वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात आज सामना
ख्रिस गेल आणि तिलकरत्ने दिलशान या दोघांनीही आपल्या झंझावाती फलंदाजीने आपली एक अद्वितीय अशी ओळख क्रिकेट जगतामध्ये निर्माण केली आहे. रविवारी वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेमध्ये सामना होणार असून या दोघांमध्ये सर्वोत्तम कामगिरी कोण करणार, हे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. (Full Coverage|| Fixtures||Photos)
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजीचा नमुना गेलने पेश केला होता. या सामन्यात त्याने तब्बल ११ गगनचुंबी षटकार लगावत नाबाद शतक झळकावत संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्यामुळे या सामन्यात गेल हा श्रीलंकेच्या रडारवर असेल. वेस्ट इंडिजच्या अन्य फलंदाजांना अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. पण वेस्ट इंडिजचे गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धचा सामना श्रीलंकेने जिंकला असला तरी त्यामध्ये त्यांची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नव्हती. सलामीवीर दिलशानने समर्थपणे गोलंदाजीचा सामना केल्यामुळे त्यांना विजय मिळवता आला होता. दिलशान आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज वगळता अन्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर गोलंदाजांनाही छाप पाडता आलेली नाही.
दोन्ही संघांच्या गोलंदाजांना भेदक मारा करता आलेला नाही. त्यामुळे गेल आणि दिलशान या दोघांनाही मोठी खेळी साकारण्याची संधी असेल. त्यामुळे या दोघांच्या खेळीवर संघाचा विजय-पराजय अवलंबून असू शकतो.
वेस्ट इंडिज वि. श्रीलंका (गट दुसरा)
- स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम
- वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्
संघ
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दुशमंथा चमीरा, दिनेश चंडिमल, तिलकरत्ने दिलशान, रंगान हेराथ, शेहान जयसूर्या, चमारा कपुगेदरा, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके, दाशून शनाका, मलिंडा सिरिवर्धना, लहिरू थिरिमाने आणि जेफ्रे व्हँडरसे.
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कालरेस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, अॅश्ले नर्स, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, मालरेन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर आणि इव्हिन लुईस.