काळ बदलत गेला तसा आधुनिक जीवनशैलीने सणांमध्येही शिरकाव केला. रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचे महत्त्व वाढले आणि दैनंदिन आयुष्यात आवर्जून केली जाणारी फॅशन राखीमध्येही दिसू लागली. पूर्वी केवळ एक धागा बांधला जायचा. त्यात आता काळानुसार बदल होऊन राख्यांचे वेगवेगळे प्रकार बाजारात यायला लागले आहेत. आजच्या काळात रक्षाबंधनाच्या दोन आठवडे आधीपासूनच मुली, महिलांची आपल्या भाऊरायाला राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते. ठाण्याच्या बाजारातही अनेक दुकानांमध्ये किंवा मोठय़ा दुकानांच्या बाहेर रंगीबेरंगी राख्यांची विक्री होत आहे.
पिझ्झा हट आणि डोमिनोज
लहान दोस्तांना हमखास आवडतील अशा पिझ्झा हट आणि डोमिनोजचे चित्र राख्यांवर पाहायला मिळत आहेत. छोटा भीम, टॉम आणि जेरी यांसारख्या कार्टून्सच्या जोडीला लहान मुलांसाठी ही पिझ्झा हट आणि डोमिनोजची राखी बाजारात आकर्षण ठरत आहे.
रुद्राक्ष राखी
तरुणांच्या दृष्टीने या रुद्राक्ष राखीला फा रशी मागणी नसली तरी वयस्कर महिला आपल्या भावासाठी आवडीने या राख्या खरेदी करीत आहेत. रुद्राक्ष फळ खरे तर डोळे, डोकेदुखी यावर गुणकारी आहे, पण दैनंदिन आयुष्यात ते वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे निदान रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे रुद्राक्ष हातावर बांधले जाईल म्हणून की काय या रुद्राक्ष राख्या तयार केल्या जातात. अगदी पातळ असलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यात हे नाजूक रुद्राक्ष फळ त्याच्या बाजूच्या मोत्यांनी किंवा रंगीबेरंगी मण्यांनी गुंफलेले आहे. त्यामुळेच नाजूक, पण पाहताच क्षणी या राखीची नक्षी आपल्याला भावते.
गोल्ड आणि सिल्व्हर प्लेटेड राखी
गणपतीची मूर्ती असणाऱ्या किंवा स्वस्तिक असलेल्या, सोने आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. सोने, चांदी आणि त्यावर एखादा हिरा असलेली राखी नाजूक, पण उठावदार दिसते.
कुठे
गावदेवी, गोखले रोड,
नौपाडा येथील दुकानांमध्ये
किंमत: १० ते ३०० रुपयांपर्यंत
चॉकेलट राखी..
लहान दोस्तांसाठी चॉकलेट अत्यंत प्रिय. हे चॉकलेट राख्यांवर असले तर छोटय़ा दोस्तांची मजाच मजा. राखी आणि त्यावर रंगीबेरंगी कागदात बंद केलेले हे चॉकलेट बहिणीने भावाला दिले, तर ओवाळणीसाठी वेगळ्या गोडाची आवश्यकताच वाटणार नाही. चॉकलेट खायचे असल्यास राखीवरचे ते कागद उघडून खाल्ले तरी राखी हातावर तशीच बांधलेली राहते.
