निधनवार्ता कोनेरु रामकृष्ण राव यांच्याबद्दलच,  त्यांत ‘पद्मश्री’ वगैरे तपशील सारखेच; पण काही बातम्यांत ‘मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक’ असा त्यांचा उल्लेख, तर अन्य बातम्यांत ‘तत्त्वज्ञानाचे अभ्यासक’ असा उल्लेख- मग ‘केआरआर’ म्हणून ओळखले जाणारे हे प्रा. डॉ. राव यांचा अभ्यासविषय नेमका कोणता?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दोन्हीच्या मधला!’ हे या प्रश्नाचे नेमके उत्तर. परामानसशास्त्राचा गांभीर्याने, विद्यापीठीय शिस्तीने अभ्यास करणाऱ्यांपैकी ते एक; त्यासाठी त्यांनी विविध संस्कृतींमधील मनोविषयक तत्त्वज्ञानाचे परिशीलन केले. सन १९५०-५५ दरम्यान, भारतीयतेचा शोध सर्वच अंगांनी घेतला जात असताना हा विषय  रामकृष्ण राव यांनी निवडला होता. बीए- तत्त्वज्ञान आणि एमए- मानसशास्त्र या  पदव्या त्यांनी जेथून मिळवल्या, त्या आंध्र विद्यापीठात शिकवण्याचे काम करीत असतानाच १९५८ मध्ये  फुलब्राइट शिष्यवृत्तीवर ते अमेरिकेस गेले. शिकागो विद्यापीठात रिचर्ड मॅक्यून, तर डय़ूक विद्यापीठात जे. बी. ऱ्हाइन यांच्या मार्गदर्शनाखाली  त्यांनी आपली संशोधन-दिशा अधिक पक्की केली. गांधीजींनी भारतीय मानसाची नस ओळखली ती कशी, याविषयी लिहिताना बहुतेकदा परिणामच (‘आवाहनाला हजारोंचा प्रतिसाद’ वगैरे) वर्णिले जातात; पण सैद्धान्तिक चर्चा होत नाही, हे न्यून राव यांच्या  ‘गांधी अ‍ॅण्ड प्रॅग्मॅटिझम’ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९६८) या पुस्तकाने दूर केले! अर्थात, १९५७  सालच्या ‘सायकॉलॉजी ऑफ कॉग्निशन’ पासून राव पुस्तके लिहीत होतेच. सन २०२० मधील ‘डेस्टिनीज चाइल्ड’ आणि २०१७ मधील ‘गांधीज् धर्म’ यांसह एकंदर २० पुस्तके  आणि शोधपत्रिकांमधील ३०० निबंध त्यांच्या नावावर आहेत. आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तसेच तत्कालीन (अखंड) आंध्र प्रदेश सरकारच्या उच्चशिक्षण सल्लागार मंडळावर, पुढे राज्य उच्चशिक्षण परिषदेचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. पीएच.डी.खेरीज नागार्जुन विद्यापीठ, काकतीय विद्यापीठ यांच्या ‘डी.लिट’ उपाध्याही त्यांना मिळाल्या, तसेच २०११ मध्ये ‘पद्मश्री’चे ते मानकरी ठरले. अमेरिकेतील टेनेसी, कॅलिफोर्निया, नॉर्थ कॅरोलायना आदी विद्यापीठांत तसेच थायलंड ते जर्मनी अशा अनेक देशांत त्यांनी व्याख्याने दिली. १९८० मध्ये ‘गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ (गितम) ही अभिमत विद्यापीठ दर्जाची संस्था स्थापण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. या संस्थेचे ते अध्यक्षही होते. भारतीय उपयोजित मानसशास्त्र अभ्यास-संघटनेचे प्रमुखपद त्यांनी काही काळ भूषवले होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian philosopher koneru ramakrishna rao profile zws