राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजवरच्या सहाही सरसंघचालकांबरोबर काम करणारे, संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या अनुशासनबद्ध संस्कारांत घडलेले मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य हे संघाच्या चौकटीत वावरूनही सामाजिक व्यवहारात उदारमतवादी राहिले. त्यांना हे कसे साधते, असा प्रश्न संघातील त्यांच्या निकटवर्तीयांना व संघाबाहेरच्या मंडळींनाही कायम पडत असे. संघाचे प्रवक्ते असतानाही त्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात काही तरी वेगळे करून दाखवण्याची धडाडी दिसली, तर कधी देशहितास्तव काँग्रेससारख्या विरोधी पक्षाचे अस्तित्व टिकलेच पाहिजे अशी भूमिकाही ते उघडपणे मांडत राहिले. संघविचाराधिष्ठित एका दैनिकाचे संपादकपद सांभाळत असतानाच संघविरोधासाठी ओळखल्या जाणाऱ्या लेखक-विचारवंतांचेही लेख त्यात प्रसिद्ध करण्याचे ‘कालातीत औदार्य’ वैद्य यांनी दाखवले. इतकेच नव्हे, तर गावकुसाबाहेरील वस्त्यांच्या व्यथा-वेदना मांडणाऱ्या तरुण लिहित्या हातांना निमंत्रणे धाडून आपल्या छत्रछायेत त्यांना पत्रकार म्हणून घडवले. मुस्लिमांच्या पुरोगामी वैचारिक स्थित्यंतराचे स्वागत करण्यास ते कचरले नाहीत. हिंदुत्व म्हणजे केवळ एका जातीची मक्तेदारी नाही, जीवन कसे जगावे हे शिकविणारी आचारसंहिता म्हणजे हिंदुत्व होय आणि माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला ती स्वीकारण्याची मोकळीक असली पाहिजे, असा पालकत्वाचा सल्ला संघाला देतानाही ते कधी विचलित झाले नाहीत. वैचारिक संघर्ष असू शकतो, पण वैयक्तिक कटुतेला कुणाच्याही जीवनात स्थान असू नये, असा त्यांचा आग्रह होता.

नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात मा. गो. वैद्य यांनी अध्यापन केले. १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ  नये, असा सरकारी आदेश आला. तो वैद्य यांनी निडरपणे नाकारला. आपल्या अंगी जे जे काही चांगले आणि समाजहिताचे आहे ते समाजाच्या कामी यावे, ही त्यांची धारणा होती आणि त्याच धारणेने त्यांनी ‘आपली संस्कृती’, ‘चांदणे प्रतिभेचे’, ‘ठेवणीतले संचित’, ‘मेरा भारत महान’ आदी पुस्तकांचे लेखन केले. ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी सभागृह गाजवले.

वयाच्या नव्वदीतही त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी फारच सकारात्मक होती. वैद्य यांचे चाहते त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाची विशेष तयारी करीत होते, परंतु ही तयारी मूर्त रूपात पोहोचण्याआधीच वयाच्या ९७व्या वर्षी ते निरोप घेते झाले.