• श्रीलंकेवर दहा धावांनी मात
  • बटलरची झंझावाती खेळी
  • मॅथ्यूजची एकाकी झुंज अपयशी

इंग्लंडच्या १७२ धावांच्या आव्हानासमोर खेळताना श्रीलंकेची ४ बाद १५ अशी दयनीय अवस्था होती. मात्र श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने दुखापतींची पर्वा न करता एकाकी झुंज देत श्रीलंकेच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याची झुंज अपयशी ठरली आणि इंग्लंडने दहा धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ३७ चेंडूत ६६ धावांची वेगवान खेळी करणारा जोस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला आणि त्याला सामनावीराच्या पुरस्काने गौरवण्यात आले. इंग्लंडच्या विजयासह श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे बिकट अवस्था झालेल्या श्रीलंकेला मॅथ्यूज आणि चामरा कपुगेदरा (३०) या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करत सावरले. यानंतर मॅथ्यूजने थिसारा परेरला साथीला घेत सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. वाढत्या धावगतीच्या दडपणाखाली परेरा (२०) आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दासून शनका (१५) बाद झाले. अनुभवी रंगना हेराथला ख्रिस जॉर्डनने त्रिफळाचीत केले. शेवटच्या षटकांत ६ चेंडूत १५ धावा करण्याचे आव्हान श्रीलंकेसमोर होते. मात्र बेन स्टोक्सच्या अचूक यॉर्करसमोर मॅथ्यूज निष्प्रभ ठरला आणि इंग्लंडने थरारक विजयाची नोंद केली. मॅथ्यूजने ५४ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डनने ४ बळी घेतले.

तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावांची मजल मारली. पहिल्याच षटकात अ‍ॅलेक्स हेल्स भोपळाही न फोडता तंबूत परतला. मात्र यानंतर जेसन रॉय आणि जो रूट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. जेफ्री व्हँडरसेने रूटला बाद करत ही जोडी फोडली. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या जेसन रॉयला व्हँडरसेनेच माघारी धाडले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर इंग्लंडची धावगती मंदावली. १६ षटकांत इंग्लंडची ३ बाद ११७ अशी स्थिती होती. उर्वरित ४ षटकांत इंग्लंडने जोरदार हल्लाबोल करत ५४ धावा कुटल्या. बटलरने ३७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६६ धावांची वेगवान खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ४ बाद १७१ (जोस बटलर नाबाद ६६, जेसन रॉय ४२; जेफ्री व्हँडरसे २/२६) विजयी विरूद्ध श्रीलंका : २० षटकांत ८ बाद १६१ (नाबाद अँजेलो मॅथ्यूज ७३, ख्रिस जॉर्डन ४/२८)

सामनावीर : जोस बटलर