सिग्नल तोडणाऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या गाडीवर वाहतूक पोलिसांची कारवाई

कायदा केवळ सर्वसामान्यांसाठी असतो आणि त्यांनीच त्याचे पालन करायचे असते, अशा थाटात  नेतेमंडळी वावरत असतात. मात्र कायद्याचे बेधडक उल्लंघन करण्याच्या नेत्याचा वृत्तीला वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांच्या गाडीवर सिग्नल तोडल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडकपणे कारवाई सध्या सुरू केली आहे. गुरुवारी मीरा रोड येथे एक आलिशान कार सिल्वर पार्कचा सिग्नल तोडून वेगाने पुढे जात होती. यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले कर्तव्यावर हजर होते. त्यांनी नियमाचे उल्लंघन करणारी गाडी ताबडतोब अडवली. या गाडीत मीरा-भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेते लियाकत शेख आपल्या मित्रासमवेत बसलेले होते. चौगुले यांनी चालकाकडे गाडीची कागदपत्रे आणि चालक परवाना मागितला. परंतु ही दोन्ही कागदपत्रे चालकाकडे नव्हती. त्यामुळे गाडी सोडण्यास नकार देत शेख यांच्या गाडीच्या चाकाला पोलिसांनी जॅमर लावला. कागदपत्रे दाखविल्याशिवाय गाडी सोडण्यास नकार दिल्याने अखेर शेख यांनी गाडी तेथेच ठेवून दुसऱ्या गाडीने पुढे रवाना झाले. यावेळी चौगुले यांनी गाडीवर दंडात्मक कारवाई केली. ही घटना उलटून अवघे चोवीस तास होत नाहीत, तोच विरोधी पक्षनेता अशी पाटी लिहिलेल्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा सिग्नल तोडल्याने कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेविका सुमन कोठारी यांच्या गाडीवरदेखील दंडात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.