गेल्या ३२ वर्षांत प्रथमच श्रीलंकेतील संसदेला अल्पसंख्याक तमिळ गटाचा विरोधी पक्षनेता राजवरोथियम संपानथन यांच्या रूपाने लाभला आहे. ते तमिळ नॅशनल अलायन्स या पक्षाचे नेते असून सार्वत्रिक निवडणुकीत तो तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. अर्थात, संपानथन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यामागे तमिळींशी समेटाची भूमिका आहे. तमिळ लोक २००९ मध्ये संपलेल्या २६ वर्षांच्या यादवी युद्धाने पोळलेले आहेत. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा सरकारचाही प्रयत्न आहे. तमिळींच्या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढण्यातच देशाचे हित आहे, असे संपानथन यांचे म्हणणे आहे. यादवी युद्धाचे बळी एक लाखाहून अधिक झाले होते व त्यात शेवटच्या काही आठवडय़ांत तर चाळीस हजार तमिळींना प्राणास मुकावे लागले होते. आता श्रीलंकेत सिरिसेना अध्यक्ष तर विक्रमसिंघे पंतप्रधान आहेत, सिरिसेना यांनी युद्धगुन्ह्य़ांची चौकशी सुरू केली असून लवकरच त्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कआयोगापुढे मांडला जाणार आहे. जानेवारीत मतपेटीतून श्रीलंकेत क्रांती घडली, तीच विक्रमसिंघे यांच्या पंतप्रधानपदी निवडीने पुढे गेली आहे. संपानथन यांची निवड विरोधी पक्षनेतेपदावर झाल्यामुळे श्रीलंकेतील तमिळींना हक्काचे नेतृत्व मिळाले आहे.
संपानथन हे अनुभवी राजकारणी. १९७७ ते १९८३ व १९९७ ते २००० त्यानंतर २००४, २०१०, २०१५ या काळात ते खासदार होते. तमिळ नॅशनल अलायन्सचे नेतृत्वही २००१ पासून त्यांच्याकडेच आहे. त्यांचे शिक्षण जाफनातील सेंट पॅट्रिक कॉलेज, कुरुनेगलाचे सेंट अॅनीज कॉलेज, त्रिंकोमालीचे सेंट जोसेफ कॉलेज व मोराटुवातील सेंट सेबास्टियन कॉलेज येथे झाले. त्या आधी त्यांनी सिलोन विधि महाविद्यालयातून वकिलीची पदवी घेतली होती. खरे तर त्यांना राजकारणी व्हायचे नव्हते पण त्यांच्या घरात ती परंपरा होती. त्रिंकोमालीचे पहिले खासदार शिवपालन हे त्यांचे काका, तर नंतर खासदार झालेले एन. आर. राजवरोथायम हे चुलतभाऊ. संपानथन यांनी कधी सिंहली, तमिळ, मुस्लीम असा भेद केला नाही.
लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमचे सहानुभूतीदार असल्याची टीका त्यांच्यावर होत असली तरी ते ती फेटाळतात. ‘आपल्याला बंदूक कशी चालवायची माहिती नाही पण शब्दांचे शस्त्र माहिती आहे,’ असे ते म्हणतात. १९८३ मध्ये त्यांचे घर जाळण्यात आले, त्या वेळी त्यांना भारतात पळून यावे लागले. पण तरीही शांतता असेल तर श्रीलंकेसारखा देश जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाही, असा त्यांचा विश्वास कायम आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2015 रोजी प्रकाशित
राजवरोथियम संपानथन
तमिळ गटाचा विरोधी पक्षनेता राजवरोथियम संपानथन यांच्या रूपाने लाभला आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 08-09-2015 at 05:04 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajavarothiyam sampanthan profile