बांगलादेशवर तीन विकेट्सने मात; अ‍ॅडम झाम्पा सामनावीर
विजयाची संधी कधी मिळेल ते सांगता येत नाही, पण त्यावेळी सतर्क राहून सर्वोत्तम कामगिरी केल्यावरच विजय मिळू शकतो; अन्यथा पराभवच पदरी पडतो. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या गाफीलपणामुळे बांगलादेशला विजयाची संधी चालून आली होती, पण गचाळ क्षेत्ररक्षण आणि अनुभवाची कमतरता यामुळे त्यांना ती साधता आली नाही. ऑस्ट्रेलियाने रडत-खडत बांगलादेशला तीन विकेट्सने हरवून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि अष्टपैलू शेन वॉटसनने बांगलादेशला सुरुवातीलाच दोन धक्के देत २ बाद २५ अशी अवस्था केली. त्यानंतर शकिब अल हसन (३३) फलंदाजीला आला आणि त्याने संघाला शतकी मजल मारून दिली. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाने तिखट मारा करत शकिबसह तीन फलंदाजांना बाद केले. शकिब बाद झाल्यावर महमुदुल्लाने मुशफिकर रहिमसहित (नाबाद १५) अखेरच्या तीन षटकांमध्ये ८ चौकार वसून करत ४४ धावा उभारल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २८ चेंडूंत ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. मुहमदुल्लाहने २९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४९ धावा केल्या.
बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजाने पहिल्याच षटकात षटकार लगावत धडाक्यात सुरुवात केली. त्यानंतर त्याने शकिबच्या पाचव्या षटकात सलग तीन चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. ख्वाजा फटकेबाजी करत असताना शेन वॉटसन (२०) संयमी फलंदाजी करत होता. त्याला १३ धावांवर असताना जीवदान मिळाले, पण याचा फायदा तो उचलू शकला नाही. दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारत ख्वाजाने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. अल-अमिन हुसेनने अप्रतिमपणे त्याच्या यष्टय़ांचा वेध घेतला. ख्वाजाने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५८ धावा केल्या. ख्वाजा बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने दोन झटपट फलंदाज गमावले; पण ग्लेन मॅक्सववेलने (२६) दडपण झुगारत मोठे फटके मारले. मात्र त्यालाही संघाच्या विजयावर शिक्कामेर्तब करण्यात अपयश आले. अखेर जेम्स फॉकनरने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : २० षटकांत ५ बाद १५६ (महमदुल्लाह नाबाद ४९, शकिब अल हसन ३३; अ‍ॅडम झाम्पा ३/२३) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १८.३ षटकांत ७ बाद १५७ (उस्मान ख्वाजा ५८; शकिब अल हसन ३/२७)
सामनावीर : अ‍ॅडम झाम्पा.