राज कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्मभूमी, मातृभूमी या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन जीवितकार्य केलेल्या, जन्माने अभारतीय, पण मनाने भारतीय असलेल्या काही व्यक्तींचे स्मरण राष्ट्रवादी भावना टोकदार होत जातानाच्या काळात करणे ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या अधिक जवळ जाणारे आहे..

भारतीय राज्यघटनेत माणसामाणसांत भेदभाव नको, हे सांगताना अनुच्छेद १५ मध्ये धर्म, वंश, जात, लिंग याबरोबरच जन्मस्थानाचा उल्लेखही आहे. हा उल्लेख भारतीय प्रजासत्ताकाच्या विश्वव्यापी मानवतावादी दृष्टिकोनाचा आविष्कार आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जन्मस्थळाबाबत संकुचित विचार करणं, त्यावरून एखाद्या व्यक्तीला कमी लेखणं, तो मुद्दा राजकीय अजेंडा करणं हे राज्यघटनेच्या विरोधी ठरतं. 

मुळात व्यक्तीचं लहानमोठंपण तिच्या कर्तृत्वावर ठरत असतं. प्राचीन काळात दक्षिण भारतात जन्मलेले बोधीवर्मन यांनी चीनमध्ये जाऊन तिथल्या बुद्धधर्मास मार्गदर्शन केले. भारतात जन्मलेल्या राहुल सांस्कृतायन या महापंडिताने नेपाळ, चीन, तिबेट, श्रीलंका, इराण आणि रशियात कार्य केले तर धर्मानंद कोसांबी या भारतीय सुपुत्राने युरोपात प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसाराचे कार्य केले. पोरबंदर इथं जन्मलेल्या महात्मा गांधींनी नागरी हक्काच्या लढय़ाची सुरुवात दक्षिण अफ्रिकेतून केली. सोलापूरच्या डॉ. द्वारकादास कोटणीस यांनी आपले महान कार्य चीनमध्ये करत तिथेच अखेरचा श्वास घेतला. भारतात जन्मलेल्या व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या बाळाजी हुद्दार यांनी स्पेनमध्ये जाऊन जॉन स्मिथ या नावाने जनरल फ्रँकोच्या फॅसिस्ट सत्तेच्या विरोधात लोककल्याणकारी कार्य केले. हुद्दार यांचे हे कार्य संघाला पटले नाही. त्यांनी पुढे भारतात कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारताबाहेर जन्मलेल्या अनेक नेत्यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान दिलं. 

अ‍ॅलन ऑक्टोव्हियन ह्यूम यांचा जन्म लंडनच्या दक्षिणपूर्व भागात १८२९ साली झाला होता. भारतीय जनतेला ब्रिटिश प्रशासनात प्रतिनिधित्व असावे यासाठी त्यांच्याच पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्कॉटलंडमध्ये १७७९ साली जन्मलेले माऊंटस्टुअर्ट एलिफिन्स्टन  १८१९ ते १८२७ या काळात मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी भारतात शिक्षण संस्थांच्या निर्मितीची पायाभरणी केली. जॉर्ज युली या स्कॉटिश व्यापाऱ्याचा जन्म १८२९ साली लंडन इथं झाला. भारतात येऊन त्यांनी भारतीयांच्या नागरी हक्क चळवळीस समर्थन दिले. सन १८८८ साली झालेल्या काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अल्फ्रेड वेब हे जन्माने आयरिश. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १८९४ सालच्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते.  आयझ्ॉक बट आयरिश संसदसदस्यांनी आर्यलडच्या ‘होम गव्हर्नमेंट असोसिएशन’च्या धर्तीवर भारतात होमरूल लीगची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.

आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अ‍ॅनी बेझंट! १ ऑक्टोबर १८४७ साली लंडनमध्ये  जन्मलेल्या अ‍ॅनी बेझंट यांनी १९१६ साली भारतात लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने होमरूल लीगची स्थापना केली. त्यांनी काँग्रेसचेही कार्य केले, लोकमान्य टिळकांनी बेझंट यांनी भारतीयांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. जवाहरलाल नेहरूंच्या सामाजिक नि राजकीय कार्याची सुरुवात होमरूल लीगमधूनच झाली. अ‍ॅनी बेझंट यांनी भारतात थिऑसिफिकल सोसायटीची स्थापना केली. बनारस इथं सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली, पं. मदन मोहन मालवीय यांच्या सहकार्याने याच कॉलेजचे रूपांतर १९१७ साली बनारस हिंदू विद्यापीठात झाले.

भगिनी निवेदिता म्हणजे मूळच्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल.  यांचा जन्म उत्तर आर्यलडमध्ये २८ ऑक्टोबर १८६७ साली झाला. त्या स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या. त्यांनी रामकृष्ण शारदा मिशनची स्थापना केली. बंगाल प्रांतात भारतीयांच्या सामाजिक व राजकीय हक्कासाठी त्या लढल्या. 

अमेरिकेत फिलाडेल्फिया इथं १६ ऑगस्ट १८८२ साली जन्मलेले सॅम्युअल स्टोक्स १९२२ साली वडिलांचा विरोध पत्करून भारतात आले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी सिमला इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी पंजाब, हरयाणा नि हिमाचल प्रदेशात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली कार्य केले. हिंदू धर्म स्वीकारून पुढे त्यांनी सत्यानंद हे नाव स्वीकारले.  काँग्रेस नेत्या विद्या स्टोक्स त्यांच्याच वंशज आहेत.

