क्रिकेट सामन्यांच्या निकालनिश्चिती प्रकरणात कोणाला तरी दोषी ठरविण्याच्या फंदात खरे तर आपण पडायला नको होते. श्रीनिवासन, कुंद्रा, श्रीशांत वगैरे पुण्यात्म्यांवर आरोप करून आपण काय मिळवले? देशनिर्मितीच्या उद्देशाने हे सारे मान्यवर कार्यरत असल्याने त्यांच्या या महान कार्यात ज्यांनी कोणी अडथळे आणले त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला हवे!
अखेर आमचा अंदाज खरा निघाला. क्रिकेट सामन्यांच्या निकालनिश्चिती प्रकरणात कोणीही दोषी सापडणार नाही असा आमचा होरा होताच. तसेच झाले. अर्थात आमचा अंदाज खरा निघाला म्हणून काही आम्हाला होराभूषण म्हणा असा आमचा आग्रह नाही. अंदाज बरोबर आला कारण तो अंदाज होता म्हणून. ती काही शास्त्रशुद्ध अशी पाहणी वगैरे नव्हती. अशा शास्त्रशुद्ध पाहण्यांचे अंदाज चुकू शकतात. कारण ते बरोबर येण्यापेक्षा चुकतील कसे यात अनेकांचे हितसंबंध असतात. त्या पाहण्या लांबतील कशा, प्रवास भाडय़ाची बिले फुगवती येतील कशी वगैरे मुद्दे अधिक महत्त्वाचे असतात. परंतु आमचे तसे नव्हते. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि अर्थातच आर्थिकही परिस्थितीकडे सतत संशयाच्या वृत्तीने पाहण्याची आम्हास सवय असल्याने क्रिकेट घोटाळ्यात कोणीच दोषी ठरणार नाही, असे आम्हाला वाटले. त्यामागे होती ती भारतीय व्यवस्थेचे निरीक्षण करण्याची साधना. खरे तर भारतीय व्यवस्थेकडे बारीक लक्ष ठेवून असलेल्या कोणासही असा अंदाज बांधता आला असता आणि त्या कोणाचाही अंदाज बरोबरच निघाला असता. याचे अत्यंत महत्त्वाचे असे कारण की कोणत्याही चौकशीत कोणालाही दोषी ठरवण्याची आपली परंपरा नाही. आपल्या चौकशी समित्यांनी कोणाच्याही आयुष्याचे नुकसान केलेले नाही. या चौकशी समित्या आपण स्थापन करतो त्या समाजाची, प्रसारमाध्यमांची गरज म्हणून. समाजातील काही नतद्रष्टांनी कोणत्याही कथित गैरव्यवहारांवर आक्षेप घेणे वगैरे बंद केले तर कोण कशाला या अशा चौकशांच्या फंदात पडेल? तेव्हा मुळात आरोप करणाऱ्यांची, तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी झाली की गुन्हय़ांची आणि चौकशांची संख्या आपसूकच कमी होईल. आधी आरोप होतात. मग चौकशी समित्या नेमाव्या लागतात. आता अशा समित्या नेमायच्याच असतील तर माजी न्यायमूर्ती वगैरे त्यावर का नकोत? आयुष्यभर न्यायदेवतेची सेवा करून वगैरे हे दमलेले असतात. त्यात ती न्यायदेवताच आंधळी. त्यामुळे न्यायमूर्तीचे उदात्त कार्य तिच्या नजरेत कसे यायला? त्यामुळे या बिचाऱ्या न्यायमूर्तीना आपल्याकडे सरकारचे, मंत्रिमहोदयांचे लक्ष जावे म्हणून कोण प्रयत्न करावे लागतात. मंत्रिमहोदयांनाही न्यायालयीन मदतीची गरज असतेच. शेवटी जो चोच देतो तो चाराही देतोच. तेव्हा असा चारा निवृत्तीनंतरही मिळत राहावा याच उदात्त विचारांनी चौकशी समित्या वगैरे स्थापन केल्या जातात आणि तेथे या निवृत्त न्यायमूर्तीची व्यवस्था लावता येते. खूप समित्या म्हणजे खूप नि. न्यां.ची सोय. निवृत्तीनंतर माणूस अधिक सहृदय होतो. दृष्टीही अधू होते. नि. न्या. त्यास अपवाद नाहीत. त्यामुळेच या नि. न्यां.च्या चौकशी समितीत कोणीच दोषी आढळत नाहीत. क्रिकेटचेही तसेच झाले.
एका अर्थाने ते योग्यच म्हणायचे. याचे कारण इतके सगळे गैरव्यवहार आपल्याकडे होत असतात. त्यात कोणाला ना कोणाला दोषी ठरवण्याच्या भलत्याच फंदात आपण पडू लागलो तर इतक्या सगळ्या दोषींना सामावून घेण्यासाठी तुरुंग आणायचे तरी कोठून? म्हणजे आधी तुरुंग वाढवा. ते वाढवायचे तर मग सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना कामाला लावा. अर्थात छगन भुजबळांसारख्या कार्यतत्परांना अशा कामामुळे आनंदच होत असेल, ही बाब वेगळी. पण त्यांना तरी किती आनंद द्या. तेव्हा चौकशीत कोणी दोषी नसणे हेच उत्तम. एकदा का कोणी मान्यवर दोषी आढळलाच आणि त्याला तुरुंगात डांबायची वेळ आली तर पुन्हा संकट. कारण त्यास तुरुंगात डांबले तर पुन्हा त्याच्या खर्चाची जबाबदारी सरकारच्याच शिरावर. शिवाय तुरुंगात ठेवले की त्यांचाही खर्च वाढणार. या मंडळींना तुरुंगात मोबाइल लागणार, घरचे जेवण लागणार, झोपायला गाद्यागिरद्या लागणार आणि झोप आली नाही तर ती यावी म्हणून आणखी काही लागणार. केवढा खर्च. त्यामुळे हे आर्थिक नुकसान टाळण्याच्या उदात्त हेतूनेच आपल्याकडे कोणाला दोषी ठरवले जात नाही. आणि झाले गेले गंगेला मिळाले, असेच तर आपली संस्कृती सांगते. काय मिळणार आहे या मंडळींना तुरुंगात डांबून? शिक्षा करून? समजा केली शिक्षा त्यांना तर जे झाले वा होऊन गेले ते परत का येणार आहे? तेव्हा भारतीय क्रिकेटदेखील त्याच उच्च परंपरेचे पाईक असल्याने कोणत्याच प्रकरणात कोणालाही दोषी ठरवले जाणार नाही, हे उघड होते.
