कल्याणमधील तानकी हाऊस एकोणिसाव्या शतकाची साक्ष देत उभे आहे. खाडी परिसरात व विपुल पावसाच्या माऱ्यात या वास्तूची रचना करण्यात आली आहे. नक्षीदार खाब, दरवाजे, खिडक्या या वास्तूची शोभा वाढवितानाच कोकणी मुस्लीमांच्या महिलांना बाहेरील भागात प्रवेश नसल्याने खिडक्यांना पडद्यांची केलेली रचना ठळकपणे जाणवते. ही जुनी घरे वास्तुशास्त्राचा उत्तम नुमना असून कोणत्याही ऋतूमध्ये सुरक्षितता लाभेल अशीच या वास्तूची रचना केली आहे. या वास्तूचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही संपूर्ण वास्तू बर्मा या लाकडापासून उभारण्यात आली आहे. तसेच या वास्तूमध्ये इतर भागांतील संस्कृतींचा मिलाप आढळून येतो. तेव्हाची मुस्लीम कुटुंबे व्यापार-उद्योगात असल्याने आर्थिक सुबत्तेचे आणि कामगारांच्या कलाकुसरीचे दर्शन या वास्तूंमधून प्रकर्षांने जाणवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणमधील जुन्या वाडय़ांची माहिती करून घेताना पिढय़ान्पिढय़ा कल्याण गावात वास्तव्य केलेल्या कोकणी मुस्लीम समाजातल्या काही कुटुंबीयांच्या घरांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. साधारणत: गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांपासून रेतीबंदर रोड, पेंढेबाजार, घासबाजार, अन्सारी चौक या परिसरांत बहुसंख्येने कोकणी मुस्लीम वास्तव्यास आहेत. जुन्या वास्तू टिकवून असलेली तानकी, फंगारी, धुरू, फाळके अशा काही कुटुंबीयांची नावे सांगता येतील. यातील बहुतांश कुटुंबीयांची घरे खाडीच्या परिसरात असल्यामुळे आणि पूर्वीच्या काळी कल्याणच्या परिसरातदेखील पाऊस भरपूर पडत असल्यामुळे पुरापासून संरक्षण व्हावे, या हेतूने ही घरे उंच जोत्यांवर बांधलेली दिसून येतात. दर्शनी भागातील ओटीकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो. बहुतांश घरे रस्त्याला लागून असल्याने या घरांना वाडे भिंत किंवा दिंडी असा प्रकार आढळून येत नाही. घरात शिरताना ओटी, माजघर, स्वयंपाकघर, पहिल्या मजल्यावरील दिवाणखाना, मागील अंगण असे या घरांचे स्वरूप आहे. लाकूडकामाचा भरपूर वापर घरबांधणीत केलेला असल्याने घराला लाकडी खांब, दरवाजे, तक्तपोशी, लाकडी दरवाजांच्या खिडक्या आजही आढळून येतात. घरांचे दरवाजे, खिडक्या, दोन खिडक्यांमधील कमानी या सगळ्यांवर कुशल कारागिरांनी नक्षीदार वेलबुट्टय़ा काढलेल्या दिसतात. घरांची रचना उंचावर असल्याने तसेच भरपूर खिडक्या-दारे यामुळे या घरांमध्ये भरपूर हवा, उजेड मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या घरांना नळीची कौले असत. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी मजुरांना बोलावून ही कौले व्यवस्थित साफ करून बसवून घ्यावी लागतात. याला ‘कौल चाळणे’ असे म्हणत. कालामानानुसार नळीची कौले जाऊन आता त्या ठिकाणी मंगलौरी कौले आली. मोहल्ल्यातील जुन्या घरांच्या बांधकामासाठी लाकडाबरोबरच दगडाचा वापरदेखील मोठय़ा प्रमाणावर केलेला दिसतो. दोन-दोनशे वर्षे होऊनदेखील ही जुनी घरे अजूनही सुस्थितीत आणि शाबूत आहेत.
