‘‘पुढच्या लढतीत सलामीला खेळायला येईन का, या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. सलामीला काय संघात असेन का, याचीही खात्री नाही. अंतिम संघात स्थान मिळावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे,’’ अशा शब्दांत श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत ८४ धावांच्या खेळीसह वेस्ट इंडिजच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या आंद्रे फ्लेचरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रीलंकेविरुद्धच्या लढतीसाठी वेस्ट इंडिज संघाने संघात एकमेव बदल केला. वेगवान गोलंदाज जेरॉम टेलर ऐवजी फलंदाज आंद्रे फ्लेचरची निवड करण्यात आली. धडाकेबाज ख्रिस गेल संघात असल्याने आणि वेस्ट इंडिजला मिळालेले आव्हान अल्प असल्याने फ्लेचरला फलंदाजीला येण्याची संधी मिळेल का, याची शाश्वती नव्हती. मात्र क्षेत्ररक्षण करताना शेवटच्या षटकांमध्ये गेल मैदानाबाहेर असल्याने सलामीला येण्याची संधी नाकारण्यात आली. फ्लेचरला ही संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. फ्लेचरने ८४ धावांची शानदार खेळी साकारली.
‘‘गेलची फलंदाजी दुसऱ्या बाजूने पाहायला मिळावी असे वाटत होते. चाहत्यांचीही तीच इच्छा होती. मला संधी मिळाली. संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचे समाधान आहे,’’ असे फ्लेचरने सांगितले.
इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत दमदार वाटचाल करणारा वेस्ट इंडिज संघ जेतेपद पटकावणार का, असे विचारले असता फ्लेचर म्हणाला, ‘‘आम्ही आता जसे खेळतोय तसे खेळत राहिलो तर नक्कीच जेतेपद पटकावू. विश्वचषकापूर्वी सराव शिबिरात एकत्र असतानाही आम्हाला जिंकण्याची खात्री होती. आमची ताकद काय याची आम्हाली कल्पना आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करणे आवश्यक आहे. सातत्याने चांगला खेळ करण्याची गरज आहे.’’