ISRO 100th satellite launch mission at Sriharikota : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने देशाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिता येईल असा आणखी एक अध्याय रचला. उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटाहून आज इस्रोच्या रॉकेटने – प्रक्षेपकाने १०० व्यांदा उड्डाण केले. GSLV-F15 या प्रक्षेपकाने NVS-02 नावाचा दोन २५० किलो वजनाचा उपग्रह हा १७० किलोमीटर उंचीवर अगदी अचूकपणे प्रक्षेपित केला. या तळावरुन उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या इस्रोचे हे १०० वे उड्डाण ठरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NVS-02 उपग्रहाचे काम काय ?

अमेरिकेच्या GPS प्रमाणे भारतीय उपखंडात स्वदेशी दिशादर्शक प्रणाली किंवा व्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी २०११ पासून इस्रोने NavIC ( Navigation with Indian Constellation ) नावाने सात उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. या उपग्रहांमुळे लष्कराच्या विविध विभागांना आणि नागरी विमान सेवेकरता GPS प्रमाणे दिशादर्शन हे भारतीय उपखंडात केले जाते. याच उपग्रहांच्या प्रणालीत आता NVS-02 हा नवीन उपग्रह २०१६ ला पाठवलेल्या IRNSS-1E या उपग्रहाची जागा घेईल.

श्रीहरीकोटामधून उपग्रह प्रक्षेपणाची सुरुवात कधी झाली?

१० ऑगस्ट १९७९ ला श्रीहरीकोटा या तळावरुन इस्रोच्या रॉकेटने पहिले उड्डाण केले. त्यावेळी Rohini Technology Payload हा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते उड्डाण अयशस्वी ठरले असले तरी श्रीहरीकोटावरुन उपग्रह प्रक्षेपणाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्या मोहिमेचे नेतृत्व हे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी केले होते. मात्र त्यानंतर अपयशाने खचून न जाता १८ जुलै १९८० ला याच तळावरुन भारताने अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. आजच्या १०० व्या उड्डाणासह इस्रोने या श्रीहरीकोटाहून आत्तापर्यंत एकुण ५४८ उपग्रह प्रक्षेपित केले असून यामध्ये ४४३ विदेशातील उपग्रहांचा समावेश आहे. याच तळावरुन आत्तापर्यंच चांद्रयान, मंगळयानसारख्या मोहिमा प्रक्षेपित केल्या आहेत. लवकरच समानवी मोहिमाही याच तळावरुन प्रक्षेपित केली जाणार आहे.

आजच्या य़शाच्या निमित्ताने इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी इस्रोच्या सर्व अभियंता, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आजच्या १०० व्या उड्डाणानिमित्त इस्रोचे चार माजी अध्यक्ष हा सोहळा पहाण्यासाठी उपस्थित होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro hits century in sriharikota 100th successful flight 548th satellite launched asj