मुस्लीम कुटुंबातील स्त्रिया बुरखा परिधान करीत असल्याने आणि सरसकट घराच्या दर्शनी भागात स्त्रियांनी येण्याची पद्धत पूर्वीच्या काळी नसल्याने या घरांमधील खोल्यांना पडद्यांचा वापर केल्याचे आढळून येते. अनेक मुस्लीम कुटुंबे व्यापार उद्योगात असल्याने घराघरांत सुबत्ता होती. त्यामुळे घरांची बांधकामे कुशल कारागिरांकडून करून घेतली जात असल्याचे आणि सढळ हाती वास्तू बांधकामाकरिता पैसा खर्च केल्याचे दिसून येते. कोकणी मुसलमान समाजातील अनेकांचे हिंदू समाजाशी, विशेषत: ब्राह्मण समाजाशी व्यापारी संबंध होते व चांगला परिचय होता. एकमेकांकडे यानिमित्ताने येणे-जाणेही होत असे. त्यामुळे मोहल्ल्यातील अनेक घरांची रचना, बांधकामे आणि लगतच्या जुन्या कल्याणातील ब्राह्मण समाजातील घरे किंवा वाडे यांच्या बांधकामात साम्य आढळून येते. मुस्लीम मोहल्ल्यातील, विशेषत: रेतीबंदर रोड, पेंढेबाजार, घासबाजार आदी परिसरांतील जुनी घरे म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हटला पाहिजे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूंचा त्रास होणार नाही, अशी वास्तुरचना मोहल्ल्यातील या घरांची आहे. मोहल्ल्यातील जाणकार व्यक्तीला जुन्या घरांविषयी विचारले असता, पहिले बोट दाखवले जाते ते म्हणजे रेतीबंदर रस्त्यावरील १९ व्या शतकातील ‘तानकी हाऊस’कडे.
कल्याणमधील रेतीबंदर परिसरात असणारे तानकी हाऊस नक्की किती साली उभे राहिले याविषयी नेमकी माहिती नाही. ज्येष्ठ इतिहासकार श्रीनिवास साठे यांच्या ‘कल्याणचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकामध्ये हे घर एकोणिसाव्या शतकातील आहे, असा उल्लेख वाचावयास मिळतो. १९४३ मध्ये मेनुद्दीन तानकी यांनी हे घर ६००० रुपये किमतीला विकत घेतले, परंतु हे घर त्या आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे तानकी कुटुंबीय सांगतात. एकोणिसाव्या शतकातील तानकी हाऊस घराच्या वेगवेगळ्या वैशिष्टय़ांमुळे कोणालाही भुरळ पाडेल असेच आहे. संपूर्ण तानकी हाऊस ‘बर्मा’ या सागवान लाकडापासून उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हे घर लाकडी फ्रेमवर उभे राहिले आहे. तानकी हाऊसचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे घराच्या समोर उभे राहिल्यास ते आपणास एकमजली भासते; परंतु घराच्या मागील बाजूस जाऊन पाहिल्यास ते दोनमजली असल्याचे आपल्याला लक्षात येते. यावरून एकोणिसाव्या शतकातील स्थापत्यशास्त्र किती विकसित होते, याचा अंदाज येऊ शकेल.
१९५७ आणि २००५ या वर्षांमध्ये आलेल्या पुराचा तडाखा तानकी हाऊसला जराही बसला नाही. दोनही पुरांमध्ये तानकी हाऊसचा तळमजला पाण्याने भरला होता. १९५७ मध्ये ६ फूट तर २००५ च्या पुरामध्ये ७ फूट उंचीपर्यंत पाणी तानकी हाऊसमध्ये शिरले होते. या पुरांच्या वेळी पहिल्या मजल्यावरील खिडक्यांमधून कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि तेथून पुढे होडीच्या साहाय्याने प्रवास करीत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे तानकी कुटुंबीय आवर्जून सांगतात. तानकी हाऊसमध्ये आजमितीला चार कुटुंबे राहत असून एकूण तीस सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. घरात साधारण सोळा ते सतरा खोल्या असून प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या प्रशस्त खोल्यांमध्ये आपला संसार सुखाने करीत आहेत. घरामध्ये भक्कम लाकडी दरवाजे असून दरवाज्यांना भक्कम अशा लोखंडी कडय़ाही आहेत. वाडय़ाच्या पहिल्या मजल्याला असणाऱ्या खिडक्यांना सुंदर असे नक्षीकाम करण्यात आल्याचे आढळून येते. घरामध्ये काळानुरूप बदलही झाल्याचे दिसते. टीव्ही, पलंग अशा आवश्यक गोष्टी आज या ठिकाणी पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी घरासमोर असणारे फाटक मात्र आज येथे नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 th century tanaki house of kalyan