भारतीय नृत्यकलेतील एक खानदान मृणालिनी साराभाई यांनी सुरू केले होते. मृत्यूने त्यांना शंभरी गाठण्यापूर्वीच ओढून नेले, पण त्यांचे नृत्यखानदान लोपलेले नाही. हे खानदान म्हणजे त्यांच्या कन्या मल्लिका वा नातू रेवंत या दोघा नर्तकांपुरते मर्यादित नसून अनेक शिष्यांचेही आहे आणि शिष्य नसूनही अनेकांना, अभिजात नृत्यातून समकालीन प्रश्नांशी संबंधित विषय मांडण्याची प्रेरणा देणारेही आहे. भरतनाटय़म्ला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्र’ने जे चेन्नईतून केले होते; तर दाक्षिणात्य अभिजात नृत्यप्रकारांना वर्तमानाचे भान देण्याचे मोठे काम मृणालिनीअम्मांनी केले. पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९९२) आणि संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९९४) हे देशी व अनेक विदेशी सन्मान मग आपणहूनच आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतराळशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी म्हणून त्या १९४२ अहमदाबादेत आल्या. हे घराणे कापड उद्योगात स्थिरावलेले आणि गांधीजींच्या चळवळीत रस घेणारे; तर केरळमधील मूळच्या मृणालिनी स्वामिनाथन यांचे वडील बॅरिस्टर, आई स्वातंत्र्यसैनिक आणि सख्खी बहीण कॅप्टन लक्ष्मी सहगल! आझाद हिंद फौजेतील ‘कॅप्टन लक्ष्मीं’प्रमाणे धाकटय़ा मृणालिनी रणरागिणी नव्हत्या, पण नृत्यातून मानवमुक्तीची लढाई त्या अखेपर्यंत लढल्या. नृत्यनाटय़े भारतात आधीही केली जात, आनंदशंकर तर त्यासाठी प्रसिद्धच होते. मात्र पौराणिक वा भावुक कथांवर आधारित नृत्यनाटय़ांना सामाजिक जाणीव दिली ती मृणालिनी यांनी. मीनाक्षी सुंदरम पिल्लै यांच्याकडून भरतनाटय़म्, ताकाळी कुंचु कुरुप यांच्याकडून कथकली आणि कल्याणीकुट्टी अम्मन यांच्याकडून मोहिनीअट्टम शिकल्यावर त्या (गुरुदेव असताना) शांतिनिकेतनात शिकल्या आणि त्याहीआधी, वयाच्या १२-१३ व्या वर्षी स्वित्र्झलडमध्ये बॅलेचेही धडे गिरवले. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या नृत्यनाटय़ांत दिसतो.

विक्रम आणि मृणालिनी साराभाई यांचा प्रेमविवाह हा ‘शास्त्र व कलेचा संसार’ होता. विक्रम यांनीच १९४८ मध्ये ‘दर्पणा नृत्य अकादमी’ स्थापण्यात पुढाकार घेतला. अहमदाबादेत प्रथम विद्यार्थी मिळेनात, पण दहा वर्षांत अकादमी बहरली आणि १९६३ पासून मृणालिनी यांनी पारंपरिक नृत्यशैलींची अभिजात परिभाषा कायम राखून नृत्यनाटय़े बसविणे सुरू केले. १९७७ मध्ये कन्या मल्लिका यांच्या हाती ‘दर्पणा’ची सूत्रे त्यांनी सोपवली आणि अगदी अखेपर्यंत येथेच त्या शिकवत राहिल्या! मल्लिकांनी ‘दर्पणा’ वाढविले, तेथे ‘नटरानी’ हे वर्तुळाकार प्रेक्षागार उभारले आणि मुख्य म्हणजे, ‘अम्मा’देखील नव्या नृत्यनाटय़ांत सहभागी होतील, याची काळजी अनेकदा घेतली. अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत या मायलेकींनी मिळून नृत्यनाटय़े आणि मार्गदर्शन शिबिरे केली होती. वयाच्या नव्वदीतही ‘अम्मा’ नृत्याविष्कारांबद्दल, त्यातील बदलांबद्दल सजग असत. ही नृत्यज्योत काल  पहाटे मालवली.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrinalini sarabhai