डोळ्यावर काळ्याशार काचांचा गॉगल घातला तरी उन्हाचा ताप काही कमी होत नाही. उगाच सावलीचा भास मात्र होतो. रंगीबेरंगी प्रकाशकिरणांच्या तालावर थुईथुई नाचणारे कारंजे पाहिले की मनाला आनंद होतो, पण त्याने तहान भागत नाही. एअरकंडिशन्ड खोलीत बसले की तेवढय़ापुरते बरे वाटते, पण बाहेर आले की दुपटीने उकडते. भूतकाळात घेऊन जाणाऱ्या चांगल्या आठवणींचेही असेच असते. त्या आठवणींनी मनावर मोरपीस फिरविल्याचा भास होतो, पण नंतर तेच मन नकळत वर्तमान परिस्थितीशी तुलना करू लागले की वाईट वाटल्याशिवाय राहत नाही.
गिरणगावातले ते दिवस खरंच मंतरलेले होते. आम्ही राहायचो त्या चाळीपासून मिल हाकेच्या अंतरावर होती. त्यामुळे भोंगा झाला की आम्ही निघायचो. अख्ख्या गिरणगावाचे वेळापत्रक घडय़ाळ्याऐवजी भोंग्यावर ठरलेले असायचे. पहिला भोंगा आठ वाजता. त्या वेळी रात्रपाळीचे कामगार घरी येणार आणि सकाळच्या पाळीचे कंपनीत. दुसरा भोंगा चार वाजता. दुपारच्या पाळीचा आणि तिसरा रात्री बारा. कामगारांना कंपनीच्या कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात जेवण मिळायचे, तेही अगदी भरपेट. उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी मिळायची. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मांसाहार. दर शनिवारी जेवणात एखादा गोड पदार्थ असायचा. अण्णा परब, गोपाळ सनये, कृष्णा सावंत आणि मी, एकाच गावचे. शाळेतही सोबत होतो. वर्ग थोडे मागेपुढे असतील.
दहावीला नापास झाला आणि अण्णा परब चुलतभावाकडे मुंबईत आला. त्याच्या ओळखीने मिलमध्ये चिकटला. दुसऱ्याच वर्षी आम्ही तिघेही मुंबईत एकाच चाळीत भाडय़ाने खोली घेऊन राहू लागलो. ती दीड खणीची खोली, त्यापुढचा तो सार्वजनिक व्हरांडा, समोरील मैदान आणि हाकेच्या अंतरावरील मिल हा आमचा आशियाना होता. शनिवार-रविवारी मैदानात मनोरंजनाचे कार्यक्रम होत. पोवाडे, लावण्यांचे फड जमायचे. गणेशोत्सवात-शिवजयंतीला पडद्यावर सिनेमा दाखवीत. मात्र सर्वात मोठा सण.. १ मे, कामगार दिन. त्या दिवशी गिरणी बंद असायची. सर्व मशीन्सची डागडुजी त्या दिवशी केली जाई. गुणवंत कामगारांचा मालकातर्फे सत्कार केला जाई. कामगारांच्या मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य मिळायचे. या दिवशी कामगारांना, त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीत आणायची मुभा होती. त्यामुळे जो तो आपापल्या मुलाबाळांना कौतुकाने गिरणीत घेऊन यायचा, आपण काय काम करतो ते दाखवायचा.
कंपनीमालक आणि कामगार यांच्यात थेट संवाद होता. त्यामुळे कंपनीच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. एकदा मंदीमुळे कंपनी अडचणीत होती. मालकाने कामगारांना थोडे सांभाळून घेण्याची विनंती केली. कामगारांनीही परिस्थिती ओळखून दोन महिने तग धरला. पुढे दिवाळी होती. त्यामुळे मालकानेच कर्ज काढून कामगारांचा थकीत पगार दिला. या वर्षी बोनस देता येणार नाही, म्हणून त्याने दिलगिरीही व्यक्त केली.   
पुढे कुठे काय बिनसले माहिती नाही, पण हा संवाद कमी होऊ लागला. कामगार आणि मालक यांच्यामध्ये व्यवस्थापन नावाची नवी फळी निर्माण झाली. तिने अनावश्यक खर्चाला कात्री लावायला सुरुवात केली. पहिला फटका कॅन्टीनच्या सवलतीला बसला. हॉटेलच्या दरात जेवण आणि नाश्त्याचे पदार्थ मिळू लागले. पुन्हा त्या पदार्थाचा दर्जाही घसरला. कामगारांनी घरून डबे आणायला सुरुवात केली. दरवर्षी कामगारांना दोन मोफत गणवेश दिले जात. त्या गणवेशांचे पैसे पगारातून कापले जाऊ लागले. कपडेधुलाईसाठी महिन्यातून एकदा साबणचुऱ्याचा बॉक्स मिळायचा, तो बंद झाला. कामगारांमध्ये धुमसत असलेल्या असंतोषाची ती ठिणगी ठरली. त्यांनी उत्स्फूर्तपणे काम बंद केले. चार दिवस गिरणी बंद होती. अखेर व्यवस्थापनाला ती नोटीस मागे घ्यावी लागली. गिरणी पुन्हा सुरू झाली, पण त्यानंतर पूर्वीसारखे खेळीमेळीचे वातावरण राहिले नाही. पहिल्या अनुभवाने व्यवस्थापन हुशार झाले. त्यांनी कामगारांच्या एकीवरच प्रहार करण्यास सुरुवात केली.
विविध प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांनी काही कामगारांना फितवले, त्यांना बढत्या दिल्या. कंपनी नफ्यात असूनही एका दिवाळीला बोनस दिला नाही. कामगारांनी पुन्हा बंदची हाक दिली. मात्र आता परिस्थिती बदलली होती. फितूर कामगार मिलमध्ये शिरले. कामात खंड पडला नाही. गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांचा खाडा पकडून त्या दिवसाचा पगार कापण्यात आला. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील संघर्ष पुढे अधिकच चिघळला. अखेर गिरणीला कायमचे टाळे लागले..
मग मिळेल ते काम करीत राहिलो, कारण गिरणी बंद पडली तरी संसार अध्र्यावर सोडणे शक्य नव्हते. गिरणगाव सोडून डोंबिवलीला आलो. रिक्षा चालवू लागलो. वयानुसार ते काम झेपेनासे झाल्यावर आता सुरक्षारक्षक म्हणून काम करतोय. बाजारातल्या एका एटीएम सेंटरबाहेर स्टुलावर बसून असतो. बारा तासांची डय़ुटी. रिलिव्हर आला नाही तर ३६ तास. घरी मुलाचे, सुनेचे टोमणे ऐकण्यापेक्षा बरे वाटते. मागचे काहीही आठवायचे नाही, असे मनाला बजावतो, पण तरीही कधी तरी सुटीच्या दिवशी बाजारातून उत्साहाने ताजे मासे घेऊन येणारा अण्णा परब आठवतो. हसऱ्या चेहऱ्याचा गोपाळ आणि वारकरी वृत्तीचा कृष्णा डोळ्यापुढे उभे राहतात. कालच्या १ मे रोजी पुन्हा त्या तिघांची आठवण झाली आणि डोळे पाण्याने डबडबले!|
महादेव श्रीस्थानककर