रोमहर्षक लढतीत वेस्ट इंडिजचा विजय; डॉटिनची अष्टपैलू कामगिरी
अखेरच्या षटकात भारतीय महिला संघाला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. पण हे दडपण पेलण्यात अपयशी ठरल्यामुळे वेस्ट इंडिजकडून फक्त तीन धावांनी हार पत्करणाऱ्या भारताचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. दियांड्रा डॉटिनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर वेस्ट इंडिज संघाने तिसऱ्या विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले . भारताकडून अनुजा पाटीलने अष्टपैलू खेळ दाखवत पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.
वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांची ३ बाद २६ अशी केविलवाणी अवस्था झाली. पण डावाला प्रारंभ करणारी कर्णधार स्टेफनी टेलर जिद्दीने किल्ला लढवत होती. तिने मग दियांड्रा डॉटिनच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या दोघांव्यतिरिक्त विंडीज संघातून कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. टेलरने ४५ चेंडूंत ५ चौकारांसह ४७ धावा केल्या, तर डॉटिनने ४० चेंडूंत ५ चौकारांसह ४५ धावा केल्या. पंजाबच्या हरमनप्रीत कौरने अखेरच्या षटकात तीन बळी घेत विंडीजच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. हरमनप्रीतने २३ धावांत ४ तर अनुजाने १६ धावांत ३ बळी घेतले.
त्यानंतर भारताच्या डावात पहिला चेंडू वाइड पडल्यानंतर पुढच्याच चेंडूवर भारताची कर्णधार मिताली राज भोपळासुद्धा न फोडता माघारी परतली. त्यानंतर स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा आणि अनुभवी झुलन गोस्वामी यांनी चांगले योगदान दिले. मात्र अखेरच्या षटकात विजयाचे आव्हान पेलताना तीन फलंदाज बाद झाले. डॉटिननने पहिल्याच चेंडूवर एकता बिश्तचा त्रिफळा उडवला. चौथ्या चेंडूवर शिखा पांडे धावचीत झाली, तर पाचव्या चेंडूवर सुषमा वर्माने मिड ऑफला टेलरकडे झेल दिला.
भारताने बांगलादेशला हरवून विश्वचषकाची चांगली सुरुवात केली होती. मात्र पावसामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयाने हुलकावणी दिली, तर नंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्याकडून पराभूत झाल्यामुळे फक्त एका विजयाच्या दोन गुणांसह भारताला गाशा गुंडाळावा लागला.

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय
चेन्नई : चालरेट एडवर्ड्सची अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध प्रदर्शनाच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानवर ६८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १४८ धावांची मजल मारली. एडवर्ड्सने १० चौकारांसह ७७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तकादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव ८० धावांतच संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ८ बाद ११४ (स्टेफनी टेलर ४७, दियांड्रा डॉटिन ४५; अनुजा पाटील ३/१६, हरमनप्रीत कौर ३/२३) पराभूत वि. भारत : २० षटकांत ९ बाद १११ (अनुजा पाटील २६, झुलन गोस्वामी २५, स्मृती मंधाना २२; दियांड्रा डॉटिन ३/१६, अ‍ॅफी फ्लेचर २/१५).

सामनावीर : दियांड्रा डॉटिन.