विल्यम वेडरबर्न, यांचा जन्म इडिनबरा इथं २५ मार्च १८३८ साली झाला होता. ते लिबरल पार्टीचे सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी मोठी भूमिका बजावली. ते मुंबईच्या न्यायालयात न्यायाधीश होते. लॉर्ड रिपन यांनी भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आणि भारतातील सामाजिक सुधारणांना उत्तेजन दिले. सन १९१० साली काँग्रेसमध्ये हिंदू मुस्लीम जमातवाद्यांचा संघर्ष सुरू झाला, तेव्हा हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी त्यांनी स्वत: प्रयत्न केले.

 मेडीलीन स्लेड म्हणजे मीराबेन.  यांचा जन्म १८९२ साली इंग्लंडमध्ये झाला होता. महात्मा गांधींचे शिष्यत्व स्वीकारून त्या १९२० साली भारतात आल्या. भारतीय स्वातंत्र्यलढय़ास समर्थन देण्यासाठी त्यांनी आपली जन्मभूमी सोडली होती.  त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेतला. महात्मा गांधींसोबत त्या गोलमेज परिषदेतही भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या. सेवाग्राम आश्रमाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. गांधीजींची गोलमेज परिषद, सिमला करार, कॅबिनेट मिशन, संविधान सभा, भारताची फाळणी आणि गांधीजींची हत्या, या प्रत्येक प्रसंगात मीराबेन महात्मा गांधीजींबरोबर होत्या. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींबरोबर  कारावासही भोगला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना १९८१ साली पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.

नलिनी सेनगुप्ता म्हणजे एडिथ अ‍ॅलन ग्रे! यांचा जन्म १२ जानेवारी १८८४ रोजी  केम्ब्रिज इथं झाला. तिथेच शिकत असताना त्या जितद्र मोहन सेनगुप्ता यांच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी लग्न केले. जितद्र यांनी कोलकात्यात वकिली सुरू केली आणि काँग्रेसच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. एडिथ यांनी नलिनी हे नाव स्वीकारले आणि त्यांनी पूर्णवेळ काँग्रेसचे कार्य सुरू केले. असहकार आंदोलनात नलिनी यांनी अतुलनीय योगदान दिले. कारावासाची सजा भोगली. मिठाच्या सत्याग्रहात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बंदिवान केले गेले. काँग्रेसच्या १९३३च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष पं. मालवीय होते, पण त्यांना अटक झाल्यावर नलिनी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्या वेळी नेहरू, पटेल, मालवीय, प्रसाद, बोस सर्वच नेते कारावासात असताना युरोपात जन्मलेल्या आणि भारतीयांसाठी काम करणाऱ्या या महान विदुषीने भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व केले!

भारतीय अदिवासी समाजासाठी अतुलनीय योगदान देणारे वेरीयर एल्विन हे जन्माने ब्रिटिश होते. त्यांचा जन्म १९०२ साली इग्लंडमध्ये झाला होता. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले, नेहरूंनी त्यांची नियुक्ती पूर्वोत्तर राज्यातील जमातींचे मुख्य सल्लागार म्हणून केली होती. त्यांनी गांधीजींच्या प्रभावातून १९३५ साली हिंदूू धर्म स्वीकारला आणि गोंड समाजाच्या विकासासाठी पूर्ण आयुष्य वाहिले. त्यांना १९६१ साली पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. तेथील वेगवेगळय़ा जमातींच्या आयुष्यावर लिहिलेल्या त्यांच्या अनेक ग्रंथांना साहित्य अकादमी सन्मानही मिळाला आहे. 

रशियात जन्मलेल्या हेलिना ब्लाव्हास्त्सकी. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या कँथरीन मेरी हेलीमन (सरलाबेन) आणि इंग्लंड जन्मभूमी असलेले चार्ल्स फियर अँड्रज म्हणजेच दिनबंधू हे गांधीवादी. त्यांच्याबरोबरच नेताजी बोस यांना आयएनएच्या स्थापनेत मदत करणारे जन्माने जपानी असणारे इव्हांची फुजीवारा आणि मॅडम कामा या भारतीय पारशी महिलेस सहकार्य करणारे जन्माने फ्रेंच असणारे जॉन लोंग्ये यांचाही सन्मान भारतीयांनी करायला हवा! 

निसर्ग संवर्धक जीम कॉर्बेट, लेखक रस्कीन बाँड यांचा जन्म भारतातला. बाँड यांचे वडील भारतीय वायुदलात नोकरीवर होते. भारत सरकारने रस्कीन बाँड यांना १९९९ साली पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे नुकत्यात ऑगस्ट महिन्यात निवर्तलेल्या गेल ऑमवेट.  त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४१ रोजी अमेरिकेत झाला होता.  भारतीय ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण, दलितांचे हक्क, जातीव्यवस्थेच्या विरोधातील लढा, पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. याच यादीत सोनिया गांधींचाही समावेश करता येईल. इटलीत जन्मलेल्या सोनिया राजीव गांधींशी लग्न करून  भारतात आल्या. त्यांनी काँग्रेस पक्षाला पडत्या काळात सावरलं. गोरगरीब भारतीयांच्या हिताचे कायदे करण्यात पुढाकार घेतला. त्या सर्वार्थाने भारतीयत्वच जगल्या.  स्वत:चे जन्मस्थळ काय असावे हे  कोणाही सजीव प्राण्याच्या हाती नाही, पण कार्यकर्तृत्व प्रत्येकाच्या हाती आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nationalism of annie besant sister nivedita charles andrew zws
First published on: 26-01-2022 at 01:41 IST