जगात फुकट काहीही मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते. गोष्टी फुकट मिळायला लागल्या की त्यांची किंमत राहत नाही हे वास्तव आहे. कुठलीही गोष्ट फुकट असली की त्याकडे जरा संशयानेच पाहिलं जातं. त्यामुळेच मोबाइल अॅप्स, सोशल नेटवर्किंग साइट्स जेव्हा मोफत सुविधा पुरवतात तेव्हा प्रश्न पडतो की ह्य़ांना हे सगळं परवडतं कसं. फ्री अॅप्स तयार करणं, त्यांचा प्रसार करत लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांचं मार्केटिंग करणं आणि लोकांना उत्तमोत्तम सुविधा पुरवणं यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ येतं तरी कुठून. जर ही अॅप्स, सोशल नेटवर्किंग साइट्स मोफत असतील तर या कंपन्या नफा मिळवतात तरी कशा, असे अनेक प्रश्न अनेकदा समोर येत असतात. या प्रश्नांची उत्तरं काही अंशी सोपी आहेत तर बऱ्याच अंशी गुंतागुंतीची. उदाहरणादाखल आपण काही अॅप्स आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या आर्थिक बाबी बघू या.
व्हॉट्सअॅप- जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप. साधारण ९९ कोटी युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मोफत असलेल्या या अॅपचे महसूल मिळवण्याचे दोन पर्याय आहेत. अनेक देशांमध्ये व्हॉट्सअॅप हे सुरुवातीचं एक वर्ष मोफत असतं आणि त्यानंतर प्रतिवर्षी १ डॉलर इतक्या किंमतीला हे अॅप विकत घेता येतं. वापरकर्त्यांचा पसारा बघता वर्षांकाठी व्हॉट्सअॅपला १०० कोटी डॉलर्स मिळणं अपेक्षित आहे. मात्र व्हॉट्सअॅपकडून त्यांच्या महसुलाबाबत कायमच गुप्तता पाळली जाते.
दुसरा पर्याय म्हणजे डेटा मॅनेजमेंट. प्रत्येक युजरची माहिती ही व्हॉट्सअॅपच्या सव्र्हरवर सेव्ह केलेली असते. तसंच चॅट्ससुद्धा डेटा सव्र्हरवर स्टोअर होतात. हा डेटा जाहिरातदार किंवा इतर कंपन्यांना विकून मोठय़ा प्रमाणात महसूल व्हॉट्सअॅप मिळवत असल्याचं अनेकदा बोललं गेलंय. मात्र याही बाबतीत व्हॉट्सअॅपकडून अधिकृतरीत्या काहीच जाहीर केलं गेलेलं नाही.
सुरुवातीच्या काळात फाऊंडर्सनी पदरचे पैसे घालून अॅप तयार केलं. त्यानंतर सेकोइया नावाच्या कंपनीने ७० लाख डॉलर्सची गुंतवणूक करून व्हॉट्सअॅपला आधारही दिला. दोनच वर्षांपूर्वी फेसबुकने १९ अब्ज डॉलर्स मोजून हे मेसेजिंग अॅप विकतही घेतलं. पण वास्तव हे आहे अजून तरी व्हॉट्सअॅपमधून महसूल मिळवण्याबाबत झकरबर्गच्या कंपनीने प्रयत्न केलेले नाहीत.
व्हॉट्सअॅपप्रमाणेच हाइक, वीचॅट, लाइन, व्हायबर अशा अनेक मेसेजिंग अॅप्सची महसूल पद्धती (रेव्हेन्यू मॉडेल) काहीशी एकसारखी आहे. पण यातला महत्त्वाचा फरक आहे तो जाहिरातींचा. व्हॉट्सअॅपने सुरुवातीपासूनच स्वत:ला जाहिरातदारांपासून लांब ठेवलं आहे. त्यामुळेच ते लोकप्रिय ठरलंय. पण इतर मेसेजिंग अॅप्सनी मात्र लोकप्रियतेबरोबरच जाहिरातींच्या माध्यमातून बऱ्यापैकी नफा मिळवला आहे. त्यामुळे सबस्क्रीप्शन आणि जाहिराती यांच्या माध्यमातून ही अॅप्स चांगला नफा तर मिळवतातच पण नवनवीन अपडेट्सही आणतात.
