दिवंगत गायक किशोरकुमार यांची प्रथम पत्नी आणि गायक अमितकुमार यांची आई, एवढीच रुमा गुहा-ठाकुरता यांची ओळख नव्हे. कारण रुमा घोष- रुमा गांगुली आणि पुढे रुमा गुहा-ठाकुरता हा त्यांचा प्रवास केवळ कुटुंबापुरता नव्हता. कलेच्या आधाराने जगून सोमवारी त्या निवर्तल्या आणि बंगाली भाषक हळहळले.. गायिका, अभिनेत्री आणि संगीत क्षेत्रातील संघटक म्हणून त्यांनी केलेले काम, हा अनेकांच्या आठवणींचा ठेवा असल्याचे या हळहळीतून स्पष्ट झाले. हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक तेवढय़ा प्रमाणात हळहळले नाहीत, कारण कोलकात्यात जन्मलेल्या या गुणी अभिनेत्रीचा प्रवास मुळात मुंबईपासून, ‘ज्वार भाटा’ (१९४४) या चित्रपटापासून सुरू झाला, हे कुणाला आठवतही नसेल. हिंदी चित्रपटसृष्टीत पुढे ‘ट्रॅजिडी किंग’ म्हणून गाजलेले युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचाही हाच पहिला चित्रपट! पण दिलीपकुमार यांना हिंदीत जितके यश मिळाले, तितके रुमा यांना मिळाले नाही, हेही खरे. जीवनसाथी मात्र मिळाला. किशोरकुमार यांच्याशी रुमा यांचा विवाह १९५१ मध्ये झाला. अमितकुमार यांचा जन्म १९५२चा (वाद असू शकतो, तो रुमा यांच्याच जन्म-सालाबद्दल. १९३४ साली त्या जन्मल्याची नोंद सर्वत्र सापडते आणि १९४४ साली नायिका? तेव्हा एवढेच खरे की, गेल्या तेव्हा त्या नव्वदीपार असाव्यात). १९५८ मध्ये हे विवाहबंधन सुटले आणि त्यांचा विवाह अरूप गुहा- ठाकुरता यांच्याशी झाला. कोलकात्यात येऊन, रुमा यांनी बांगला चित्रपटसृष्टीवर लक्ष केंद्रित केले. ‘गंगा’ आणि ‘पर्सनल असिस्टंट’ (१९५९) पासून सुरुवात झालेली त्यांची बंगाली कारकीर्द हलक्याफुलक्या कौटुंबिक चित्रपटांतही अभिनयाची चमक दाखविल्याने बहरत गेली. पारंपरिक गोडवा असूनही आधुनिक म्हणून शोभणारा त्यांचा चेहरा कधी कंपनीची मालकीण म्हणून, तर कधी विधवेचे जिणे जगणारी मध्यमवयीन महिला म्हणून बोलका ठरला. सत्यजित राय दिग्दर्शित ‘अभिजान’ (१९६२) आणि ‘गणशत्रू’ (१९८९) या चित्रपटांत त्यांच्या भूमिका होत्या. मीरा नायर यांच्या ‘नेमसेक’ (२००६) या इंग्रजी चित्रपटातील गोगोलच्या आजीची भूमिका ही त्यांची अखेरची भूमिका ठरली. मुळात त्यांना आवड संगीताची, त्यामुळे त्यांनी पाश्र्वगायनही केले. मात्र संगीत क्षेत्रातील त्यांचे खरे काम म्हणजे ‘कोलकाता यूथ कॉयर’ या संगीतसमूहाच्या स्थापनेपासून, तरुणांच्या दोन पिढय़ांना त्यांनी या समूहातून घडविले. अभिनयात एक राष्ट्रीय पुरस्कार (चित्रपट- निर्जन सैकाते, १९६३), तोही विभागून, याखेरीज त्यांना मानसन्मान नसले, तरी संगीत-संघटक कार्यकर्ती म्हणून त्यांनी केलेले काम तितक्याच मोलाचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruma guha thakurta profile