श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी नावाचे एक खगोल भौतिकशास्त्रज्ञ कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत काम करतात. त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीची ओळख सर्वाना असेल असेही नाही; पण अलीकडेच पंतप्रधानांनी ‘ब्रेन-गेन’सदृश योजनेत ज्या वैज्ञानिकांना तीन वर्षांत भारतामध्ये येऊन कुठलेही संशोधन बारा महिने करण्यासाठी ‘जवाहरलाल नेहरू फेलोशिप’ दिली आहे, त्यांत श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव आहे.
कुलकर्णी यांचा जन्म १९५६ मध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड या छोटय़ा गावचा, त्यांचे शिक्षण कर्नाटकात हुबळी येथे झाले. विशेष म्हणजे, ज्येष्ठ समाजसेविका व इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या त्यांच्या भगिनी आहेत. नंतर दिल्लीच्या आयआयटीतून ते १९७८ मध्ये भौतिकशास्त्र विषयात एमएस झाले. १९९० मध्ये एका उन्हाळी वर्गात बंगळुरू येथे खगोलशास्त्र हा विषय होता तेव्हा त्या विषयाशी ओळख होऊन त्यांची गट्टी जमली, ती कायमची. पुढे ते कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक झाले. २००१ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले. भारतात अगदी मोजके दहा ते अकरा भारतीय वैज्ञानिक या संस्थेचे फेलो आहेत यावरून त्यांची महती लक्षात यावी. २००३ मध्ये ते नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. सध्या कुलकर्णी हे कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘स्पेस इन्फरनोमेट्री मिशन’चे सदस्य असून पालोमार व केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेत. त्यांना यापूर्वी इन्फोसिसचा पुरस्कार २०१३ मध्ये मिळाला होता. एनएसएफचा अलन टी वॉटरमन पुरस्कार १९९२ मध्ये, तर अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा हेलेन वॉर्नर पुरस्कार १९९१ मध्ये त्यांना मिळाला होता. रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवात केली, नंतर रेणवीय ढगांचा अभ्यास केला तसेच चार भुजांच्या दीíघकेचा शोध लावला.  ‘मिलीसेकंड पल्सार’ या स्पंदक ताऱ्याचा शोध लावणाऱ्या गटातही ते होते. द्वैती स्पंदक ताऱ्यांचे प्रकाशीय समघटक त्यांनी शोधले. ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधातही त्यांनी मोठे काम केले. सौम्य गॅमा रे रिपीटर्स हे नवताऱ्याचे अवशेष असतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर १९९७ मध्ये त्यांनी बाह्य़ तारकीय स्रोतांमधील गॅमा किरणांचे स्फोट शोधले. ग्लीस २२९ या तपकिरी बटू ताऱ्याचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांच्या पथकात ते होते. पॅलोमार ट्रान्झियंट फॅक्टरी या नवीन अवकाशीय पदार्थ शोधणाऱ्या प्रकल्पातही ते आहेत. ते वैज्ञानिक असले तरी त्यांना सालसा, कव्वाली, लॅटिन जॅझ आवडतात, शिवाय मालीचे संगीतही आवडते. आपल्या सहकाऱ्यांमध्ये ते ‘श्री’ या नावाने ओळखले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh shrinvias kulkarini