झाले ते फार वाईट घडलेले आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ते करावयास नको होते. काय अधिकार होता त्यांना हा अधिकार काढून घेण्याचा? म्हणे, कोणालाही इतरांची देशभक्ती जोखण्याचा अधिकार नाही. जो स्वत:ला देशाचा कर्ताधर्ता समजतो, त्यालासुद्धा (म्हणजे मोदींनाच ना?) हा अधिकार नाही, असे भागवतजी म्हणाले. याला काय अर्थ आहे? म्हणजे उद्या सिनेमागृहात राष्ट्रगीत सुरू असताना एखादा नाही उभा राहिला, तर त्याचे पाय मोडायचे नाहीत? एखाद्याने सरकारवर टीका केली, तर त्याला पाकिस्तानला पाठवायचे नाही? हे फारच वाईट केले भागवतजींनी. अशाने देश कसा प्रगतिपथावर जाणार? आणि आता आमचे केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर म्हणतात, की राष्ट्रवादामध्ये विदेशी नागरिकांविषयीच्या भयगंडास स्थानच नाही. म्हणजे आजवरचे सारेच मुसळ केरात गेले म्हणायचे! सच्चे देशभक्त अन्यांची देशभक्ती जोखू शकणार नाहीत आणि आता काय त्यांनी विदेशी नागरिकांविषयी प्रीतिगंड बाळगून राष्ट्रवादी बनायचे? अकबरांच्या मते, अलीकडे या उदारमतवाद्यांना राष्ट्रवादापेक्षा बहुविधतेतील एकता अधिक महत्त्वाची वाटते. हे लोक राष्ट्रवादाची तुलना विदेशी नागरिकांविषयीच्या भयगंडाशी करतात. वस्तुत: राष्ट्रवादी लोक हे काही असा कुठला गंड वगैरे बाळगत नसतात. त्यांना एकच गंड असतो तो म्हणजे देश. आता जे विदेशी देश आपले राष्ट्रगीत म्हणत नाहीत, आपला राष्ट्रध्वज फडकावीत नाहीत, त्यांच्या मनात राष्ट्रवाद्यांना कुठून प्रेम येणार? म्हणून ते त्यांचा राग करतात. हे इतके साधे तत्त्वज्ञान असताना, अकबरांसारखी आपलीच माणसे उगाच गोंधळ उडवून देत आहेत. त्यांच्यापेक्षा आपले केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू बरे. त्यांनी सरळ सरळ सांगितले, की भारतात हिंदूंची लोकसंख्या कमी होत चालली आहे, कारण हिंदूू कोणाचे धर्मातर करीत नाहीत. अर्थ सोपा आहे. बाकीचे धर्मातर करतात म्हणून त्यांची संख्या वाढते. लोकांना आपले उगाच वाटते, की बाकीच्यांचा प्रसवदर जादा आहे म्हणून असे घडते. रिजीजूंनी सारे कसे स्पष्ट केले, की जनगणनेचा अहवाल काहीही सांगो, हिंदूू कमी होत आहेत ही आपली श्रद्धा आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तमाम राष्ट्रवादय़ांची श्रद्धा आहे. असे सारे असताना अकबरांनी हा कुठल्याशा तत्त्वज्ञानाचा आईना समोर ठेवून काय बरे साधले असावे? त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादामध्ये जर विदेशी नागरिकांविषयीच्या भयगंडास स्थान नसेल, तर देशोदेशीच्या राष्ट्रवादी नागरिकांनी कोणत्या बळावर राष्ट्रवादी बनायचे? भयगंडाशिवायचा राष्ट्रवादच बाळगायचा असेल, तर मग तमाम राष्ट्रवाद्यांनी पवनारच्या आश्रमात जाऊन जय जगत करीत बसलेले काय वाईट? भागवतजी काय किंवा अकबर काय, त्यांनी हे असे सर्कशी आरसे समोर ठेवून आपल्याच लोकांचा गोंधळ उडवून देणे बरे नाही. अशाने उद्या आपलाच खरा चेहरा ओळखू आला नाही म्हणजे?
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2017 रोजी प्रकाशित
आईना-ए-अकबरी
अकबरांच्या मते, अलीकडे या उदारमतवाद्यांना राष्ट्रवादापेक्षा बहुविधतेतील एकता अधिक महत्त्वाची वाटते
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 15-02-2017 at 01:16 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mj akbar mohan bhagwat bjp