गुगलनं भाषांतर करण्यासंदर्भात एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता तुम्ही गुगलवर संस्कृत आणि भोजपुरीमध्ये भाषांतर करू शकता. नवीन अपडेटनंतर गुगल ट्रान्सलेटमध्ये संस्कृत आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. नवीन अपडेटनंतर गुगलमध्ये तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येईल. गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध असलेल्या एकूण भारतीय भाषांची संख्या आता १९ वर गेली आहे. तर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये आता भाषांतर करता येणार आहे. बुधवारी उशिरा सुरू झालेल्या वार्षिक गुगल परिषदेत ही घोषणा करण्यात आली. आपल्या ऑनलाइन भाषांतर प्लॅटफॉर्मवर सतत अनेक प्रादेशिक भाषा जोडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आसामी भाषा ईशान्य भारतातील सुमारे २५ दशलक्ष लोक वापरतात.भोजपुरी सुमारे ५० दशलक्ष लोक वापरतात. कोंकणी मध्य भारतातील सुमारे २० दशलक्ष लोक वापरतात. गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल यांनी एका खास मुलाखतीत इकोनॉमिक्स टाईम्सला सांगितले की, “संस्कृत ही गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे आणि आता आम्ही ती जोडत आहोत. आम्ही प्रथमच ईशान्य भारतातील भाषांना जोडत आहोत.”

भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची भारतातील भाषांशी संबंधित असून या अनुसूचीमध्ये २२ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु गुगलच्या नवीनतम अपडेटमध्ये भारतातील सर्व २२ अनुसूचित भाषांचा समावेश नाही. याबाबत कॅसवेल यांनी सांगितले की, “आम्ही अनुसूचित भाषांमधील ही तफावत कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.”

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google translate added eight indian languages including sanskrit rmt