अब्जाधीश एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा मालकी हक्क मिळवल्यापासून या कंपनीत अनेक बदल झाले आहेत. ट्विटरमध्ये मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात साधारण ५० टक्के कर्मचारीकपात करण्यात आली आहे. मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरूच आहे. आर्थिक मंदीचे कारण सर्व कंपन्यांकडून दिले जात आहे. मात्र जगभरातील ट्विटर युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता युजर्स हे आपल्या अकाउंट बंद केले तर त्याविरोधात आवाज उठवता येणार आहे. शुक्रवारी ट्वीटरने सांगितले कि, १ फेब्रुवारीपासून वापरकर्ते अकाऊंड बंद केले तर त्याविरोधात आवाज उठवू शकणार आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नवीन नियमांनुसार केवळ गंभीर प्रकरणांमध्ये आणि सध्या असलेल्या धोरणांचे वारंवार कोणी उल्लंघन केले तर त्याचे ट्विटर अकाउंट बंद केले जाणार आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये चुकीच्या पोस्ट, हिंसा किंवा तेढ निर्माण होईल असा मजकूर , धमकी देणे तसेच बाकीच्या युजर्सना त्रास देणे अशा गुन्ह्यांचा समावेश होतो.
नवीन धोरणांनुसार अकाउंट बंद करणे या कारवाईऐवजी कमी तीव्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. म्हणजेच नियमांचे उल्लंघन केल्यास बंद करण्याआधी ते ट्विट काढून टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ट्वीटरचे सीईओ एलन मस्क यांच्या विमानाबद्दल काही माहिती सार्वजनिक केल्याबद्दल काही पत्रकारांचे ट्विटर अकाउंट बंद केले होते. मात्र नंतर यावरून वाद निर्माण झाल्याने त्यांचे अकाउंट पुन्हा सुरु करण्यात आले होते.