फेसबुक- सर्वात लोकप्रिय अशी सोशल नेटवर्किंग साइट. गुगलच्या ऑर्कुटला टक्कर देत बाजारपेठेत मुसंडी मारलेल्या फेसबुकला सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सच्या बिझनेस मॉडेलचं जनक म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळात फेसबुकने जाहिरातींना दूर ठेवलं होतं. पण आत्ताच्या घडीला जाहिरात हाच फेसबुकच्या महसुलाचा सर्वात मोठा घटक आहे. वर्षांकाठी अडीच अब्ज डॉलर्स इतकी मिळकत जाहिरातींच्या माध्यमातून झकरबर्गच्या खिशात जाते. टाइमलाइन किंवा न्यूजफीडमध्ये अनेकदा ज्या स्पॉन्सर्ड पोस्ट्स असतात, त्यातूनच फेसबुकची मिळकत होत असते.
जी गोष्ट फेसबुकची तीच ट्विटर, लिंक्डइनसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सची. ट्विटरच्या नफ्याचा स्रोतही जाहिराती हाच आहे. ट्रेडिंगमध्ये येण्यासाठी अनेक कंपन्यांचा ट्विटरशी करार असतो. तसंच प्रमोशनल ट्वीट्सची सुविधाही ट्विटरच्या मिळकतीचाच एक भाग आहे.
लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्किंग साइटला टॅलेंट सोल्यूशन, मार्केटिंग सोल्यूशन आणि प्रीमियम सबस्क्रीप्शन या तीन माध्यमांतून महसूल मिळतो. पण सर्वाधिक नफा कमवला जातो तो त्यांच्या टॅलेंट सोल्यूशन्समधून. कार्पोरेट्स आणि रिक्रूटर्सना एकत्र आणून इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचवणं हे टॅलेंट सोल्यूशन्सचं महत्त्वाचं काम. यासाठी कार्पोरेट्स, रिक्रूटर्स लिंक्डइनला पैसे देतात. या माध्यमातून लिंक्डइनला वर्षांकाठी ५० लाख डॉलर्सचा महसूल मिळतो. मार्केटिंग सोल्यूशन्स म्हणजेच एक प्रकारे जाहिराती ज्यामधून साधारण २५ लाख डॉलर्स नफा लिंक्डइन कमावते. बिझनेस, बिझनेस प्लस आणि एक्झिक्युटिव्ह अशा तीन प्रकारच्या प्रीमियम सबस्क्रीप्शन्समधून लिंक्डइनला २० टक्के नफा मिळवता येतो.
मोबाइल अॅप्स असोत की सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स, यांच्याबाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे डेटा मॅनेजमेंट. विचार करा की जगातल्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी काही अब्ज लोकांची माहिती या वेबसाइट्स, अॅप्सकडे आहे. हीच माहिती किंवा डेटा काही अंशी जाहिरातदारांना विकून पैसे कमावता येतात. आपल्या चॅट्स, स्टेट्स अपडेट्स, पोस्ट्स, फोटो शेअरिंगमधून आपल्या आवडीनिवडी प्रकट होत असतात. याच आवडीनिवडी ट्रॅक करण्याचं काम अॅनालिटिक्स नावाचा विभाग करत असतं. हा विभाग आता जवळपास सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये अस्तित्वात आहे. या आवडीनिवडीवरून आपली एक कन्झ्युमर ओरिएंटेड म्हणजेच ग्राहक म्हणून प्रोफाइल बनवली जाते. आणि हीच प्रोफाइल जाहिरातदारांना विकली जाते. हा डेटा मॅनेजमेंटचा खेळ वरून जरी शांत दिसत असला तरी त्यातली उलाढाल फार मोठी आहे. या डेटा मॅनेजमेंट आणि डेटाबेस खरेदीविक्रीबाबत कुठलीच कंपनी खुलेआमपणे बोलत नाही.
फुकट असल्यामुळे आपण या अॅप्सचा वापर करत असतो. वरकरणी आपण काहीच किंमत मोजत नसलो तरी आपण स्वत:लाच पूर्णपणे विकलेलं असतं आणि तेही अगदी बेमालूमपणे, स्वत:च्याच नकळत.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2016 रोजी प्रकाशित
अस्सं कस्सं? : खुद को बेच दो!
दुसरा पर्याय म्हणजे डेटा मॅनेजमेंट. प्रत्येक युजरची माहिती ही व्हॉट्सअॅपच्या सव्र्हरवर सेव्ह केलेली असते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-01-2016 at 07:59 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free facility from social networking sites