महिला ट्वेन्टी २० विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. न्यूझीलंड संघाने खेळलेल्या तब्बल तीनही सामन्यात आपला विजय नोंदवून इतर सहभागी संघांच्या तुलनेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान पटकाविला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाचा क्रमांक लागतो. या दोन्ही संघाने आतापर्यंत दोन-दोन सामने जिंकले आहेत, तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेला खेळलेल्या सामन्यांपकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळविता आला आहे.
अलीकडेच १५ मार्चला भारत विरुध्द बांगलादेशाच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारताने ७२ धावांनी आपला पहिला विजय नोंदविला. भारताने पहिले फलंदाजी करत २० षटकांत १६३ धावांचे डोंगर बांगला देशासमोर ठेवले. मात्र, प्रत्युत्तर देतांना बांगलादेशाला २० षटकांत ९१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत ‘ब’ गटात दरारा ठेवण्यात यश प्राप्त केले, तर न्यूझीलंड विरुध्द श्रीलंका अशा दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने देखील विजयी सलामी देत श्रीलंकेचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला.
‘अ’ गटातील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला पराभवाच्या छायेत जावे लागले. प्रथम फलंदाझी करत श्रीलंकेने २० षटकांत ११० धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले. प्रत्युत्तर देतांना न्यूझीलंडने अवघ्या १५ व्या षटकांतच ७ गडी राखून विजय आपल्या नावे केला. १६ मार्चला चेन्नई येथे पाकिस्तान विरुध्द वेस्ट इंडिज असा ‘ब’ गटातील दुसरा सामना झाला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पाकिस्तान फक्त ४ धावांनी पराभूत झाला आणि वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या सामन्यात विजय नोंदविला.
बंगळुरू येथे ‘ब’ गटात झालेल्या बांगलादेश विरुध्द इंग्लंड दरम्यान झालेल्या सामन्यात इंलंडने ३६ धावांनी विजय मिळविला.‘अ’गटात न्यूझीलंड विरुध्द र्आयलंडदरम्यान मोहाली येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने ९३ धावांनी विजय मिळवत विश्वचषकात आपला सलग दुसरा विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने २० षटकांत १७७ धावांचे आव्हान समोर ठेवले. मात्र, र्आयलंडला २० षटकांत फक्त ८४ धावांपर्यंत मजल मारला आली. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या ‘अ’ गटातील ऑस्ट्रेलिया विरुध्द दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात यश मिळाले. प्रथम फलंदाजीला आलेल्या आफ्रिकेने १०२ धावांचे आव्हान गतविजेत्यासमोर ठेवले. मात्र, ऑस्ट्रेलियाने १८ व्या षटकांतच विजय नोंदवला. ६ गडी राखत ऑस्ट्रेलियाने विजयाची परंपरा कायम राखली. १९ मार्चला दिल्ली येथे भारत विरुध्द पाकिस्तान अशी ‘ब’गटातली सर्वात लक्षवेधी लढत झाली. यात प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय खेळाडूंना मोठय़ा खेळीपासून दूर ठेवण्यात पाकिस्ताच्या गोलंदाजांना यश आले आणि निर्धारित २० षटकांत भारतीय संघाला फक्त ९६ धावांचे सोपे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवण्यात यश आले. प्रत्युत्तर देतांना पाकिस्तानला पावसाने साथ दिली. त्यामुळे डकवर्ड लुईसच्या पध्दतीनुसार १६ व्या षटकांत २ धावांनी पाकिस्तानाला विजयी घोषित करण्यात आले अन् भारताला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. २० मार्चला चेन्नई येथे झालेल्या बांगलादेश विरुध्द वेस्ट इंडिजदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने ४९ धावांनी आपला शानदार दुसरा विजय मिळविला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ गडीबाद होत १४८ धावांचे डोंगर उभे करण्यात यश मिळाले. मात्र, मिळालेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले अन् बांगलादेशाला १८ व्या षटकांत सर्वबाद केले.
त्याच दिवशी मोहाली येथे झालेल्या र्आयलंड विरुध्द श्रीलंकेच्या सामन्यात र्आयलंडला केवळ १४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २१ मार्चला गत विजेत्या ऑस्ट्रेलियाला संघाला नागपूरच्या जामठा येथे धक्का बसला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाची करण्याचे ठरवले. निर्धारित २० षटकांत ऑस्ट्रेलियाला केवळ १०३ धावा पर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडची फिरकीपटू ले कॅस्पेरेकने तब्बल ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाला मोठी खेळी पासून रोखून ठेवले, तर मिळालेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १६ व्या षटकांत ६ गडी राखून आपला तिसरा दणदणीत विजय साजरा करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
धर्मशाळा येथे २२ मार्चला झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडने झटका दिला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी खेळता आली नाही. २० षटकांत फक्त ९० धावा काढून भारतीय संघाने सहज सोपे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले. प्रत्युत्तर देतांना मात्र इंग्लंडच्या खेळाडूंची फळी कोसळत गेली अन् सामना चुरशीच्या दिशेने गेला. मात्र, १९ व्या षटकांत आठ गडी बाद इंग्लंडने भारताविरुध्द आपला दुसरा विजय मिळविला. एकंदरीत आतापर्यंत झालेल्या विश्वचषकातील सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय न्यूझीलंडच्या नावे असल्याने विश्वचषक जिंकण्याच्या यादीत प्रबळ दावेदार असल्याचे सिध्द केले आहे.