हे भाकीत बरोबर ठरले याचा आनंद असताना त्याच वेळी आम्ही दु:खी आहोत. आणि हे दु:ख आहे क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांना या काळात किती यातना झाल्या असतील या विचाराचे! देशाचा एवढा आघाडीचा उद्योगपती! हिंदू धर्माचा कर्मठ प्रतिपालक. कपाळावर दररोज कुंकुमतिलक लावल्याशिवाय, षोडशोपचारे अय्यप्पाची सेवा करून प्रसादम् खाल्ल्याशिवाय हा गृहस्थ घरातून बाहेर निघत नाही. पांढऱ्या स्वच्छ वेष्टीइतके शुभ्र त्यांचे चारित्र्य. त्याबाबत त्यांची स्पर्धा होऊ शकते ती अर्थमंत्री चिदंबरम यांच्याशीच. तेव्हा काय मिळवले अशा पुण्यात्म्यावर आरोप करून आपण? तोसुद्धा सामन्याच्या निकालनिश्चितीचा? इतक्या उच्चपदावरील सुसंस्कारित व्यक्ती इतका क्षुद्र गुन्हा करेलच कसा, अशी शंकादेखील आपणास येऊ नये? एवढेच नव्हे तर या पुण्यश्लोक श्रीनिवासन यांचे जामात, चिरंजीव यांनाही आपण या आरोपांच्या दलदलीत ओढले. आम्हाला दु:ख आहे ते याचे. त्याचबरोबर बिच्चारा श्रीशांत! काय पाप हो त्याचे? मैदानात क्रिकेट खेळताना हरभजन सिंग याच्याकडून श्रीमुखात खायची आणि मैदानाबाहेर तो गाल कुरवाळून देणाऱ्या मऊमुलायम हातासाठी चार पैसे खर्च केले तर परत त्याबद्दलही शिक्षा भोगायची, हा खासा न्याय? आम्हाला आणखीही दया येते ती श्रीमान राज कुंद्रा यांची. एक तर या कुंद्रा यांनी पदराला खार लावून राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात क्रिकेटचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्या राज्याच्या नावाचा क्रिकेट संघ विकत घेतला. याच क्रिकेट प्रसाराच्या व्यापक हेतूने समजा त्यांनी आपला संघ जिंकावा यासाठी केले असले काही प्रयत्न तर बिघडले कोठे? ही भावना नैसर्गिकच नव्हे काय? आपला सिनेमा पाहावा असे त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शिल्पा शेट्टी कुंद्रा यांना जसे वाटायचे तसेच त्यांच्या पतीस आपला संघ जिंकावा असे वाटले तर त्याचा इतका गहजब का? एक तर मा. कुंद्रा हे इंग्लंडचे रहिवासी. भारतात आले ते क्रिकेटच्या उद्धारासाठी. तेव्हा त्यांचे कवतिक करावयाचे सोडून आपण त्यांच्यावर सामना निकालनिश्चितीचा आरोप करणार हा फारच कृतघ्नपणा झाला. तेव्हा हा प्रश्न कायमचाच दफ्तरी दाखल करून गाडून टाकावा अशी आमची सूचना आहे. या मान्यवरांमुळे क्रिकेट या खेळास किती स्थिरता आली आहे, ते आपण पाहायला हवे. उगाच शेवटचा चेंडू टाकला जाईपर्यंत उत्कंठा ताणा आणि सामन्याच्या जया-पराजयाचा तराजू कोठे झुकतोय ते पाहत रक्तदाब वाढवून घ्या यात काहीही अर्थ नाही. हे सर्व कालबाहय़ आहे.
त्यापेक्षा सामना कोण जिंकणार हे आधीच ठरवून टाकणे हेच योग्य आहे आणि अशाच नियोजनाची देशाला आज गरज आहे. त्याच देशनिर्मितीच्या उद्देशाने हे सारे मान्यवर कार्यरत असल्याने त्यांच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. हे लक्षात न घेता त्यांच्या या महान कार्यात ज्यांनी कोणी अडथळे आणले त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला हवे अशी आमची मागणी आहे. ते होत नाही तोपर्यंत आपण या संतसज्जनांची क्षमा मागू या..!
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2013 रोजी प्रकाशित
आपण त्यांची क्षमा मागू या..
क्रिकेट सामन्यांच्या निकालनिश्चिती प्रकरणात कोणाला तरी दोषी ठरविण्याच्या फंदात खरे तर आपण पडायला नको होते. श्रीनिवासन, कुंद्रा, श्रीशांत वगैरे पुण्यात्म्यांवर आरोप करून आपण काय मिळवले?
First published on: 30-07-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will say sorry to them