळे तारवटून येऊ नका’, असं त्या म्हणणारच एवढय़ात तपकिरी फुल्ल पँट, पांढरा हाफ शर्ट, डोक्यावर काळी टोपी, पॉलिश केलेलेच बूट घातलेले वामनराव नेहमीप्रमाणे सकाळी आले. रावसाहेबांनी घरात आलेल्या वामनरावांना नवीन वर्षांच्या ‘अॅडव्हान्स’मध्ये शुभेच्छा दिल्या. ‘हॅपी न्यू इअर’, म्हणतानाच वामनरावांनी तत्क्षणी स्पष्ट केलं, ‘हे काही आपलं वर्ष नाही. आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा! फारच इच्छा असेल तर देवाच्या पाया पडावं. वर्षभर केलेल्या पापातून किमान मुक्ती दे म्हणावं.’ वामनरावांचा सल्ला सौ. रावसाहेब आणि त्यांच्या आईला आवडला. अलीकडे भल्या पहाटेच राजकारण पालटलेलं असतं, असा विश्वास असणारे वामनराव खडय़ा आवाजात म्हणाले, ‘टीव्ही लावा रावसाहेब, बघा खातेवाटप होतंय का?’ रिमोटचं बटण दाबलं गेलं. बातमी सांगणारी म्हणत होती- ‘नवीन वर्षांनिमित्त शिर्डीचं साई मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं ठेवलं जाणार..’ वामनरावांचा सल्ला आणि ही बातमी याचा सौ. रावसाहेब आणि त्यांच्या आईवर जबरदस्त परिणाम झाला. नेमकं ३१ डिसेंबरच्या रात्री देवळात जायचं या विचारांनी रावसाहेबांचा चेहरा बदलू लागला. तिकडे सौ. रावसाहेब खूश झाल्या. या वेळी देवदर्शनाचं जमून येईल असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी सासूबाईंना गळ घातली, ‘जाऊ साईदर्शनाला’. रावसाहेबांचा नाइलाज झाला. बातम्यांमध्ये खातेवाटप झाले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वामनराव फक्कड चहा पिऊन निघाले. इकडे शिर्डीस जाऊन साईदर्शनाचा बेत ठरला. चरफडत त्यांनी वामनरावांना मनातल्या मनात शिव्या दिल्या. एव्हाना रावसाहेबांच्या मित्रांचे त्यांना रात्रीच्या ‘कार्यक्रमा’बद्दल फोन सुरू झाले. त्यांच्या जिवाची घालमेल सुरू होती. तेवढय़ात वामनराव म्हणाले, ‘अहो, तुम्ही जाऊन या दर्शनाला; मग करू आपण ३१ डिसेंबर नवीन वर्षांत, मीसुद्धा येतो.’ आता रावसाहेब खूश झाले. ऐन ३१ डिसेंबरच्या रात्री रांगेत उभे राहू, असा निर्धार त्यांनी केला. तरीही, रात्री मंदिर चालू ठेवणाऱ्यांपासून ते शेजारच्या वामनरावांवर मनोमन चिडलेलेच होते. नामस्मरणाच्या त्या प्रयोगानंतर वर्षांचा पहिला दिवस त्यांनी कसाबसा ढकलला. तेव्हाही ते तेच गाणे गुणगुणत होते- ‘आता तरी देवा मला पावशील का?’
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2020 रोजी प्रकाशित
आता तरी देवा मला पावशील का?
‘नवीन वर्षांनिमित्त शिर्डीचं साई मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं ठेवलं जाणार..
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-01-2020 at 02:12 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahalaxmi temple of kolhapur shirdi sai temple happy new year zws