भारत आणि पाकिस्तान यांच्यातील इडन गार्डन्सवरील सामना चांगलाच रंगला. पण भारताने या सामन्यात विजय मिळवला तो विराट कोहलीमुळेच. त्यामुळे दोन्ही संघातील कोहली हाच मुख्य फरक होता, असे मत पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने व्यक्त केले आहे.
‘‘ आमची धावसंख्या ही भारतासाठी पुरेशी नव्हती. पण या सामन्यामध्ये दडपण हाताळणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणतीही धावसंख्या आव्हानात्मक असू शकते. त्यामुळेच या सामन्यातील कोहलीची खेळी महत्त्वपूर्ण ठरते. कोहलीने या सामन्यात दडपण न घेता सकारात्मक फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला विजय मिळवता आला. कोणत्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ कोहलीने दाखवून दिला,’’ असे मलिक म्हणाला.
पाकिस्तानच्या कामगिरीबाबत मलिक म्हणाला की, ‘‘ आम्हाला फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. खेळपट्टी कशीही असली तरी ती आपण बदलू शकत नाही. पण खेळपट्टीनुसार फलंदाजी मात्र आपण बदलू शकतो, तेच आपल्या हातात असते. त्यामुळे काही गोष्टींचा आम्हाला नक्कीच विचार करायला हवा.’’