अथांग, अगाध विश्वाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी गेल्या अनेक वर्षांत केला आहे. त्यापैकी एक म्हणजे मासातोशी कोशिबा. विश्वात न्यूट्रिनो कणांचे अस्तित्व सांगणाऱ्या कोशिबांचे वयाच्या ९४ व्या वर्षी अलीकडे निधन झाले. २००२ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना विभागून देण्यात आले तेव्हा आणि नंतरही, टोकियो विद्यापीठात ते प्राध्यापक होते.

न्यूट्रिनो कणांचा अभ्यास त्यांनी कशासाठी केला असेल हा प्रश्न पडण्यासारखा आहे. सूर्यावर ज्या घडामोडी होत असतात त्यांचा वेध आपल्याला अप्रत्यक्षपणे न्यूट्रिनो कणांच्या मदतीने घेता येतो. सूर्याच्या केंद्रस्थानी या कणांची निर्मिती होते, त्यामुळे सूर्य प्रकाशमान दिसतो. हे सगळे कुतूहलापोटी त्यांनी शोधून काढले. पेनसिल्वेनिया विद्यापीठाचे दिवंगत वैज्ञानिक रेमंड डेव्हिस ज्युनियर यांच्यासमवेत कोशिबा यांना नोबेल मिळाले होते. या दोघांना प्रेरणा मिळाली ती क्ष किरण दुर्बिणीतून विश्वाच्या प्रतिमा घेऊन न्यूट्रिनो कणांचे अस्तित्व वर्तवणारे दिवंगत इटालियन वैज्ञानिक रिकाडरे यांच्याकडून. न्यूट्रिनो शोधण्यासाठी जी शोधक उपकरणे लागतात त्यावर कोशिबा यांनी मोठे काम केले. मध्य जपानच्या डोंगराळ भागात त्यांचे ‘कॅमीओकांडे न्यूट्रिनो शोधक यंत्र’ बसवण्यात आले. जमिनीत १००० मीटर खोलीवर जस्त व शिशाच्या खाणीत त्यांनी ही न्यूट्रिनो शोधक प्रयोगशाळा उभारण्यात मोठा हातभार लावला. या प्रयोगशाळेद्वारे कोशिबा यांनी न्यूट्रिनो कणांचा शोध घेऊन, डेव्हिस यांचे काम पुढे नेले. अतिनवताऱ्यांच्या स्फोटातून न्यूट्रिनो बाहेर पडतात. विश्वातील सर्वात प्रकाशमान वस्तूंपैकी एक म्हणजे अतिनवतारे.

कोशिबा यांच्या या शोधातून पुढे अनेक कोडी उलगडली. त्यात त्यांचे शिष्य ताकाआकी काजिता यांना २०१५ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले. न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते हा शोध त्यांनी कोशिबांच्याच वेधशाळेचा वापर करून लावला होता. कोशिबा हे उत्तम प्राध्यापक होते. त्यांनी तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी ‘सायन्स फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी नोबेल पुरस्कारातून मिळालेला पैसा या संस्थेसाठी खर्च केला. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला.

कोशिबा हे मध्य जपानमधील तोयोहाशीचे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण टोकियो विद्यापीठात झाले व नंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन अभ्यास केला. अमेरिकेतून ते १९५८ मध्ये जपानला परत आले व देशासाठी विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली. कोशिबा यांच्या निधनाने आशियातील एक महत्त्वाचा वैज्ञानिक आपण गमावला आहे.