जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आणि उपांत्य फेरीत आगेकूच करण्यासाठी आतुर इंग्लंडची पाकिस्तानशी लढत होत आहे. २००९ मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरणाऱ्या इंग्लंडने तिन्ही प्राथमिक लढतीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानने इंग्लंडला नमवल्यास आणि वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवला तर सर्व संघांचे समान गुण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरस धावगतीच्या जोरावर पुढे जाणाऱ्या संघांबाबत निर्णय घेण्यात येईल. म्हणूनच पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. चालरेट एडवर्ड्स, टॅमी ब्युमाऊंट, नताली शिव्हर आणि सारा टेलर दमदार फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीची धुरा अन्या श्रुसबोले, हिदर नाइट आणि कॅथरिन ब्रँट यांनी समर्थपणे सांभाळली आहे. चेपॉकच्या संथ आणि फिरकीला अनुकूल खेळपट्टीशी इंग्लंडचा संघ कसा जुळवून घेतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. दुसरीकडे यजमान भारत आणि त्यानंतर बांगलादेशला नमवणाऱ्या पाकिस्तान संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. सलामीवीर जव्हेरिया वादहूदला दुखापत झाली आहे. अन्य काही खेळाडूंना किरकोळ दुखापतींनी सतावले आहे. मधल्या फळीची कामगिरी पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे. रुमाना अहमद, नाहिदा अख्तर, जानहारा आलम आणि सलमा खान या चौकडीला कामगिरीत सातत्य राखण्याची जबाबदारी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2016 रोजी प्रकाशित
अपराजित इंग्लंडची पाकिस्तानशी लढत
पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे.

First published on: 27-03-2016 at 05:20 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England vs pakistan women t20 world cup